आदि कैलास – ॐ पर्वत यात्रा – भाग २

गुंजी म्हणजे आदि कैलास यात्रेचे प्रवेशद्वार! भारत-चीन(तिबेट) आणि नेपाळच्या सीमेवर समुद्र सपाटीपासून सुमारे १०,५०० फुट उंचीवर कुठी-यांक्ती आणि कालापानी नद्यांच्या संगमावर गुंजी वसलेले आहे. गुंजीचे हवामान वर्षभर थंड आणि अनिश्चित असते. खरं तर एक हंगामी, अगदी मोजक्या लोकवस्तीचे गाव! ह्या भागात भूतीया समाजातील मुख्यतः “ब्यांसी” जमातीचे लोक राहतात. त्यांची स्वत:ची अशी लोकसंस्कृती आणि भाषा आहे. कदाचित व्यास खोऱ्यामधील रहिवासी म्हणून त्यांच्या जमातीला ह्या नावाने ओळखत असावेत!

हिवाळ्यातील हाडे गोठवणाऱ्या थंडी आणि बर्फवृष्टिमुळे उन्हाळा संपल्यावर येथील लोक आपले पशुधन घेऊन धारचुला सारख्या सखल भागात स्थलांतर करतात आणि हिवाळ्यानंतर बर्फ वितळल्यावर पुन्हा गावात परततात. पुन्हा नव्या जोमाने शेती आणि पर्यटनावर आधारित कामकाज करतात. गुंजी गावात भारतीय लष्कर, इंडो-तिबेट सीमा पोलीस आणि सीमा रस्ते संघटनाचे जवान वर्षभर तैनात असतात. बीआरओच्या सौजन्याने अगदी जोलींगकाँगपर्यंत रस्ता झाल्याने येथे धार्मिक पर्यटनाला अधिक चालना मिळालेली आहे. बऱ्याच स्थानिकांनी होम स्टेचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.

आमच्या आदि कैलास-ॐ पर्वत यात्रेदरम्यान गुंजीला आमचा नियोजित मुक्काम होता. पारंपरिक कैलास-मानसरोवर यात्रेचा एक मुख्य पडाव म्हणून गुंजी गावाचे महत्त्व अनन्यसाधारण! आदि कैलास यात्रेसाठी हवामानाशी एकरूप होण्यासाठी गुंजी येथे वास्तव्य करणे फायदेशीर ठरते.

आदल्या दिवशी रात्री लवकर झोपल्याने अगदी पहाटे लवकरच जाग आली. मी अंथरुणातूनच खिडकीवरचा पडदा दूर सारला. काचांच्या मोठ्या तावदानातून दिसणारे दृश्य मनोरम होते. झुंजुमुंजु पहाट झालेली होती. अंधुक प्रकाश दिसू लागला. मी पटकन प्रातर्विधी उरकून तयार झाले आणि होम स्टेच्या बाहेर पळाले. समोरच्या पर्वतरांगामागून सहस्त्ररश्मिची कोवळी किरणे “उदयाचळी मित्र आला”ची वर्दी घेऊन आलेली होती. दूरवर हिमशिखरे सूर्य किरणांमुळे उजळताना दिसू लागली. निरभ्र निळ्या आकाशात सूर्यप्रकाशाची विलक्षण अभा फाकत गुंजीचे दरी-खोरे सोनसळी प्रकाशाने न्हाऊन निघाले! खोऱ्यामध्ये काली नदीचा सातत्याने वाहणार्‍या प्रवाहाचा मंद नाद कानात गुंजत होता. पक्षांची किलबिल कानावर पडत होती. आमच्या होम स्टेच्या मागच्या बाजूस पर्वतावरची हिरवीगार वनराजी पाहून मन प्रसन्न झाले. निसर्गाची दिनचर्या चालू झालेली होती! हवामान अगदी स्वच्छ आणि प्रसन्न होते. महादेव कधीही कोणाला नाराज करीत नाहीत आणि आज आदि कैलास पर्वताचे दर्शन घडणार ह्या कल्पनेनेच मन आनंदाने भरून आले!

