उत्तराखंड राज्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या दोन प्रमुख विभाग मानले जातात — गढवाल आणि कुमाऊं. गढवाल प्रदेश चारधाम यात्रा, पंचकेदार, हरिद्वार, ऋषिकेश यांसारख्या तीर्थ स्थळांसाठी, तसेच अनेक प्रसिद्ध हिमालयीन ट्रेकसाठी सर्व परिचित आहे. त्यामुळे बहुतेक पर्यटकांचा ओढा गढवालमधील परिचित पर्यटन स्थळांकडे अधिक दिसतो. कुमाऊं प्रदेश मात्र तुलनेने शांत, कमी गजबजलेला आणि अनेक अद्याप अपरिचित राहिलेल्या निसर्गरम्य ठिकाणांनी समृद्ध आहे. कुमाऊं प्रदेशातील अत्यंत दुर्गम भागात ‘दारमा व्हॅली’ सारखी नितांत निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेली अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. अत्यंत दुर्गम भागात असल्याने अद्यापही बहुतांशी लोकांना ही ठिकाणे अवगत नाहीत.
दारमा व्हॅली प्रामुख्याने तेथे होणाऱ्या ‘दारमा व्हॅली ट्रेक, पंचाचुली बेस कॅम्प ट्रेक’ ह्या पदभ्रमण मोहिमांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील शेवटची जुळी गावे – ‘दांतू’ आणि ‘दुग्तू’ म्हणजे स्थानिक जमातीचे अस्तित्व राखणारी ठिकाणे! दुग्तू गावांमधून पंचाचुली बेस कॅम्प मोहीम सुरू होते.
आदि कैलाश – ॐ पर्वत यात्रेच्या परतीच्या प्रवासात ‘दारमा व्हॅली’ ला एक दिवस नियोजित मुक्काम होता. इतक्या दूर आल्यावर धारचुलापासून अवघ्या ७०-८० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘दारमा व्हॅली’ला भेट न देता जाणे म्हणजे पुन्हा ह्या प्रदेशात येण्यासाठी संधीची वाट पहाणे! त्यामुळे आम्ही मित्र मंडळींनी परतीच्या प्रवासात ‘दारमा व्हॅली’ मुक्कामाला एकमताने पसंती दिली. ॐ पर्वत दर्शन करून आम्ही गुंजीमार्गे धारचुला येथे आलो. खरं तर धारचुलापूर्वी साधारण १८ किलोमीटर अलीकडे तवाघाट ब्रिजजवळ उजवीकडे एक रस्ता दारमा व्हॅलीकडे जातो. आम्ही दुपारच्या जेवणाकरिता धारचुला येथे गेल्याने पुन्हा माघारी येऊन दारमा व्हॅलीकडे प्रस्थान केले. काही अंतरावर आमच्या कंपू मधील आमचे एक मित्र नारायण आश्रमामध्ये दोन दिवसांकरिता वास्तव्य करून होते, त्यांना सोबत घेऊन आमची गाडी पुन्हा अत्यंत डोंगराळ रस्त्यावरून पुढे मार्गक्रमण करू लागली. निसर्गाची हिरवाई मनाला आनंद देत होती. पण काही अंतर पुढे गेल्यावर मात्र रस्ता अगदी ओबडधोबड आणि अत्यंत धोकादायक होत गेला. बऱ्याच ठिकाणी मोठाले दगड रस्त्यापर्यंत घरंगळत आलेले होते. असंख्य निर्झर मनसोक्त खळाळत होते. अत्यंत वळणा-वळणाच्या रस्त्याने आम्ही दिवस मावळताना दारमा व्हॅली मधील ‘दांतू’ गावामध्ये पोहोचलो.
दारमा व्हॅली
पिथौरागढ जिल्ह्यात कुमाऊं हिमालयाच्या पूर्वेकडील कोपर्यात दोन पर्वतरांगांनी विभागलेल्या खोऱ्यांमध्ये ‘दारमा व्हॅली’ पसरलेली आहे. पूर्वेला व्यास व्हॅली आणि पश्चिमेला जोहर व्हॅली! दारमा व्हॅली ‘सिन ला’ खिंडीद्वारे व्यास व्हॅलीला जोडलेली आहे, जिथे आदि कैलाश पर्वत आहे आणि ‘सेला पास’ मार्गे कुटी गावाला! पंचाचुली ग्लेशियर मधून उगम पावणारी हिमनदी ‘न्योला यांकती’, दुग्तू आणि दांतू ह्या जुळ्या गावांमधून प्रवाही होत तवाघाटजवळ धौलीगंगा नदीला येऊन मिळते. भारत-तिबेट सीमेवर वसलेली ‘दारमा व्हॅली’ अतिशय निसर्गरम्य आणि जैवविविधतेने नटलेली आहे.
