विश्वभारतीच्या अवघ्या परिसरातून फेरफटका मारताना रवींद्रनाथ टागोरांच्या शैक्षणिक संकल्पनेचे मूर्त स्वरूप शांतिनिकेतनमध्ये साकारलेले जाणवते. शांतिनिकेतन म्हणजे जागतिक शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत क्रांतिकारी आणि यशस्वी प्रयोगशाळा म्हटले तर वावगे ठरणार नाही! शांतिनिकेतन, तेथील विश्वभारतीचा परिसर, आणि टागोरांच्या जतन केलेल्या आठवणींमधून गुरुदेव शांतिनिकेतनमध्ये आपल्याला पदोपदी भेटत राहतात. एकंदरीतच शांतिनिकेतनच्या भेटीने आपल्याला भारावून जायला होते. बहुआयामी, कमालीचा व्यासंग असलेल्या प्रतिभाशाली कविगुरु टागोरांचा जणू जीवनपट उलगडणारी ही ठिकाणे आपल्याला निशब्द करतात आणि जीवनाबद्दल खूप मोठी प्रेरणा देऊन जातात. जीवनाकडे पहाण्याचा एक आगळा वेगळा दृष्टिकोण देतात.