आम्ही साधारण सकाळी सात वाजता आमच्या सामानासह गुंजीचा निरोप घेतला आणि इथून पुढे प्रवासाला खऱ्या अर्थी “आदि कैलाश-ओम् पर्वत” यात्रेचे स्वरूप आले! धारचुला ते गुंजी प्रवासात आमचा वाहन चालक – बादलने कधी  बॉलीवूड तर कधी कुमाऊंनी गाणी ऐकवली होती. पण आज त्याची ‘प्लेलिस्ट’ पूर्ण बदललेली होती. आज त्याचा मूड काही औरच होता! गाडी सुरू होताच शिव महिम्याने भारलेले सूर कानावर पडले. जसजशी गाडी पुढे जाऊ लागली, तसा निसर्ग आणि आमची मानसिक अवस्था सुद्धा बदलू लागली. त्या वातावरणात आम्ही देखील शिवमय होऊन गेलो.

गुंजी गावातून लोखंडी पूल पार केल्यावर रस्ता दोन वेगवेगळ्या दिशांना विभागला जातो. उत्तर-पूर्व दिशेला जाणारा रस्ता नाबी ढांग आणि लिपुलेख खिंडीकडे जातो. हा भारताचा पारंपरिक कैलास-मानसरोवर यात्रेचा मार्ग आहे. तर उत्तर-पश्चिम दिशेला जाणारा रस्ता कुटी गाव आणि पुढे जोलींगकाँगकडे जातो. हा रस्ता पुढे लंपिया धुरा खिंडीपर्यंत भारत-चीन सीमेजवळ जातो. हाच रस्ता पुढे आदि कैलाशपर्यंत जातो. ह्या मार्गाने जोलींगकाँग बेस कॅम्पपर्यंत थेट वाहनाने पोहोचता येते. जोलींगकाँग म्हणजे आदि कैलास – पार्वती सरोवर, गौरी कुंड येथे जाण्यासाठीचा मुख्य टप्पा.  

कुटी

गुंजीहून निघाल्यावर कुटी गाव येईपर्यंत पाइन, ओक, भोजवृक्ष आणि रोडोडेंड्रॉनच्या घनदाट जंगलांचे दर्शन घडत होते. कुटी-यांक्ती खोऱ्यातून जाणारा हा मार्ग अगदी चित्तथरारक आहे. झपाट्याने समुद्र सपाटीपासूनची उंची वाढत जाते आणि चहुबाजूंनी उंच बर्फाच्छादित हिमशिखरे आणि विस्तीर्ण दऱ्या आपल्याला दिसू लागतात.  वाटेत ‘कुटी’ नावाचे शेवटचे गाव लागते. कुटीला पुन्हा आमचा यात्रेचा परवाना तपासला गेला. आम्ही सर्व गाडीतून उतरलो. संपूर्ण कुटी गाव बर्फाच्छादित पर्वतरांगांनी वेढलेले होते. घरांच्या छपरांवर, अंगणात, रस्त्यावरील गाड्यांवर रात्रीपासून झालेल्या हिमवृष्टीमुळे शुभ्र बर्फाचे आच्छादन पसरलेले होते. दगडी बांधकाम असलेल्या घरांच्या छपरावरून हिम ओघळून पुन्हा त्याचे जल स्फटिक तयार झालेले होते. एका घराच्या अंगणात गरम कपड्यांमध्ये लपेटलेले दोन केसाळ कुत्रे पाहून तेथील थंड हवेची खरी कल्पना आली! हवा अधिकच थंड झाली.

