सफर उत्तरबंगाची – भाग -३

पश्चिम बंगाल मध्ये कोलकात्यापासून उत्तरेस अंदाजे १००-१५० किलोमीटर अंतरावर बिरभूम जिल्ह्यात अजय आणि कोपाई नद्यांच्या काठी वसलेले एक शहर आहे बोलपूर! नोबेल पारितोषिक विजेते, कविवर्य गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापना केलेल्या विश्वभारती विद्यापीठाचे – शांतीनिकेतनचे प्रवेशद्वार! साहित्य आणि कलेमध्ये विशेष रुची असणार्‍या व्यक्तीसाठी शांतिनिकेतनची भेट म्हणजे साक्षात साहित्य आणि कलेच्या एका भव्य-दिव्य वारश्याची यात्रा जणू! शाळेत असल्यापासून गुरुदेवांचे साहित्य म्हणजे माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय! “Essays of Ravindranath” – ह्या गुरुदेव टागोरांच्या सर्वोत्कृष्ट आणि विचार प्रवर्तक निबंधांचा अत्यंत महत्त्वपूर्ण संग्रह साहित्य अकादमीने दोन खंडांमध्ये विविध भारतीय भाषांमध्ये प्रकाशित केलेला आहे. ह्या निबंधमालेचे मराठी भाषेतील खंड महाविद्यालयीन जीवनापासून माझ्याकडे संग्रही आहेत.

भटकंती आणि कामानिमित्त कलकत्ता शहराला अनेकवेळा भेट दिलेली होती. परंतु शांतीनिकेतन भेट मात्र प्रत्येकवेळी हुकली होती. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये नाताळच्या सुट्टीत दुआर्स सहलीनंतर काही झाले तरी शांतिनिकेतनला जायचेच असे ठरविले होते. लतागुडीच्या दोन दिवसीय मुक्कामानंतर आम्ही सिलीगुडीमार्गे दुपारी न्यू जलपाईगुडीहून बोलपूरकडे जाणारी ट्रेन पकडली. ट्रेन साधारण ४५ मिनिटे उशिराने धावत असल्याने सहा-सात तासांचा रेल्वे प्रवास करून आम्ही रात्री पावणे अकरा वाजता बोलपूर-शांतिनिकेतन स्टेशन गाठले. आपण ट्रेन मधून प्लॅटफॉर्मवर उतरताच कवीगुरु टागोरांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींमधील काव्यमय पंक्ति आपले जणू बोलपूरमध्ये स्वागत करतात. स्टेशनच्या भिंतींवर आणि प्लॅटफॉर्मच्या इमारतींवर कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांची भव्य भित्तिचित्रे आणि रेखाचित्रे साकारलेली आहेत. स्टेशनच्या आवारात पारंपरिक वाद्ये वाजवणारे बाऊल गायक, संथाल आदिवासी कला आणि विश्व-भारतीच्या कला भवन प्रेरित दृश्यांची भित्तिचित्रे आहेत.

हवेत गारठा होता. स्टेशनवर प्रवाशांची ये-जा होती. ट्रेनमधून उतरताच हमाल आणि रिक्षावाले हयांनी अगदी पिच्छा पुरवला! आम्ही घासाघीस करून अखेरीस रिक्षेत बसलो आणि आमच्या नियोजित हॉटेल club central येथे पोहोचलो. आमची खोली सुसज्ज करून ठेवलेली होती. बोलपूर नजीक असताना ट्रेन मधूनच मी हॉटेलमध्ये संपर्क करून आमच्या जेवणाची सोय करून ठेवण्यास सांगीतले होते. तातडीने आमचे जेवण सुद्धा आमच्या खोलीत दिले गेले. आम्ही फ्रेश होऊन जेवण करून अंथरुणावर पहुडलो! निद्राधीन होण्याआधी गूगलबाबाच्या मदतीने दुसर्‍या दिवसाचे नियोजन करून जास्तीत जास्त स्थळ दर्शन कसे करता येईल याचा आढावा घेऊन ठेवला. साधारण दहा ते पंधरा किलोमीटरच्या परीघामध्येच असलेली महत्त्वाची ठिकाणे मा‍झ्या नोंदवहीत टिपून ठेवली!

सकाळी उठून नाश्ता करून तयार झालो. हॉटेलच्या मॅनेजरने सुचविल्याप्रमाणे आम्ही हॉटेलबाहेर असलेल्या टोटो स्टँडवर जाऊन दिवसभरासाठी भाड्याने टोटो निश्चित केली. टोटो म्हणजे बॅटरीवर चालणारी ई-रिक्षा! संपूर्ण शांतिनिकेतनमध्ये टोटो-रिक्षा प्रवासाचे प्रमुख साधन आहे. आम्हाला दिवसभर स्थलदर्शन करून पुन्हा रात्री आठ वाजता ‘वंदे भारत’ ट्रेनने कोलकात्याला प्रस्थान करायचे होते. त्यामुळे शांतिनिकेतन स्थलदर्शन करून बोलपूर स्टेशनवर सोडण्याच्या अटीवर रिक्षाचे भाडे ठरविले आणि आम्ही टोटोमध्ये बसून शांतिनिकेतन भेटीला निघालो.