दारमा खोऱ्यामध्ये मोजकीच लोकसंख्या असलेली अवघी १२ ते १४ लहान गावे (tribal villages) वसलेली आहेत. हया दुर्गम गावांमध्ये शोक/रुंग समाजाचे लोक राहतात. ह्या समाजाला मूळ हिमालयीन लोक म्हणून ओळखले जाते. हया समाजाचे पूर्वज प्राचीन पर्वतीय खिंडींमधून भारत-तिबेटमध्ये व्यापार करीत असत. नागलींग, दुग्तू, दांतू हया गावांमधील ह्या स्थानिकांची शेकडो वर्षे जुनी दगड आणि लाकडापासून बनविलेली पारंपारिक घरे त्यांच्या प्राचीन परंपरांची प्रचिती देतात. गावातील रहिवासी प्रामुख्याने शेती, पशुपालन करून त्यांची उपजीविका करतात. शेतामध्ये बटाटे, बकवीट, राजमा अशी पिके घेतात.

समुद्र सपाटीपासून सुमारे १२,००० फूट उंचीवर वसलेल्या दारमा व्हॅली मधील दांतू आणि दुग्तू ही गावे लोकवस्ती असलेली शेवटची गावे म्हटले तर वावगे ठरणार नाही! हिवाळ्यात ह्या गावांमधील रहिवासी रीतसर त्यांची घरे बंद करून धारचुला किंवा लगतच्या कमी उंचीच्या गावांमध्ये स्थलांतरित होतात. कारण येथे होणार्या तीव्र हिमवृष्टीमुळे ही गावे हिवाळ्यामध्ये बर्फाच्या चादरीखाली झाकून जातात. प्रचंड थंडी, खाण्या-पिण्याच्या आणि दैनंदिन साधनांच्या टंचाईमुळे गावामधील दैनंदिन जीवन अशक्यप्राय होऊन जाते.
दारमा व्हॅली खरं तर तिथे होणार्या पारंपरिक ६० किलोमीटर अंतराच्या ‘दारमा व्हॅली’ पदभ्रमण मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे. दारमा व्हॅली मधून जाणारा ट्रेक रूट तेथील लहान गावांमधून जातो. ह्या गावांमध्ये होम स्टेची व्यवस्था केली जाते. ह्या गावांमधील होमस्टेच्या माध्यमातून स्थानिक खाद्य संस्कृती आणि लोकजीवन अनुभवता येते. दारमा व्हॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचाचुली पर्वत शिखरे! महाभारतातील आख्यायिकेनुसार ही पाच शिखरे पाच चुलींचे प्रतीक मानली जातात, जिथे पांडव बंधुनी स्वर्गारोहणापूर्वी त्यांचे शेवटचे भोजन तयार केले अशी मान्यता आहे. पंचाचुली बेस कॅम्प ट्रेक हा येथील अत्यंत निसर्गरम्य ट्रेक आहे.