पांडव किल्ला, कुटी

कुटी गाव एकदम साधं आणि शांत! पण पौराणिक गोष्टींशी नातं जोडणारे आहे. इथे एक भग्नावस्थेतला डोंगर आहे ज्याला पांडव किल्ला म्हटले जाते. स्थानिकांची अशी मान्यता आहे की, माता कुंती आणि द्रौपदीसोबत पांडव या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते, म्हणूनच ह्या गावाला ‘कुटी’ म्हणतात. आमचा यात्रेचा परवाना तपासणी झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो. कुटी गावानंतर मानवी वस्ती संपते.

जोलींगकाँग- आदि कैलास – पार्वती सरोवर

कुटीनंतर हिरवाई आणि हवा दोन्ही अधिकाधिक विरळ होत जातात. आता अवघा परिसर गगनाला गवसणी घालणार्‍या हिमशिखरांनी व्यापलेला होता! ओबडधोबड पर्वतांच्या अंगाखांद्यावर आदल्या रात्रीच्या हिमवर्षावामुळे शुभ्र हिमाची चादर पसरलेली होती! स्वच्छ नीलामय आकाश आणि गगनाला भिडणारी चमचमणारी हिमशिखरे अद्भुत जगात घेऊन जात होती. आम्ही साधारण पावणे नऊच्या सुमारास जोलींगकाँग वाहनतळापाशी पोहोचलो. बादलने आमची गाडी कुमाऊं मंडल विकास निगमच्या  इग्लू कॅम्पजवळ लावली. मी गाडीतून उतरण्यासाठी मा‍झ्या सर्व चीज वस्तुंची जमवाजमव करेपर्यंत माझे सोबती कुठे गायब झाले मला कळले देखील नाही!

मी गाडीतून उतरले आणि मला समोरच प्रथम दर्शन झाले “छोट्या कैलासाचे”! चौफेर बर्फाने आच्छादीत परिसर! पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. खरं तर अगदी दुर्गम आणि समुद्र सपाटीपासून १५,००० फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेले हे ठिकाण! पण बीआरओच्या सौजन्याने अगदी आदि कैलास पर्वत रांगेच्या पायथ्यापर्यंत म्हणजे जोलींगकाँगपर्यंत वाहन जाऊ शकत असल्याने बहुसंख्येने पर्यटक होते. पायी होणार्‍या यात्रेचे स्वरूप एका “रोड ट्रीप” मध्ये रूपांतरित झालेले होते. त्यामुळे आजूबाजूला थोडा बहुत कोलाहल होता. एका बाजूला एक मोठ्या चढणीवर लोकांचा जथ्था चालताना दिसत होता. एका बाजूला पार्वती सरोवर – शिव-पार्वती मंदिराकडे जाणारी चढण होती; तर दुसर्‍या बाजूला आदि कैलास पर्वतरांगा समोर उभ्या ठाकल्या होत्या.  सभोवतालचा परिसर बर्फाने झाकलेला असल्याने नेमके कुठे काय असावे ह्याचा अजिबात अंदाज येत नव्हता. नेमके कुठून सुरू करावे ह्या संभ्रमात असतानाच त्या भव्य आदि कैलास पर्वत शिखराने मा‍झ्या मनावर कब्जा केला! आणि मा‍झ्या मनाने थेट आदि कैलाशच्या पायथ्याशी असणार्‍या खुल्या मंदिराकडे जाण्याचा कौल दिल्यासारखी मी सरळ “छोट्या कैलासाच्या” चरण स्पर्शासाठी चालत निघाले. रस्त्याच्या कडेला लावलेल्या  फलकाने माझे लक्ष वेधून घेतले –

“शिव ही सृष्टी है और शिव ही प्रलय, शिव ही आदि है, और शिव ही अंत”!