खुद्द बोलपूर शहरापासून साधारण तीन ते पाच किलोमीटर अंतरावर शांतिनिकेतन वसलेले आहे. आम्ही अगदी काही वेळातच शांतिनिकेतन परिसरामध्ये पोहोचलो. आमच्या टोटो-रिक्षावाल्याने आजूबाजूला दिसणार्‍या परिसराची माहिती देत आम्हाला “छातीमतला” येथे आणून सोडले. सर्व महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन झाल्यावर पिकअपसाठी फोन करण्यास बजावून तो निघून गेला.

शांतिनिकेतन – छातीमतला

टागोरांचे वडील, महर्षि देवेंद्रनाथ टागोर यांनी साधारण सन १८६३ मध्ये त्यांच्या आध्यात्मिक साधनेकरिता बोलपूर गावात रायपुरच्या जमीनदाराकडून कायमस्वरूपी भाडे तत्वावर २० एकर जागा घेऊन तेथे एक आश्रम स्थापन केला, ज्याचे नाव त्यांनी “शांती निकेतन” असे ठेवले. देवेंद्रनाथ टागोर ह्या परिसरामध्ये छातीम म्हणजे सप्तपर्णी वृक्षांच्या छायेत ध्यानधारणा करीत असत. ह्या छातीम वृक्षांच्या छायेत साधना करताना त्यांना निराकार ईश्वराच्या झालेल्या आध्यात्मिक अनुभूतिबाबत नितांत सुंदर वर्णन केलेले आहे. बांगला साहित्यामध्ये ह्या काव्य पंक्ति अतिशय प्रसिद्ध आहेत.

“तिनि आमार प्राणेर आराम, मनेर आनन्द, आत्मार शान्ति |

वे (ईश्वर) मेरे प्राणोंके आराम, मेरे मन का आनन्द और मेरी आत्मा की शांती है तथा
‘The almighty is the comfort of my life , the joy of my mind, and the peace of my soul’.

शांतिनिकेतनमधील छातीमतला ऐतिहासिक स्थळाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या ह्या काव्य पंक्ति कोरलेल्या आहेत. छातीमतला म्हणजे शांतिनिकेतनचा मूळ गाभा!

छातीमतलाच्या छायेतच शांतिनिकेतनाची संकल्पना अस्तित्वात आली आणि शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर रविंद्रनाथ टागोरांच्या संकल्पनेतून ह्या जागेचा विस्तार होत गेला आणि सन १९२१ मध्ये तिथे जगप्रसिद्ध “विश्वभारती” विद्यापीठाची स्थापना झाली. आजमितीला “विश्वभारती” गुरुदेव टागोरांनी निर्माण केलेली केवळ एक शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ नसून बोलपूर शहराच्या अंतर्गत विस्तारलेला विद्येचा प्रचंड मोठा वटवृक्ष आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी वसवविलेले ‘विश्वभारती’ विद्यापीठ म्हणजे खऱ्या अर्थी विद्येचे माहेरघर असून भारतासाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे.

शांतिनिकेतन परिसराची व्याप्ती खूप मोठी आहे. ह्या परिसरामध्ये पर्यटकांसाठी खास करून रविंद्रभवन संग्रहालय, उत्तरायण संकुल, छातीमतला, उपासना गृह, कला भवन आणि संगीत भवन, चीना भवन अशी काही प्रमुख आकर्षणे आहेत. ह्या परिसराला भेट देताना आपल्याला सतत जाणीव होत राहते की, शांतिनिकेतन हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर कला, साहित्य, सुंदर निसर्ग ह्यांचा त्रिवेणी संगम असलेले एक अद्वितीय सांस्कृतिक केंद्र आहे.

शांतिनिकेतनमध्ये विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करण्यामागे गुरुदेव टागोरांची मूळ संकल्पना फार छान होती. टागोरांना पारंपरिक चार भिंतीमध्ये बंदिस्त आणि घोकंपट्टी करणारी शिक्षण पद्धती मान्य नव्हती. टागोरांच्या मते निसर्ग हा माणसाचा सर्वात मोठा गुरु! निसर्गाच्या सान्निध्यात, त्याचे अवलोकन करीत, त्याच्याशी समरूप होत विद्यार्थ्यांनी मोकळ्या हवेत, वृक्षांच्या छायेत बंधन मुक्त आणि आनंदमयी ज्ञानार्जन करावे, जेणे करून विद्यार्थ्यांचा भावनिक आणि सर्जनशीलतेचा विकास होईल. केवळ बौद्धिक नाही तर शारीरिक श्रमाचे महत्त्व आणि स्वावलंबन ह्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शेती, हस्तकला आणि बागकाम इत्यादि विषयांमध्ये विद्यार्थ्यानी प्राविण्य मिळवले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. व्यक्ति विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर कला, संगीत, नृत्य आणि नाटक हे देखील शिक्षणाचे अविभाज्य घटक असले पाहिजेत असा गुरुदेव टागोरांच्या शैक्षणिक संकल्पनेचा मूळ गाभा होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेता आले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांचा ठाम विश्वास होता की, विद्यार्थ्याचा प्राथमिक विकास आणि विचार करण्याची क्षमता त्याच्या मातृभाषेतून सर्वोत्तम होऊन शकते.