आम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर दांतू मधील आमच्या ‘हिमालयीन ब्लू शिप’ या रिसॉर्टमध्ये पोहोचलो. रिसॉर्ट परिसर अगदी नितांत सुंदर होता. रस्त्यालगत रिसॉर्टचे प्रवेशद्वार आणि कॅफे आणि खालच्या दिशेला कॉटेजेस्. रिसॉर्ट इतकं मोक्याच्या ठिकाणी होतं की, आमच्या खोलीच्या खिडकीच्या मोठ्या तावदानांमधून थेट पंचाचुली शिखरांचे दर्शन होत होते. नुकत्याच दाटून आलेल्या अंधारात हिमाच्छादित पर्वत शिखरे जणू रजत तराणा गात होती. दगड आणि लाकडाचा वापर करून बनवलेल्या कॉटेजेस् अतिशय आरामदायी आणि मूलभूत सोयींनी सज्ज होत्या. कॉटेज समोर निगुतीने हिरवळ राखलेली होती. आजूबाजूला छोटी फुलझाडे लावलेली होती. मन सुखावले! पण आम्ही पोहोचताच रिमझिम पाऊस पडू लागला. मग काय, आम्ही गरमागरम चहा पकोडे मागवले. चहा-पकोड्यांनी आमचा श्रमपरिहार झाला. गप्पा-गोष्टी करण्यात वेळ कसा गेला समजले नाही. इथे सर्व उपकरणे सौर ऊर्जेवर चालत होती.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच जाग आली, कारण हिमालयातील सूर्योदय हा खासच असतो! खिडकीतून डोकावल्यानंतर पंचाचुली शिखरे अगदी सुस्पष्ट समोर दिसत होती. अद्याप सूर्योदय झालेला नव्हता. आम्ही सर्वानी आपापल्या खोल्यांमधून बाहेर हिरवळीवर धाव घेतली. पहाटेचे साधारण पाच वाजले होते.
दांतू आणि दुग्तू ही गावे चहुबाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेली आहेत. दांतू आणि दुग्तू गावाच्या मधून एक नदी वाहते. नदीच्या वरच्या बाजूला दांतू आणि खालच्या बाजूला दुग्तू गाव आहे. दांतू गावामधून समोर दिसणाऱ्या डोंगरावर विपुल वृक्षराजी दिसत होती.

काही क्षणातच चौफेर पर्वतांनी वेढलेल्या अवघ्या खोऱ्यामध्ये क्षितिजावर रंगांचा खेळ सुरू झाला. समोर पंचाचुली पर्वत शिखरांवर एक अद्भुत नजारा दृष्टीस पडू लागला. प्रथम पंचाचुली पर्वतांचे मुकुटमणी नारिंगी रंगाने लकाकू लागले. यथावकाश पांचही हिमशिखरांचे जणू सोनेरी मुकुट झळाळू लागले आणि काहीच क्षणात अवघी पंचाचुली पर्वतशिखरे नखशिखांत सोनेरी रंगात झगमगू लागली. त्या पर्वत शिखरांवरील नजारा पाहून वाटू लागले, जणू सुवर्णभस्माच्या राशी समोर चमकत आहेत. तेवढ्यातच काही निळ्या करड्या ढगांनी त्यांच्यावर छत्र धरले आणि त्यांच्या आडून सोनेरी मुलामा धारण केलेली पंचाचुली शिखरे अधिकच दैदीप्यमान दिसू लागली. अगदी अद्भुत आणि अवर्णनीय निसर्ग दृश्य होते! दांतू आणि दुग्तू गावाच्या पार्श्वभागी असलेल्या पर्वतरांगांमधून हळूहळू सुर्यकिरणांचे झोत वर येताना दिसू लागले आणि पंचाचुली हिमशिखरे त्यांची शुभ्र प्रावरणे परिधान करून सुसज्ज झाली. मी आतापर्यंत हिमालयात पाहीलेल्या सुर्योदयांपैकी सर्वात अवर्णनीय असा सूर्योदयाचा नजारा होता! निसर्गाच्या ह्या रंगोत्सवाने आम्हाला पाऊण तास रिसोर्टच्या हिरवळीवर खिळवून ठेवले होते. हा नजारा पाहताना आणि फोटो काढताना हात थंडीमुळे गारठले ह्याचे देखील भान राहीले नाही!

आम्ही सर्वजण सकाळचा सैरसपाटा करण्यास निघालो. मला पंचाचुली बेस कॅम्पच्या झीरो पॉइंटपर्यंत ट्रेक करून येण्याची इच्छा होती. मी त्या जुळ्या गावांमधील स्थानिक जनजीवन पाहात दुग्तू गावाजवळ ज्या ठिकाणी ट्रेक सुरू होतो तिथवर येऊन पोहोचले. माझे सोबती खूप मागे राहीले होते. रस्त्याच्या बाजूला एका टेबलवर पावती पुस्तक घेऊन एक सद्गृहस्थ बसलेला होता. तिथून वरच्या दिशेला जंगलाकडे पायवाट जात होती. ट्रेक रूटवर जाण्यासाठी किरकोळ रक्कम भरून पावती देत होते. माझ्याकडे किमान दोन तासांचा अवधी होता. एका तासामध्ये जितके अंतर चालून जाता येईल तिथवर जाऊन माघारी फिरायचे ह्या विचाराने मी प्रवेश फीचे सोपस्कार पूर्ण करून त्या ट्रेक रूटवर चालू लागले.

सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये मध्यम स्वरुपाची चढाई सहजच पार झाली. दीड ते दोन किलोमीटर अंतर पार करून एका मोठ्या उंच दगडावर उन्हं अंगावर घेत निवांत बसले. तिथून मार्ग पुन्हा दोन पायवाटांमध्ये विभागलेला होता. जिथे पायवाट विभागली जाते तिथून एक रस्ता अगदी घनदाट निसर्गरम्य जंगलातून जातो. अगदी सोपा आणि निसर्गरम्य ट्रेक आहे. दुग्तू गावापासून पंचाचुली बेस कॅम्पपर्यंत पायी अंदाजे ४ किलोमीटर अंतर आहे. पण वेळेच्या कमतरतेमुळे अर्ध्या वाटेवरून खाली उतरून माझा मोर्चा पुन्हा दुग्तू गावाकडे वळविला. गावात एक फेरफटका मारताना, स्थानिक रहिवासी लोकांशी संवाद साधल्यावर त्यांच्या खडतर आणि कष्टप्रद जिवनमानाची कल्पना आली. ह्या गावांमध्ये वीज, मोबाइल नेटवर्क ह्याची वानवा आहे. सकाळच्या शुद्ध हवेत रपेट झाल्याने शरीर आणि मन दोन्ही उल्हसित झाले.
रिसॉर्टवर परतून कॅफेमध्ये बसून शुभ्र हिमाने नटलेली पंचाचुली पर्वतशिखरे नजरेत साठवत नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघालो. परतीच्या वाटेवर काही अंतरावर एका टी हाऊस जवळ थांबलो. पहाडी ‘ब्लॅक टी’चा आस्वाद घेतला. टी हाऊसच्या मालकीणबाई कडून तिथल्या स्थानिक शेतात पिकविलेला राजमा विकत घेतला. तिथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस मोठ्या दगडावर “कृपया आपका ध्यान किधर है, नेटवर्क इधर है” असा गंमतीशीर मजकूर लिहिलेला होता. त्याला कारणही तसेच होते! दारमा व्हॅलीमध्ये मोबाइल नेटवर्क मिळत नाही!

आज परतीच्या वाटेवर आमचा चौकोरी येथे मुक्काम होता. प्रवासाचा पल्ला देखील मोठा होता. चौकोरीला जाताना रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी जंगलांमध्ये वणवे पेटलेले दिसत होते. इतक्या प्रचंड प्रमाणात पसरलेला वणवा तेथील वनराजीचा नाश करीत होता हे पाहून मन विषण्ण झाले. आम्ही रात्री साडे आठ वाजता चौकोरीच्या नील गगन रिसॉर्टवर पोहोचलो.
चौकोरी

उत्तराखंड राज्यात पिथौरागढ जिल्ह्यामध्ये असलेले एक निसर्ग सुंदर थंड हवेचे ठिकाण म्हणजे चौकोरी! बेरीनाग तहसीलमध्ये वसलेले छोटेखानी चौकोरी एक निवांत सुट्टीचे ठिकाण आहे. फक्त आणि फक्त निसर्गात रममाण होऊन सुट्टीचा आनंद घ्यावयाचा असेल तर चौकोरी येथे मुक्काम नक्की करावा! बेरीनाग तालुका तेथील चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. चौकोरीचे दुसरे आकर्षण म्हणजे तेथून दिसणार्या हिमालयीन पर्वतशिखरांचे मनोरम दृश्य! आम्ही चौकोरीला ‘स्टॉपओवर’ म्हणजे फक्त रात्रीच्या मुक्कामासाठी थांबलो होतो. नीलगगन रिसॉर्ट अतिशय शांत आणि गावापासून दूर अंतरावर होते. रात्री प्रवासाच्या थकव्यामुळे जेवून झोपी गेलो. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून हॉटेल इमारतीच्या असलेल्या टेरेसवरून सूर्योदय पाहण्यासाठी गेलो. चौकोरीमधून नंदादेवी आणि पंचाचुली हिमशिखरांचे विहंगम दर्शन होते. परंतु जंगलामध्ये पेटलेल्या वणव्याने संपूर्ण वातावरण धूसर झालेले होते. त्यामुळे हिमपर्वतांच्या रांगा सुस्पष्ट दिसत नव्हत्या. हॉटेलच्या टेरेसमधून रिसॉर्टचा सुंदर कॅम्पस् दिसत होता. छान हिरवळ आणि फुलबाग फुलवलेली होती. रिसॉर्ट पासून काही अंतरावर जुने मंदिर किंवा आश्रम असावा. तेथून सकाळी भजनाचे सूर कानावर पडत होते. आमची सकाळ एकदम प्रसन्न झाली! आम्ही रिसॉर्टच्या परिसरात निवांत वेळ घालवला आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो.