अवघ्या काही मिनिटांमध्ये मी आदि कैलास पर्वताच्या पायथ्याशी असणार्‍या शिव मंदिराजवळ पोहोचले. इथे अजिबात पर्यटकांची वर्दळ नव्हती. त्या खुल्या मंदिरात शिवपिंडीचे दर्शन घेऊन मी तिथेच एका छोट्या दगडावर बैठक मारली. सभोवार शुभ्र बर्फाचे आच्छादन होते. आता माझी थेट नजरभेट त्या कैलासाच्या प्रतिरूपाशी होत होती! तिबेटमध्ये असणार्‍या मूळ कैलास पर्वताच्या पिरामिड सदृश आकाराचे पर्वत शिखर – आदि कैलाश! निरभ्र निळ्याभोर आकाशात त्रिकोणी आकाराचे आदि कैलास शिखर गगनाला गवसणी घालत होते! मंदिराच्या बाहेरच एक सोनेरी रंगाचे त्रिशूल उभे केलेले होते. पार्श्वभागी जणू शुभ्र हिमाचे भस्म सर्वांगाला फासून सांसारिक आसक्तीपासून अलिप्त आणि तपस्येत ध्यानस्थ बसलेला वैरागी महादेव! सृष्टी, स्थिती आणि लय यांचे प्रतीक असलेले साक्षात शिवतत्व!

नैसर्गिक आणि अगदी प्राकृतिक स्वरूपात ध्यानस्थ असलेल्या त्या पर्वतशिखराचे विहंगम रूप पाहताना मन नकळत शांत झाले. बर्फाच्या शुभ्र वस्त्रात लपेटलेलं ते शिखर म्हणजे जणू हजारो वर्षांपासून समाधीस्थ असलेला एक योगीच! तिथल्या वातावरणात एक विलक्षण गूढ शांतता होती! त्या शांततेतच शिवतत्त्वाची अनुभूती होते. मनातले सर्व चंचल विचार त्या नीरव  शांततेत विरघळून गेले आणि कानामध्ये त्याच अद्भुत शांततेचा स्वर साठून राहिला. त्या आसमंतात उभं राहिल्यावर वाटू लागलं —आदि कैलास फक्त एक पर्वत शिखर नाही; ही एक अशी अवस्था आहे, जिथे निसर्गाने स्वतः शिवरूप धारण केले आहे. आदि कैलास  पर्वताच्या छायेत शांत उभं राहिल्यावर जाणवतं—शिव दूर कुठे नाही; तो इथेच आहे, या गिरीकंदरांमध्ये, ह्या आसमंतामध्ये, इथे वाहणार्‍या वाऱ्यात, इथल्या निळ्या आकाशात, आणि आपल्या श्वासाच्या लयीत!

प्राकृतिक स्वरूपात शिवाच्या अस्तित्वाची अनुभूति होते. निसर्ग शिवस्वरूप म्हणजेच चैतन्य स्वरूप आहे. त्याच निसर्गाचे रौद्र रूप देखील आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ह्यांचा एक नाद आहे आणि त्या नादात अवघी सृष्टी डोलत असते. बहुधा नटराज शिवासोबत नृत्य आणि संगीतात मग्न होत असावी! पंचमहाभूतांमध्ये सर्वत्र आसमंतात ह्या विश्वनाथचे अस्तित्व आहे. प्रसंगी हीच प्रकृती शिवाचे संहारक आणि परिवर्तक रूप असल्याचेही द्योतक आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच नाही का! शिव अमर्याद, निराकार आणि अनादि, अनंत आहेत. जणू ह्या पर्वत शिखरांच्या स्वरूपात निश्चल, अनादि काळापासून ध्यानस्थ! ते शिव आहेत, आणि शक्ति सुद्धा आहेत आणि तेच शिवशक्ती स्वरूप – अर्धनारीनटेश्वर आहेत. शिवतत्त्व आणि शक्ती यांचा संतुलित संगम दर्शवणारे अद्वैताचे प्रभावी प्रतीक म्हणजे अर्धनारीनटेश्वर!