रवींद्रनाथ टागोर यांनी ११ ऑक्टोबर १९१६ रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलीस येथून आपल्या मुलाला लिहिलेल्या एका प्रसिद्ध पत्राचा मजकूर टागोरांच्या मनातील विश्वभारती विद्यापीठाच्या स्थापनेमागे असलेली मुख्य विचारधारा सुस्पष्ट करतो,

“The Santiniketan school must be made the thread linking India with the world. We must establish there a centre for humanistic research concerned with all the world’s peoples. The age of narrow nationalism is coming to an end… I have it in mind to make Santiniketan the connecting thread between India and the world. I have to found a world centre for the study of humanity there… My remaining days will be dedicated to breaking the barriers of national pride.”

ह्या पत्रामधून त्यांनी शांतिनिकेतनला जागतिक केंद्राचे रूप देण्याचा त्यांचा मनोदय मांडला होता. विश्व बंधुत्वाची संकल्पना, संकुचित राष्ट्रवादाला विरोध, अनेक संस्कृतींचे मिलन, वैश्विक शिक्षण अश्या मुख्य पैलूंच्या आधारे सन १९२१ मध्ये त्यांच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देत टागोरांनी विश्वभारती संस्थेची औपचारिक स्थापना केली.

पहिल्या महायुद्धाच्या काळात जगात पसरलेला आक्रमक आणि संकुचित राष्ट्रवाद आणि त्यामुळे होणारा संहार पाहून टागोर व्यथित झाले होते. भारताने संकुचित राष्ट्रीय अभिमानाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवतेला एकत्र आणण्याचे कार्य करावे आणि शांतिनिकेतनने जात, धर्म आणि देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बंधुत्वाचे प्रतीक व्हावे अशी त्यांची इच्छा होती. जात, धर्म, वंश किंवा देशांच्या सीमा ओलांडून प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे ज्ञान घेता यावे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. टागोरांना शांतीनिकेतनला केवळ एक प्रादेशिक किंवा राष्ट्रीय शाळा न ठेवता, संपूर्ण जगातील ज्ञान आणि संस्कृतीचा मेळ साधणारे एक केंद्र बनवायचे होते. आध्यात्मिक विकासासाठी पोषक अशा साध्या वातावरणात पाश्चात्य संस्कृतीसह हिंदू, बौद्ध, जैन, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर संस्कृतींच्या धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान आणि कलेचा अभ्यास आणि संशोधन करण्याची संकल्पना स्वातंत्र्य पूर्व काळात किती क्रांतिकारी असेल नाही!!  विचारांच्या मुक्त देवाणघेवाणीतून पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा मेळ साधून जागतिक शांततेचा पाया रोवण्याचा विचारच किती उदात्त होता! शांतिनिकेतन म्हणजे जागतिक शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत क्रांतिकारी आणि यशस्वी प्रयोगशाळा म्हटले तर वावगे ठरणार नाही! भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर साधारण १९५१ मध्ये विश्वभारतीला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. आजही ही संस्था कला, साहित्य आणि जागतिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. सन २०२३ मध्ये विश्वभारती विद्यापीठाला यूनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.

विश्वभारती विद्यापीठामध्ये ग्रामोद्योग, चित्रकला, शिल्पकला, गायन, नृत्य आणि विविध भारतीय भाषांव्यतिरिक्त, चीनी , जपानी , जर्मन आणि फ्रेंच यांसारख्या परदेशी भाषांच्या अभ्यासासाठी विशेष व्यवस्था आहे. त्यानुसार विश्वभारती विद्यापीठामध्ये ललित कलेच्या अभ्यासकांसाठी ‘कलाभवन’, विविध जागतिक भाषेच्या अभ्यासकांसाठी ‘भाषा भवन’ आणि संगीत, नृत्य अभ्यासकांसाठी ‘संगीत भवन’ असे वेगवेगळे विभाग आहेत. चीना भवन मध्ये चीन आणि भारतीय सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधाचे अध्ययन केंद्र आहे. जगभरातून शेकडो विद्यार्थी भारतीय संस्कृती, कला, संगीत, आणि टागोरांचे तत्वज्ञान शिकण्यासाठी विश्वभारतीमध्ये येतात. आज विश्वभारती एक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र आहे. विश्वभारतीचे ब्रीद वाक्य अगदी समर्पक आहे- “यत्र विश्वं भवत्येकनिडम्” – जिथे पूर्ण विश्व एका घरट्यामध्ये एका परिवारासम सामावलेले आहे!