पातालभुवनेश्वर – तेहतीस कोटी देवांचे घर!
आम्ही चौकोरीचा निरोप घेऊन परतीच्या वाटेवर पाताळ भुवनेश्वर ह्या एका विस्मयकारक स्थळाला भेट दिली. पाताळ भुवनेश्वर म्हणजे जणू अवघ्या तेहतीस कोटी देव-देवतांचे निवास स्थान!

उत्तराखंड राज्यातील पिथोरागड जिल्ह्यात गंगोलीहाट पासून चौदा किलोमीटर अंतरावर पाईन वृक्षांनी वेढलेल्या जंगलामध्ये चुनखडीच्या दगडांमध्ये तयार झालेली गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये शिव मंदिर आहे. भुवनेश्वर गावात वसलेल्या पाताळ भुवनेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून गावामधील पायवाटेने चालत गुहेपाशी यावे लागते. चुनखडी खडकांच्या विशिष्ट रचनेमुळे विविध रंग आणि आकाराचे भव्य स्टॅलॅक्टाईट आणि स्टॅलॅग्माइट आकार तयार झालेले आहे. पाताळ भुवनेश्वर गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच तिथे आपल्या जवळ असलेल्या सर्व वस्तू बॅग्स, कॅमेरा, फोन इत्यादी लॉकरमध्ये जमा कराव्या लागतात आणि प्रवेशासाठी तिकीट दिले जाते. हया सर्व गोष्टी गुहेमध्ये नेण्यास प्रतिबंध आहे. तेथील पुजारी तिकिटाप्रमाणे छोट्या समूहामध्ये माणसांना गुहेमध्ये प्रवेश देत होते. गुहेच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या एका छोट्या मंदिरात शंकराची पिंडी होती.
प्रवेशद्वारापाशी या गुहेतील मंदिराबाबत माहितीचा फलक लावलेला होता. जितकी पृथ्वी प्राचीन आहे तितकेच पाताळ भुवनेश्वर मंदिर प्राचीन असल्याचे सांगीतले जाते. स्कंद पुराणातील ‘मानसखंड’ या अध्यायानुसार, पाताळ भुवनेश्वर गुहेमध्ये त्रेतायुगानंतर द्वापारयुग आणि कलियुगाशी संबंधित अनेक रंजक कथा आणि रहस्ये दडलेली आहेत. त्रेतायुगात सूर्यवंशी (सुराया) अयोध्यापती चक्रवर्ती राजा ऋतुपर्ण यांनी ह्या पाताळ भुवनेश्वर गुहेचा शोध लावला होता. एका हरणाचा पाठलाग करताना राजा ऋतुपर्ण या गुहेत पोहोचले होते, जिथे त्यांना शेषनागाचे दर्शन झाले व त्यांनी महादेवासह ३३ कोटी देवांची रूपे पाहिली. द्वापारयुगामध्ये पांडवांनी येथे येऊन शिवपूजा व चौपड खेळल्याचे मानले जाते. द्वापारयुगानंतर अनेक शतके ही गुहा गुप्त राहिली होती. कलियुगात आदि शंकराचार्य यांनी या गुहेचा पुन्हा शोध लावला. त्यांनी गुहेचे धार्मिक महत्त्व ओळखून पूजा-अर्चा सुरू केली आणि येथे एक तांब्याचे शिवलिंग स्थापित केले. काशी येथील भंडारी कुटुंबातील पुजार्यांना येथील पूजेचा मान दिला जातो.