विविध रंगाने परिपूर्ण असलेला नितांत सुंदर निसर्ग आपल्याला नेहमीच मोहित करतो, पण शुभ्र हिमाने आच्छादलेले ते आदि कैलास पर्वत शिखराचे भव्य दिव्य रूप अत्यंत अंतर्मुख करणारे भासले! मला त्या दृश्यापासून विलग होण्याची इच्छा होत नव्हती. हे सर्व काही अद्भुत होतं. मी तिथे खूप वेळ रेंगाळले.

बराच वेळ तिथे थांबल्यानंतर पार्वती सरोवर आणि शिव मंदिरासाठी अजून चढाई बाकी आहे, हे लक्षात आले. घोडेवाले आणि गाईड उभे होते त्या ठिकाणी मी आले. एका घोडेवाल्याने विचारले, “मॅडम घोडा हवा आहे का? पार्वतीसरोवर आणि मंदिरापर्यंत साधारण दोन किलोमीटर चढाई होती. मी मात्र पायी जाण्याचे ठरवले. माझ्यासाठी वेळ आणि ऊर्जा ह्याचे समीकरण जुळणे महत्त्वाचे होते, म्हणून एक वाटाडया सोबत घेतला.

पार्वती सरोवर आणि गौरी कुंड ह्यांच्या भेटीशिवाय आदि कैलास भेट परिपूर्ण होऊ शकत नाही! प्राचीन पौराणिक कथांमध्ये रुजलेले हे पवित्र मानले जाणारे तलाव देवी पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या स्वरुपात प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपश्चर्येशी संबंधित असल्याचे सांगीतले जाते. पार्वती सरोवर हे तिचे ध्यान स्थान मानले जाते, तर गौरी कुंड हे तिच्या भक्ती, तपश्चर्या आणि आध्यात्मिक मीलनाचे ठिकाण मानले जाते. पार्वती सरोवर आणि गौरी कुंड हे तलाव खरं तर हिमनद्यांपासून तयार झालेले! त्यामुळे हिवाळ्यात बर्फात लुप्त होणारे हे जलाशय यात्रेच्या हंगामात आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतात. जोलिंगकाँग छावणीपासून अंदाजे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेला एक लहान, नैसर्गिकरित्या हिमनदीपासून तयार झालेला तलाव म्हणजे गौरीकुंड. पण गौरी कुंडाकडे जाणारा रस्ता अगदी आदि कैलास पर्वताच्या पायथ्याकडून खडकाळ ओबडधोबड पायवाटेने जातो.

देवी पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक नाव – गौरी,  ज्याचा अर्थ तेजस्वी! पौराणिक आख्यायिकांनुसार भगवान शिवाशी दैवी मिलन होण्यापूर्वी पार्वतीने गौरी कुंडामध्ये स्नान करून स्वत:ला दिव्य शुद्धी प्राप्त केली म्हणून ह्या कुंडाचे नाव- गौरी कुंड! अगदी श्री गणेशाच्या निर्मितीची कथा देखील ह्या कुंडाशी जोडली जाते. आदि कैलास ही भगवान शिव, माता पार्वती आणि त्यांच्या परिवाराचे पृथ्वी वरील निवास स्थान मानले जाते.

गौरी कुंडाशी संबंधित दुसरी महत्त्वाची आख्यायिका म्हणजे जालंधर नावाच्या एका भयंकर विलक्षण शक्तीच्या अजिंक्य असणाऱ्या राक्षसाशी देवी पार्वतीने युद्ध करून त्याला पराभूत केल्यावर आपली खर्च झालेली दिव्य शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी गौरी कुंडाच्या पाण्यात स्नान केले. असे म्हटले जाते की, त्या पवित्र सरोवराने तिची दिव्य शक्ती पुन्हा प्रदान केली — ज्यामुळे ती नव्याने पुन्हा तेजस्वी होऊन शक्ती’च्या रूपात आपली भूमिका पुन्हा साकारण्यास सज्ज झाली. मिथक काही असले तरी त्यामागचा संदेश खूप महत्त्वाचा – प्रत्येकाला आपल्या पुनरुज्जीवनाची गरज असते! दुर्गम हिमालयातील कठीण तीर्थयात्रांचा कदाचित हाच उद्देश असावा – स्वयंशुद्धी आणि परिवर्तन!