विश्वभारती विद्यापीठाने भारताला आणि जगाला अनेक प्रतिथयश अशी नामवंत व्यक्तिमत्वे प्रदान केलेली आहेत. कला, साहित्य, राजकारण, अर्थशास्त्र, चित्रपटसृष्टी अश्या विविध क्षेत्रामध्ये ह्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यानी लौकिक प्राप्त केलेला आहे. राजकारण आणि समाजकारणामध्ये प्रामुख्याने नामोल्लेख करायचा झाला तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९३० च्या दशकात शांतिनिकेतनमध्ये शिक्षण घेतले होते. जयपूरच्या महाराणी आणि प्रसिद्ध राजकारणी गायत्री देवी या देखील विश्वभारती विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी होत्या. भारताच्या प्रसिद्ध मुत्सद्दी आणि संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या माजी स्थायी प्रतिनिधी अरुंधती घोष, सरहद्द गांधीचे पुत्र प्रसिद्ध पश्तो कवि आणि तत्वज्ञानी – खान अब्दुल गणी खान, नोबेल पारितोषिक विजेते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि ‘भारतरत्न’ अमर्त्य सेन, भारताचे पाचवे सरन्यायाधीश सुधी रंजन दास, ऑस्कर पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे, रवींद्रसंगीताला जगभरात लोकप्रिय करणाऱ्या कनिका बंदोपाध्याय आणि सूचित्रा मित्रा ह्या दोन महान गायिका, आधुनिक भारतीय शिल्पकलेचे जनक मानले जाणारे रामकिंकर बैज, पद्मविभूषण विजेते थोर चित्रकार आणि भित्तिचित्रकार (Muralist) बिनोद बिहारी मुखर्जी, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार के. जी. सुब्रमण्यन, भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर नक्षीकाम करणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेले कृपाल सिंह शेखावत, ज्ञानपीठ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी, प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ सय्यद मुजतबा अली अशी अनेक रत्ने विश्वभारतीच्या मुशीतून घडलेली आहेत.

टागोरांच्या शब्दात – “Vishwa Bharati represents India where she has her wealth of mind which is for all. Vishwa Bharati acknowledges India’s obligations to offer others the hospitality of her best culture and India’s right to accept from others their best”.

रवींद्र भवन संग्रहालय

शांती निकेतन परिसरामध्ये आम्ही प्रथम रवींद्रभवन संग्रहालयाला भेट दिली. नाताळ सुट्टीमुळे बऱ्यापैकी गर्दी होती. संग्रहालयात गुरुदेव टागोरांची हस्तलिखिते, पत्रे, चित्रे, व्यक्तिगत वस्तू, त्यांनी वापरलेली गाडी इत्यादि संरक्षित संग्रहीकरण करण्यात आलेले आहे. संग्रहालय पहाताना अनेक गोष्टींचे आकलन होत जाते, आणि रवींद्रनाथ  टागोरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अनेक पदर अलगद आपल्यासमोर उलगडत जातात. परंतु एका गोष्टीचे वैषम्य वाटले, रविंद्रनाथ टागोरांना १९१३ मध्ये मिळालेला नोबेल पुरस्कार आणि त्यांच्या काही मौल्यवान वस्तु सन २००४ मध्ये ह्या संग्रहालयातून चोरीस गेल्या होत्या. मूळ पदक चोरीला गेल्यानंतर स्वीडिश सरकार आणि नोबेल फाऊंडेशनने विश्वभारती विद्यापीठाला नोबेल पदकाच्या एक सोन्याची आणि एक कांस्य अश्या दोन प्रतिकृती प्रदान केल्या. संग्रहालयात ह्या प्रतिकृती जतन केलेल्या आहेत.

उपासना गृह

उपासना गृह शांतिनिकेतनमधील एक ऐतिहासिक आणि सुंदर प्रार्थनागृह आहे. हया वास्तूला तिच्या काचेच्या बांधकामामुळे स्थानिक भाषेत ‘कांच मंदिर’ असेही म्हटले जाते. रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देबेंद्रनाथ टागोर यांनी ह्या उपासनागृहाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. सन २०२३ मध्ये संपूर्ण शांतिनिकेतन परिसराचा समावेश युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला, ज्यामध्ये उपासना गृह ही एक अत्यंत महत्त्वाची वास्तू आहे. या वास्तूची रचना लंडनमधील १८५१ च्या प्रदर्शनातील हाइड पार्क मध्ये बांधलेल्या प्रसिद्ध ‘क्रिस्टल पॅलेस’पासून प्रेरित आहे. उपासना गृहाच्या भिंतीना आणि दरवाजांना बहुरंगी बेल्जियन काचेचे (Belgian Glass) कलात्मक नक्षीकामाची सजावट आहे. प्रार्थनागृहाच्या चारही बाजूंनी दरवाजे आहेत. शांतिनिकेतनमध्ये बुधवार हा विश्रांतीचा आणि प्रार्थनेचा दिवस मानला जातो. दर बुधवारी सकाळी विश्वभारतीचे विद्यार्थी, शिक्षक आणि आश्रमवासी पारंपरिक वस्त्रात येथे जमतात. हयावेळी रवींद्रसंगीत गायले जाते. विशेष उत्सवाप्रसंगी उपासना गृहाला पारंपरिक अल्पना रांगोळी आणि मेणबत्त्यांनी सजवले जाते.