काही वेळ प्रतीक्षा केल्यावर आम्हाला गुहेमध्ये प्रवेश मिळाला. गुहेला अरूंद बोगद्यासारखे प्रवेशद्वार आहे. पाताळ भुवनेश्वर गुहा जमिनीपासून सुमारे ९० फूट खोल आहे. तिचा मुख्य रस्ता अत्यंत अरुंद आणि उभ्या चढणीचा आहे. अगदी अंग चोरून खऱ्या अर्थी नतमस्तक होऊनच गुहेच्या भिंतींना लावलेल्या संरक्षक साखळ्यांच्या आधाराने अगदी सरपटत सावधपणे ७० अंशाच्या कोनात थेट खालच्या दिशेला जाणाऱ्या दगडी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या ओबडधोबड पायऱ्या उतरून खोल गुहेत प्रवेश करावा लागतो. गुहेत प्रवेश करताना एक रोमांचकारी साहस केल्याचा अनुभव मिळतो.
गुहेत खाली उतरल्यावर खरोखरच पाताळात आल्यासारखे वाटते आणि आश्चर्याला पारावार उरत नाही. गुहेमध्ये एकदम गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाते. गुहेमध्ये प्राणवायुची कमतरता उद्भवू शकते. कदाचित ह्या कारणास्तव छोट्या समूहामध्ये पर्यटकांना गुहेमध्ये प्रवेश दिला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा, मोबाईल नसल्यामुळे गुहेमध्ये माहिती देणार्या पुजार्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले असते. पुजारी प्रथम पौराणिक कथांचे संदर्भ देण्यास सुरुवात करतात.
गुहेत प्रवेश करताना दगडी पायऱ्यांची रचना शेषनागाच्या पाठीसारखी दिसते. गुहेने संपूर्ण पृथ्वी आणि शेषनागाला धारण केले आहे, अशी मान्यता आहे. गुहेच्या छतातून पडणाऱ्या पाण्याच्या धारा थेट येथील शिवलिंगावर पडतात. हे पाणी थेट स्वर्गातील अमरावतीतून येते, असे मानले जाते. पाताळ भुवनेश्वर गुहेच्या आत चुनखडीच्या (Limestone) खडकांवर पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक हिंदू देवी-देवतांच्या नैसर्गिक आकृत्या आणि मूर्ती तयार झालेल्या आहेत. स्कंद पुराणानुसार या एकाच गुहेत हिंदू धर्मातील ३३ कोटी देव-देवतांचा वास असल्याचे मानले जाते. अवघ्या पौराणिक कथा आणि त्यामधील देव-देवता त्या गुहेत अवतरलेले आहेत.
गुहेमध्ये आदि गणेशाची एक मानवी शिळा (धड) दिसते. शंकरांनी रागात ज्या गणेशाचे मस्तक कापले होते, ते मस्तक येथेच पडले होते अशी श्रद्धा आहे. या शिळेच्या वरच्या दिशेला १०८ पाकळ्यांचे नैसर्गिक ‘ब्रह्मकमळ’ आहे, ज्यातून आदि गणेशाच्या मुखावर पाण्याचे थेंब पडतात. आदि गणेशाच्या या संरचनेजवळच पहारेकरी म्हणून कालभैरवाची रक्षक रूप दाखवणारी उघड्या तोंडाची आकृती पाहायला मिळते. गुहेत एका ठिकाणी देवराज इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावत हत्तीचे पदचिन्ह असल्यासारखी भव्य नैसर्गिक रचना खडकावर दिसते.
गुहेच्या आत लहान-लहान गुहांच्या रचनेत केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ आणि जगन्नाथ पुरी ह्या चार पवित्र धामांची हुबेहूब नैसर्गिक रूपे (शिवलिंग आणि मूर्ती) पाहायला मिळतात. गुहेत एका बाजूला भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांची छबी निर्माण झालेली दिसते. पाताळ लोकाची मुख्य देवता मानली गेलेली माता भुवनेश्वरी हिची पिंड स्वरूप आणि महाकालीची जीभ दर्शवणारी खडक रचना येथे आहे.