हिमवृष्टीमुळे गौरी कुंडाकडे यात्रेकरू किंवा पर्यटकांना जाण्यास मनाई केलेली होती. त्यामुळे गौरी कुंडाकडे जाता आले नाही. मा‍झ्या वाटाड्‍याने पार्वती सरोवराच्या दिशेने मोर्चा वळविला. चढाई फार नव्हती. पण उंची, विरळ हवा आणि बर्फामुळे निसरडा झालेला रस्ता यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागत होते. अशा ठिकाणी स्थानिक वाटाड्‍याची मदत किती उपयोगी पडते, हे लगेच जाणवले. एक टप्पा पार केल्यावर त्याने मला मुख्य रस्त्यावरून न नेता बर्फाळ पायवाटेने एक मोठी चढाई करून अगदी काळजीपूर्वक “भीम की खेती” पर्यंत नेले. हवेमधील  विरळपणा जाणवला. सर्वत्र हिमाचे साम्राज्य होते. आम्ही एका बर्फाने झाकलेल्या टेकडीची मोठी चढाई केल्यानंतर एक छोटं तळे दिसले. त्या तळ्यामध्ये छोटे तृण उगवलेले दिसत होते. परंतु सभोवार पूर्ण बर्फाचे आच्छादन होते. तिथे एक फलक लावलेला होता-भीम की खेती! पांडव अज्ञातवासात येथे वास्तव्यास असताना भीमाने शेती केली होती अशी मान्यता आहे. माझ्या वाटाड्याने दिलेल्या माहितीनुसार आदि कैलास पर्वत रांगेतील प्रत्येक पर्वत शिखरामध्ये गणेश, नंदी, पांच पांडव, पार्वतीचा मुकुट असे वेगवेगळ्या पौराणिक संदर्भ सांगणार्‍या जणू खाणाखुणा होत्या.

भीम की खेती परिसर

भीम की खेती पासून उभा चढ पार करून एका उंच टेकडीच्या कुशीतून पायवाट पार्वती सरोवराच्या दिशेने जात होती. आम्ही काही क्षण तिथे थांबलो. तिथून दिसणारे दृश्य अगदी मंत्रमुग्ध करणारे होते! आदि कैलास पर्वताच्या आजूबाजूला चौफेर बर्फाच्छादित पर्वत शिखरे!  मी एका शिळेवरचा बर्फ झटकून बसले, आणि सभोवार नजर टाकली. सर्वदूर निस्तब्ध शांतता! मला दुर्गम हिमालयात गेल्यावर नेहमी जाणवणारी गूढ शांतता पुन्हा मा‍झ्या भेटीला आली! मी जणू त्या महादेवाच्या दरबारात होते. पार्वती सरोवराच्या शांत पाण्यात चौफेर असलेल्या हिमशिखरांचे प्रतिबिंब पाहून विलक्षण अनुभूति होत होत्या. आदि कैलास पर्वताच्या छाया छत्रात अवघा परिसर देवभूमीवत भासत होता. आता आदि कैलास पर्वत शिखर अगदी नजरेसमोर होते. तेथील नीरव शांततेत, त्या आसमंतात जगन्नियंत्याच्या असण्याचा भास होऊ लागला. त्याचा आणि माझा संवाद सुरू झाला. चंचल मन एकदम स्थिर झाले. खूप वेळ शांत मनाने त्या देवादी देव महादेवाच्या दरबारी आदि कैलासाच्या छबीकडे  एकटक तंद्री लावून बसले!