उत्तरायण संकुल

उत्तरायण कॉम्प्लेक्स हे शांतिनिकेतन मधील रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनाशी निगडीत असलेले विशेष ऐतिहासिक आणि महत्त्वाचे स्थान आहे. उत्तरायण कॉम्प्लेक्समध्ये रवींद्रनाथ टागोरांनी बांधलेली पाच महत्त्वाची घरे आणि संग्रहालये आहेत. टागोरांनी त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर ह्या वेगवेगळ्या वास्तुंमध्ये वास्तव्य केलेले होते.

शांतिनिकेतनमधील उत्तरायण परिसरात प्रवेश केल्यावर लक्ष वेधून घेणारी सर्वांत मोठी आणि भव्य वास्तू म्हणजे ‘उदयन’. १९२१ ते १९३८ या कालावधीत टप्प्याटप्प्याने या वास्तूची उभारणी करण्यात आली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान आणि शांतिनिकेतनला भेट देणाऱ्या खास पाहुण्यांच्या निवासाची सोय या दुहेरी उद्देशाने या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. ‘उदयन’, टागोरांच्या सर्वात प्रसिद्ध घरांपैकी एक. ज्याची रचना आधुनिक आणि पारंपारिक वास्तुकलेचा सुंदर मिलाफ आहे. उदयन म्हणजे सूर्योदय किंवा नव्या दिवसाची सुरुवात! या नावातही गुरुदेवांच्या विचारविश्वाचे आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते. उदयन हे केवळ गुरुदेवांचे निवासस्थान नव्हते, तर देश-विदेशातून शांतिनिकेतनला भेट देणारे नामवंत विद्वान, साहित्यिक आणि मान्यवर पाहुणे यांच्या स्वागताचेही ते महत्त्वाचे ठिकाण होते. ह्या वास्तूच्या परिसरात अत्यंत सुंदर विविधरंगी फुलांचा बगीचा फुलविलेला आहे.

‘कोणार्क’ म्हणजे गुरुदेवांच्या कल्पकतेचा अनोखा वास्तु आविष्कार आहे. १९१९ मध्ये बांधण्यात आलेल्या ‘कोणार्क’ घराचा प्रारंभ एका साध्या, मातीच्या भिंतींच्या आणि गवताच्या छपराच्या घरापासून झाला होता. सुरुवातीला या घराचे नाव ‘उत्तरायण’ असे होते. १९२२ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हया घरात अनेक बदल घडवून आणले आणि त्याला ‘कोणार्क’ असे नवे नाव दिले. या घराच्या प्रशस्त व्हरांड्यात गुरुदेव विद्यार्थ्यांसोबत नाटकांच्या आणि नृत्यनाट्यांच्या तालमी करत असत. तसेच त्यांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनही येथेच होत असे. विशेष म्हणजे, गुरुदेवांच्या प्रसिद्ध ‘नटीर पूजा’ (Natir Puja) या नृत्यनाट्याचा पहिला प्रयोग याच कोणार्क वास्तूत सादर करण्यात आला होता. गुरुदेवांच्या कलात्मक दृष्टिकोनाची, प्रयोगशील वृत्तीची आणि निसर्गाशी एकरूप होणाऱ्या वास्तुकल्पनेची साक्ष देणारे हे घर पाहताना जाणवते की, शांतिनिकेतनमधील प्रत्येक वास्तू ही केवळ इमारत नसून गुरुदेवांच्या विचारविश्वाचा आणि सर्जनशीलतेचा एक जिवंत आविष्कार आहे.

शांतिनिकेतनमधील ‘श्यामली’ हे मातीचे घर म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या साधेपणाच्या आणि निसर्गाशी एकरूप होण्याच्या विचारांचे प्रतीक आहे. हे मातीचे घर उष्णकटिबंधीय हवामानासाठी अनोखा प्रयोग केलेली एक वास्तू आहे या घराची वास्तुरचना प्रसिद्ध वास्तुविशारद सुरेंद्रनाथ कार यांनी केली होती. ७ मे १९३५ रोजी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ७४ व्या जन्मदिवसानिमित्त या घराचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिक कारागीर, संथाळ कामगार आणि शांतिनिकेतनमधील कलाकार यांच्या सामूहिक योगदानातून उभी राहिलेली श्यामली आजही गुरुदेवांच्या निसर्गप्रेमाची, कलादृष्टीची आणि ग्रामीण जीवनाशी असलेल्या नात्याची आठवण करून देते.

‘पुनश्च’ म्हणजे टागोरांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात (१९३६) वापरलेले आणखी एक घर. ‘पुनश्च’ ही वास्तू पाहताना गुरुदेवांची साधी राहणी, कल्पकता आणि प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची त्यांची वृत्ती प्रकर्षाने जाणवते.

‘उदीची’, पहिल्या मजल्यावरील खोली असलेले टागोरांचे शेवटचे निवासस्थान आहे. १९३८ ते १९३९ दरम्यान बांधलेली ही वास्तू रवींद्रनाथांच्या निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याच्या आणि मोकळे आकाश पाहण्याच्या इच्छेनुसार साकारण्यात आलेली होती. रवींद्रनाथ टागोर हयांनी हया घराला सुरुवातीला ‘सेंजुती’ (सायंकाळचा दिवा) असे नाव दिले होते, परंतु नंतर ते बदलून ‘उदीची’ ठेवले. संस्कृतमध्ये ‘उदीची’ म्हणजे उत्तर दिशा किंवा ‘वरच्या दिशेने झेपावणारे’ (rising) असा अर्थ होतो! रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे (१९४१ पर्यंत) येथेच घालवली. तळमजल्यावर ते विद्यार्थ्यांचे काव्यवर्ग (poetry classes) घेत असत.