ब्रह्मदेव आणि माता सरस्वती यांचे प्रतीक मानला जाणारा हंस पक्षी उलटा बसलेला असल्यासारखी रचना देखील येथे दिसते. स्वर्गातील दिव्य पारिजात वृक्षाच्या मुळांसारखी हुबेहूब रचना या गुहेच्या भिंतींवर कोरली गेली आहे. गुहेमध्ये कामधेनुच्या सडासारखी नैसर्गिक चुनखडीची रचना आहे. पौराणिक कथेनुसार, सतयुगात आणि त्रेतायुगात या सडातून थेट दुधाची सतत धार वाहत असे आणि शिवलिंगावर पडत असे. कलियुग सुरू झाल्यानंतर या दुधाच्या धारेचे रूपांतर पाण्यात झाले. आजही या रचनेतून पाण्याचे थेंब शिवलिंगावर पडताना दिसतात. या सर्व रचना मानवनिर्मित नसून हजारो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून चुनखडीच्या खडकांवर कोरल्या गेल्या आहेत. ह्या गुहेची सफर आपल्याला खरोखरच थक्क करते.
पाताळ भुवनेश्वर गुहेमध्ये कलियुगाच्या अंताचे रहस्यही दडलेले आहे! गुहेत चार दगडांचे स्तंभ आहेत, जे चार युगांचे (सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग) प्रतीक मानले जातात. यातील ‘कलियुग स्तंभ’ हा सर्वात रहस्यमयी आहे. या स्तंभावर एक पिंड (लिंग) स्थापित आहे. असे मानले जाते की, हा पिंड दरवर्षी हळूहळू वरच्या छताकडे सरकत आहे. पौराणिक कथेनुसार, ज्या दिवशी हा पिंड वरच्या छताला स्पर्श करेल, त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल आणि जग नष्ट होईल.
स्कंद पुराणानुसार, या गुहेला पूर्वी चार मुख्य प्रवेशद्वार होते, जे वेगवेगळ्या कालखंडाचे आणि मोक्षाचे प्रतीक होते. रणद्वार हा पहिला दरवाजा – कुरुक्षेत्रावरचे महाभारत घडविणारे युद्ध संपल्यानंतर हा दरवाजा कायमचा बंद झाला. पापद्वार- हा दरवाजा पापांचा नाश करणारा मानला जात असे. लंकेचा राजा रावण याचा वध झाल्यानंतर हा दरवाजा बंद झाला. धर्मद्वार – हा दरवाजा धर्माचे प्रतीक आहे. द्वापारयुगात युधिष्ठिर जेव्हा सदेह स्वर्गात गेला, त्यानंतर हा रस्ता बंद झाला. मोक्षद्वार – सध्या केवळ एकच प्रवेशद्वार खुले आहे, ज्यातून भाविक गुहेच्या आत प्रवेश करतात. असे मानले जाते की, या गुहेत प्रवेश केल्याने मनुष्याला थेट मोक्ष मिळतो.
गुहेतून अत्यंत गुप्त आणि रहस्यमयी रस्ता थेट महादेवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताकडे जातो. जुन्या काळी ऋषी-मुनी आणि सिद्ध पुरुष या गुहेच्या मार्गाने कैलास मानसरोवर यात्रेला जात असत, अशी मान्यता आहे.
पाताळ भुवनेश्वर गुहा म्हणजे विज्ञानाचा नैसर्गिक चमत्कारच! भूगर्भशास्त्रानुसार (Geology) संपूर्णपणे चुनखडीच्या खडकांनी बनलेली ही एक कार्स्ट गुहा (Karst Cave) आहे, जी लाखो वर्षांच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेली आहे. पावसाचे पाणी हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेते, ज्यामुळे सौम्य ‘कार्बोनिक ॲसिड’ तयार होते. हे अम्लीय पाणी जेव्हा जमिनीतून पाझरून चुनखडीच्या खडकांवरून वाहते, तेव्हा चुनखडी पाण्यात विरघळू लागते आणि खडकांमध्ये लहान-लहान पोकळ्या (Cavities) आणि मोठे बोगदे तयार होतात. यालाच आपण गुहा म्हणतो. गुहेच्या आत दिसणाऱ्या सर्व देवी-देवतांच्या मूर्ती आणि आकृत्या प्रत्यक्षात निसर्गाने बनवलेले स्टॅलॅक्टाइटस्आणि स्टॅलॅग्माइटस् आहेत. गुहेच्या छतातून जेव्हा चुनखडीयुक्त पाण्याचे थेंब खाली पडतात, तेव्हा छताला काही कॅल्शियमचा भाग चिकटून राहतो. लाखो वर्षांत हे थेंब साचून छताकडून जमिनीकडे वाढणारे टोकदार दगडांचे खांब तयार होतात. आणि ह्या संरचना कामधेनुचे सड किंवा छतावरील अमरावतीच्या धारा मानल्या जातात. छतातून खाली जमिनीवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांमधील कॅल्शियम जमिनीवर साचत जाते. त्यामुळे जमिनीकडून छताच्या दिशेने वाढणारे उभे दगडी खांब तयार होतात. ह्या आकाराना गुहेतील विविध शिवलिंगे आणि कलियुग स्तंभ म्हणून ओळख मिळते! जेव्हा छताकडून येणारा स्टॅलॅक्टाईट आणि जमिनीकडून वर जाणारा स्टॅलॅग्माईट एकमेकांना जोडले जातात, तेव्हा गुहेत एक मजबूत दगडी स्तंभ तयार होतो.