मला ऐकिवात असलेल्या सर्व पौराणिक कथा जिवंत होऊन समोर येऊ लागल्या. आदि कैलास पर्वत रांगा म्हणजे भगवान शिव आणि पार्वतीचे पृथ्वी वरील पहिले निवास स्थान मानले जाते.  आदि कैलास सभोवतालचा प्रदेश अगदी तिबेटमधील कैलास-मानसरोवराचे प्रतिरूप! त्यामुळे अनेक साधकांनी सुद्धा ह्या भूमीला तपोभूमी म्हणून निवडले होते.

आदि कैलास पर्वताशी संबंधित पौराणिक संदर्भ असलेली सर्वात नाट्यमय कथांपैकी एक म्हणजे रावणाची! लंकापती रावण शिवाचा निस्सीम भक्त. भगवान शिवाकडून सर्वोच्च शक्ती प्राप्त करण्याच्या इच्छेने रावणाने आदि कैलास पर्वताच्या पायथ्याशी दीर्घकाळ घोर तपस्या केली. त्याची तपश्चर्या इतकी तीव्र, दृढ आणि परिपूर्ण होती की शिवाला प्रतिसाद देणे भाग पडले! भगवान शिवाने प्रसन्न होऊन रावणाला वीस हातांचे सामर्थ्य, दहा मस्तकांचे वरदान आणि अफाट शक्ति प्रदान केली. हे एक असे अभूतपूर्व वरदान होते, ज्यामुळे तो अजिंक्य बनला. मात्र रावणाचा शेवट कसा झाला हे सर्वश्रुत आहे. एक बोधप्रद कथा म्हणून रावणाच्या कथेत दडलेला संदेश महत्त्वाचा आहे. असामान्य शक्ति किंवा आध्यात्मिक प्राप्ती जर अहंकाराने ग्रासली तर ती विनाशाकडेच नेते!

आदि कैलासाशी संबंधित सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे तांडव — भगवान शिवाचे वैश्विक नृत्य! पौराणिक कथांनुसार, आदि कैलास येथे भगवान शिवाने तांडव करून अष्टावक्र ऋषींना आपले संपूर्ण दिव्य स्वरूप प्रकट करून दर्शन दिले. ह्या कथा तर आदि कैलास पर्वत शिखरांना एक वेगळाच आयाम देतात. अवघा परिसर सृष्टीतील सर्वात शक्तिशाली नृत्याचा रंगमंच भासू लागतो.

आदि कैलास म्हणजे पौराणिक कथा, भक्ती आणि आध्यात्मिक अनुभूति यांचा विलक्षण संगम. पार्वतीच्या शिवाप्रती असलेल्या अढळ भक्तीची आणि निस्सीम प्रेमाच्या कसोटीची साक्ष देणारी ही भूमी, रावणाची घोर तपश्चर्या म्हणजे आदि कैलाश, तर प्राचीन महाकाव्यातील कुरुक्षेत्राच्या रक्तरंजित युद्धानंतर कर्म बंधनातून मुक्तीच्या शोधात निघालेल्या पांडवांच्या अंतिम प्रवासाची साक्षीदार झालेली भूमी म्हणजे आदि कैलास!

काही क्षण बसल्यावर मी पार्वती सरोवराच्या दिशेने खालच्या दिशेला उतरून चालू लागले. शांत सरोवरामध्ये आजूबाजूच्या पर्वत शिखरांची छबी अगदी स्पष्ट दिसत होती. सरोवराच्या एका काठावर मंदिर दिसू लागले. परंतु सर्वत्र हिम साठलेले होते. आदि कैलास यात्रेसाठी आलेल्या पर्यटकांमध्ये आबालवृद्ध बहुसंख्येने होते. मी चालत शिव-पार्वती मंदिराजवळ आले. मंदिराच्या प्रांगणात उभे राहिल्यावर समोर भव्य आदि कैलास पर्वत, पार्वती सरोवर आणि मंदिरा जवळील मोठा नंदी  असे एकत्रित चित्र दृष्टीस पडते.