विश्वभारतीच्या अवघ्या परिसरातून फेरफटका मारताना रवींद्रनाथ टागोरांच्या शैक्षणिक संकल्पनेचे मूर्त स्वरूप शांतिनिकेतनमध्ये साकारलेले जाणवते. एकंदरीतच शांतिनिकेतनच्या भेटीने आपल्याला भारावून जायला होते. शांतिनिकेतनचा निरोप घेऊन आम्ही श्रीजनी शिल्पग्राम येथे गेलो.

श्रीजनी शिल्पग्राम

विश्व भारती विद्यापीठांपासून काही अंतरावर २६ एकर परिसरात वसलेले हे एक सांस्कृतिक कलाग्राम आहे. भारताच्या पूर्व आणि उत्तरपूर्व राज्यांमधील समृद्ध पारंपरिक कला, संस्कृती, जीवनशैली आणि हस्तकला येथे प्रदर्शित केलेल्या आहेत.  विभिन्न राज्यातील ग्रामीण शैलीतील घरांच्या रचना येथे साकारलेल्या आहेत. येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असते. इतिहासप्रेमी आणि कलाप्रेमी पर्यटकांनी जरूर भेट द्यावी असे ठिकाण म्हणजे – शिल्पग्राम.

श्रीजनी शिल्प ग्रामच्या परिसरात संथाल समाजातील नर्तक आणि वादक त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल-ताशांच्या वैशिष्ट्यपूर्ण तालावर नृत्य सादर करून पर्यटकांचे मनोरंजन करतात. आम्ही देखील पारंपरिक संथाल लोककलाकरांनी सादर करीत असलेल्या नृत्यामध्ये सहभागी झालो. परंतु सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यटन स्थळे बंद होत असल्याने आम्ही शिल्पग्राम मधून सुरूल राजबाडीकडे रवाना झालो.

सुरूल राजबाडी

शांतिनिकेतन पासून साधारण ७ किलोमीटर अंतरावर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरूल गावात एका जमीनदार कुटुंबाने बांधलेला २९० वर्षे जुना ऐतिहासिक वाडा आहे. स्थानिक लोक ह्याला ‘सरकार बारी’ किंवा किंवा ‘सुरूल बाराबारी’  म्हणून ओळखतात. ह्या वाड्याचा बाह्यभाग पहाण्यासाठी पर्यटकांकडून रू. १०/- इतके नाममात्र शुल्क आकारले जाते. वाड्याच्या आतील भाग खाजगी निवासस्थान असल्याने तिथे प्रवेश मर्यादित आहे. राजबाडी मध्ये प्रवेश करताक्षणीच ह्या वाडयासंबंधीत माहिती फलक लावलेला आहे.

माहिती फलकावर नमूद केल्यानुसार ह्या जमीनदार कुळाचे पूर्वज भारतचंद्र घोष हे बर्धमान येथील बांका नदीच्या काठावर वसलेल्या छोटोनिलपूर या गावचे रहिवासी होते. त्यांच्या गुरूच्या सल्ल्यानुसार सुरूल गावात रहाण्यास आले. ह्या जोडप्याला मुळबाळ नव्हते, त्यांनी श्याम सुंदराची दररोज पूजा केली आणि त्यांना कृष्णहरी नावाचा मुलगा झाला. त्यानंतर हे कुटुंब सुरूल गावातच स्थायिक झाले. सागरी व्यापारातून कृष्णहरी आणि त्यांच्या मुलांची भरभराट झाली. ह्या कुटुंबाचे व्यापारातील यश, समाजातील लोकप्रियता आणि प्रतिष्ठेची दखल घेऊन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना ‘सरकार’ ही पदवी दिली. त्यानंतर त्यांचे मूळ ‘घोष’ आडनाव मागे पडून ‘सरकार’ हे नाव रूढ झाले.