गुहेच्या आत अनेक छुपे पाण्याचे झरे आहेत. हे पाणी विशिष्ट आकृत्यांवरून अशा प्रकारे वाहते की जणू काही निसर्गानेच अभिषेक घालण्याची व्यवस्था केलेली आहे. थोडक्यात काय, पुजारी ज्या आकृत्यांना पौराणिक कथांच्या माध्यमातून देवी-देवतांची रूपे म्हणून दाखवतात त्या भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने लाखो वर्षांच्या कॅल्शियम कार्बोनेटच्या साचण्यामुळे (Deposition) तयार झालेल्या नैसर्गिक रचना आहेत. पण तरीही त्या सर्व संरचना आणि आकार इतके तंतोतंत पौराणिक संदर्भाशी जुळतात आणि आपली मती कुंठित करतात!
गुहेच्या आत नैसर्गिक छिद्रे नसल्यामुळे अधिक अंतर्गत भागात गेल्यावर एखाद्याला ऑक्सिजनची पातळी कमी होऊन त्रास होऊ शकतो. यामुळेच हृदयविकार किंवा दम्याचा त्रास असलेल्या लोकांना आत जाताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, गुहेच्या आत पाण्याचे सतत प्रवाह असल्याने तिथे बऱ्यापैकी गारवा जाणवतो. आम्ही गुहेतून पुन्हा रांगत बाहेर आलो. पाताळ भुवनेश्वर मंदिराच्या परिसरातून राजरंभा, पंचाचुली, नंदादेवी आणि नंदाखाट पर्वतशिखरांचे विहंगम दृश्य दिसते.
वृद्ध भुवनेश्वर.
पाताळ भुवनेश्वर गुहेपासून २०० मीटर अंतरावर वृद्ध भुवनेश्वर मंदिर परिसर आहे. वृद्ध भुवनेश्वर मंदिर एक प्राचीन ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळ आहे. हे मंदिर जमिनीच्या वर बांधलेले असून पाताळ भुवनेश्वर गुहेच्या अगदी जवळच आहे. वृद्ध भुवनेश्वराच्या दर्शनाशिवाय पाताळ भुवनेश्वर मंदिराची भेट पूर्ण होत नाही असा समज आहे. प्रशस्त प्रांगण असलेल्या मंदिराबाहेर अनेक भग्नावस्थेतील दगडी शिल्पे होती. मंदिरामध्ये शिवपिंडीची स्थापना केलेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार ह्या मंदिरात शंकर वृद्ध स्वरुपात निवास करतात असा समज आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात चंडी माता आणि दक्षिणमुखी हनुमानाचे देखील प्राचीन मंदिर पाहायला मिळते.

मंदिराच्या मागील बाजूने आम्ही पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो. दुपार होत आलेली होती. आमच्या पोटात भुकेने कावळे ओरडू लागल्याने रस्त्यालगत असलेल्या एका स्थानिक खानावळीमध्ये आम्ही दुपारचे जेवण घेऊन आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. बराच मोठा पल्ला पार करून आम्ही रात्री उशिरा काठगोदाम येथे पोहोचलो आणि आमच्या आदि कैलाश- ॐ पर्वत यात्रेच्या प्रवासाची सांगता झाली.
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
nice discription and detail information…. Nice blog
LikeLike
Thank you Adv Tejaswini.
Keep visiting अनवट वाटा for more such travel stories!
LikeLike