हया वाड्याची बांधणी १७५० च्या दशकात कृष्णहरीचे पणतू श्रीनिवास सरकार यांनी केली होती. जवळच्या इल्लमबाजार येथील साहेब घाट बंदरातून सुटणाऱ्या जहाजांसाठी शीड (sails) विकून त्यांनी मोठी संपत्ती कमावली होती. वाड्यामध्ये विस्तीर्ण अंगण, भव्य कमानी आणि उंच खांब असलेले ठाकूर दलान (Thakur Dalan) व नट-मंदिर आहे. काळाच्या ओघात कुटुंबाचे विभाजन झाल्यामुळे वाड्याचे ‘बडो तर्फ’ (Boro Taraf) आणि ‘छोटो तर्फ’ (Choto Taraf) असे दोन भाग पडले. वाड्याच्या परिसरात १८३० च्या दशकात बांधलेली वैशिष्ट्यपूर्ण टेराकोटा नक्षीकाम असलेली मंदिरे आहेत. यामध्ये पंचरत्न शैलीतील लक्ष्मी-जनार्दन मंदिर आणि जुळी आटचाला शिवमंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. आटचाला शिवमंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. मंदिरांच्या भिंतींवर रामायणातील युद्धप्रसंग आणि युरोपियन लोकांची चित्रे कोरलेली आहेत.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सुरूल हे व्यापाराचे मोठे केंद्र होते. श्रीनिवास सरकार आणि त्यांच्या भावांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने युरोपमध्ये नीळ (Indigo), जहाजांच्या शिडासाठी लागणारे खास कापड (गारा कापर), लाल रंग, तांदूळ आणि साखरेची निर्यात केली. अजोय, कोपाई आणि कुयेन नद्यांच्या मार्गे हा व्यापार चालत असे. ब्रिटिश राजवटीत सुरूल हे व्यापार आणि वाणिज्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले. पुढे ह्या कुटुंबाने बीरभूम आणि बर्धमान भागातील मोठी जमीनदारीही मिळवली. सद्गोप समाजाचे नेते मानल्या जाणाऱ्या श्रीनिवास सरकार यांच्या काळात त्यांच्या घराण्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. ब्रिटिश काळात हया भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासात ह्या कुटुंबाने महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारती आणि श्रीनिकेतन यांच्या स्थापनेत व विकासात हया कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे.

सुरूल राजवाड्याची दुर्गा पूजा ही बंगालमधील सर्वात जुन्या ‘बोनेदी बारी’ (खानदानी घराण्यांच्या) पूजांपैकी एक मानली जाते. येथील दुर्गा पूजा सुमारे तीन शतकांहून अधिक जुनी आहे. आजही ‘सुरूल बाराबारी डेबोटर ट्रस्ट’ (Surul Barabari Debottar Trust) मार्फत येथील सर्व मंदिरांची दैनंदिन पूजा आणि उत्सव मोठ्या थाटामाटात पार पाडले जातात. कृष्णहरी आणि श्रीनिवास सरकार यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जाते. येथील दुर्गा देवीची मूर्ती दरवर्षी एकाच पारंपारिक रूपात हाताने घडवली जाते आणि तिला सुमारे ३०० वर्षे जुन्या पारंपारिक दागिन्यांनी सजवले जाते. उत्सवाच्या काळात नट-मंदिरात एरंडेल तेलावर पेटणारे बेल्जियम काचेचे झुंबर लावले जातात. आजही सरकार कुटुंबाचे वंशज षष्ठी ते दशमी दरम्यान ही पूजा मोठ्या उत्साहात साजरी करतात. उत्सवाचे दरम्यान वाड्यावर आकर्षक रोषणाई केली जाते आणि स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होतात.

सुरूल राजबाडी वाड्याचे जुने शाही वैभव आणि शांत ग्रामीण परिसर यामुळे येथे अनेक गाजलेल्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी हया परिसराचा वापर आपल्या कलाकृतींसाठी केला आहे. सुरूल राजबाडी पहाताना सायंकाळ झाली. आमच्या itinerary मधील आमार कुटीर आणि सोनाझुरी हाट भेट अद्याप शिल्लक होती! आम्ही राजबाडीमधून काढता पाय घेत आमार कुटीरमध्ये मोर्चा वळविला.

आमार कुटीर

स्वातंत्र्यसैनिक कै. सुसेन मुखोपाध्याय यांनी १९२३ च्या सुरुवातीला, रवींद्रनाथ टागोरांच्या ग्रामीण पुनर्रचनेच्या उद्दिष्टांनुसार आमार कुटीरची स्थापना केली. आमार कुटीरचा ​​चामड्याचा कारखाना हा संस्थेच्या सर्वात जुन्या उपक्रमांपैकी एक आहे. त्यांच्या कारखान्यात बॅग, पर्स, बेल्ट इत्यादी विविध उत्पादने बनवली जातात. येथील चामड्याच्या बॅग त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. बाटिक प्रिंट हे खूप काळापासून शांतिनिकेतनचा एक भाग आहे. बाटिक उत्पादने, विशेषतः येथील साड्या, तेथील कारागिरांच्या कलात्मक प्रतिभेचा आणि कौशल्याचा पुरावा आहेत. येथील प्रमाणित आदिवासी कारागीर उत्कृष्ट पितळी मूर्ती, पारंपरिक नक्षीकाम, गृहसजावटीच्या वस्तू आणि दागिने हाताने घडवतात. अमर कुटीरच्या कॅम्पसमध्ये एक शोरूम आहे, जिथे कांथा, बाटिक इत्यादी विविध प्रकारच्या कपड्यांपासून ते गृहसजावटीपर्यंत अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. अनेक दशकांपासून सर्व प्रकारच्या कलात्मक वस्तूंसाठी हे एक प्रमुख ठिकाण बनले आहे. आम्ही आमार कुटीरमध्ये खरेदी करण्यात रमून गेलो.

तेथून सोनाझुरी हाटला धावती भेट दिली. शनीवारचा बाजार म्हणजे सोनाझुरी हाट! एव्हाना काळोख झालेला होता. त्यामुळे आम्ही लगबगीने एक फेरफटका मारून पुन्हा आमच्या हॉटेलवर परतलो. हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि आमच्या बॅग्ज घेऊन बोलपूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. बोलपूर स्टेशनसमोर रविंद्रनाथ टागोरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दोन मजली गीतांजली रेल्वे संग्रहालय उभारलेले आहे. संग्रहालयामध्ये टागोरांची दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे, त्यांच्या गद्य आणि पद्य रचनांचे फलक प्रदर्शित केलेले आहेत. ह्याच संग्रहलयामध्ये त्यांचा जुलै १९४१ मधील बोलपूर-कलकत्ता ह्या अंतिम प्रवासाचा रेल्वे सलून कोच जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

बोलपूर-शांतिनिकेतन स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर

आमची कोलकात्याच्या दिशेने जाणारी वंदे भारत ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन पोहोचली आणि आम्ही ट्रेन मध्ये आसनस्थ झालो. बोलपूर स्टेशनवरून वंदे भारत ट्रेनने कोलकात्याच्या दिशेने वेग घेतला आणि गीतांजली-Song Offering मधील गुरुदेवांनी जुलै १९४१ मध्ये याच मार्गावरून केलेल्या एका वेगळ्या प्रवासाचे वर्णना संबंधी केलेले काव्य आठवले! २५ जुलै १९४१ रोजी आजारी असलेल्या ८० वर्षीय रविंद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनमधील आपल्या प्रिय आश्रमाचा अखेरचा निरोप घेतला. टागोरांना बोलपूर स्थानकावर नेण्यापूर्वी विद्यार्थी आणि रहिवासी त्यांच्या उदयन निवासस्थानाबाहेर मूक प्रार्थनेसाठी जमले होते. वैद्यकीय उपचारांसाठी गुरुदेव टागोर बोलपूर स्थानकावरून हावड्याकडे जाणाऱ्या विशेष सलून रेल्वे डब्यातून रवाना झाले. शांतिनिकेतनमधील आपल्या आवडत्या लाल मातीचा निरोप घेत आजारी गुरुदेवांनी शांतिनिकेतनहून कलकत्त्याला केलेला तो अखेरचा प्रवास होता. त्यांना त्यांच्या कलकत्ता येथील वडिलोपार्जित जोरासांको ठाकूर बारी निवासस्थानी नेण्यात आले. तेथे ३० जुलै रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि ७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचे निधन झाले.

बोलपूरचा प्लॅटफॉर्म मागे सोडताना, जणू गीतांजलीतील ते चिरंतन शब्द कानात घुमत होते:

"At this time of my parting, wish me good luck, my friends! The sky is flushed with the dawn and my path lies beautiful. Ask not what I have with me to take there. I start on my journey with empty hands and expectant heart. I shall put on my wedding garland. Mine is not the red-brown dress of the traveller, and though there are dangers on the way I have no fear in my mind. The Evening star will come out when my voyage is done and the plaintive notes of the twilight melodies be struck up from the King's gateway."

रिकाम्या हातांनी आणि आशेने भरलेल्या अंतःकरणाने मी माझा प्रवास सुरू करतोय. वाटेत संकटे असली तरी माझ्या मनात कसलीही भीती नाही.

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’मधील हे ९४ वे गीत टागोरांचा मृत्यूकडे पाहण्याचा एक अत्यंत सकारात्मक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन दर्शविते. टागोरांनी मृत्यूला जीवनाचा दुःखद शेवट न मानता, रिकाम्या हातांनी पण प्रेमळ अंतःकरणाने ईश्वराशी एकरूप होण्याचा एक मंगल परिणय सोहळा मानला आहे. शांतिनिकेतन, तेथील विश्वभारतीचा परिसर, आणि तेथे टागोरांच्या जतन केलेल्या आठवणींमधून गुरुदेव शांतिनिकेतनमध्ये आपल्याला पदोपदी भेटत राहतात. बहुआयामी, कमालीचा व्यासंग असलेल्या प्रतिभाशाली कविगुरु टागोरांचा जणू जीवनपट उलगडणारी ही ठिकाणे आपल्याला स्तिमित करतात आणि जीवनाबद्दल खूप मोठी प्रेरणा देऊन जातात. जीवनाकडे पहाण्याचा एक आगळा वेगळा दृष्टिकोण देतात.

"आमार माथा नत करे दाओ हे तोमार चरणधूलार तले।
सकल अहंकार हे आमार डुबाओ चोखेर जले॥"

अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने || नेईल जेव्हा तितुक्या करांनी, सांभाळीशी तू किती दो करांनी||

एक अष्टपैलू, प्रतिभावान व्यक्तिमत्वाच्या कर्मभूमीला भेट देण्याचे समाधान मिळाले आणि एका अनोख्या प्रेरणेने आम्ही कोलकात्याला परतलो. रात्री अकरा वाजता हावडा स्टेशनला पोहोचलो. आमची मैत्रीण गाडी घेऊन आम्हाला नेण्यासाठी स्टेशनवर हजर होतीच! आमची कार साऊथ एव्हेन्यूच्या दिशेने निघाली. पुढील दोन दिवस आम्ही कोलकाता मुक्कामी होतो!


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