अगदी मूलभूत स्वरुपात असलेल्या शिव-पार्वती मंदिरात भाविक रांगेने पुढे जात होते. मंदिराच्या सभोवताली बर्फ साचलेला होता. मंदिरात दर्शन घेऊन पार्वती सरोवराच्या काठी काही क्षण विसावले. हिमालयाचे भव्यत्व आणि देवत्व त्याच्या निखळ प्राकृतिक सौंदर्यातच सामावलेले आहे—कधी सदाहरित वृक्षराजीच्या शांत छायेत, तर कधी प्राणवायू विरळ होत जाणाऱ्या उंचीवर गगनाला भिडणाऱ्या निश्चल, अनादि काळापासून ध्यानस्थ असणाऱ्या हिमाच्छादित पर्वतशिखरांत!

सरोवराकडून परतीच्या वाटेवर मला माझे हरवलेले दोन सोबती भेटले! परतीच्या वाटेवर प्रत्येक पर्वत शिखरामध्ये आम्हाला पौराणिक कथांमधील पात्रे दिसू लागली. आम्ही पायवाटेने KMVN च्या कॅम्पवर आलो.  एवढ्या कालावधीमध्ये उत्साहाच्या भरात समुद्रसपाटीपासूनची गाठलेली अधिकची उंची आणि विरळ हवा हयांचा परिणाम जाणवला नाही. पण कॅम्पवर आल्यावर उगीच झोप आल्यासारखे वाटू लागले. कॅम्पवर चक्क बिछाने घातलेले होते. आमचे दुपारचे जेवण तयार होत होते. नकळत ट्रेकिंगचा महत्त्वाचा नियम मोडला! आम्ही दोघी मैत्रिणी कॅम्पवर येऊन थेट बिछान्यात विसावलो! विरळ हवेने तिचे काम साधले होते. मला डोकेदुखी जाणवली आणि अचानक परतीच्या वाटेवर प्यायलेले पोटातील ज्यूस बाहेर आले! शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे विरळ हवेचा थोडा त्रास झाला. हवेत प्रचंड गारठा वाढू लागला. कसेबसे दोन घास पोटात ढकलले आणि आम्ही जोलींगकाँगहून माघारी गुंजीच्या दिशेने निघालो. सकाळी आदि कैलास दर्शनाच्या उत्साहात “ब्रम्ह” पर्वताकडे नजर गेली नाही. परतीच्या वाटेवर ब्रम्ह पर्वताच्या पायथ्याजवळ गाडी थांबवून फोटो काढले आणि पुढे निघालो. आम्हाला लिपुलेखकडे जाण्याची परवानगी मिळालेली होती त्यामुळे बादलने आमची गुंजी ऐवजी नाबी डांग येथे मुक्कामाची सोय केली.

ब्रम्ह पर्वत

नाबी डांग – ॐ काराच्या शोधात

आम्ही गुंजीला आल्यावर थेट उत्तर-पूर्व दिशेला नाबी ढांगमार्गे लिपुलेख खिंडीतून कैलास-मानसरोवरकडे जाणाऱ्या पारंपरिक मार्गावर आलो. गुंजी ते नाबी ढांग अंदाजे सोळा किलोमीटर अंतर आहे. गुंजीपासून थोडे पुढे गेल्यावर परिसराचे रूपच बदलू लागले. रुक्ष, खडकाळ भूभागातून आमची गाडी डोंगरकपाऱ्यांमधून भयावह वळणे घेत कच्च्या रस्त्यावरून पुढे सरकत होती. रस्ता जितका अधिक वळणदार आणि खडतर होत होता, तितकी उंचीही वाढत होती. सभोवताली आर्मी सैनिकांशिवाय दूरदूरपर्यंत साधे चिटपाखरूही नजरेस पडत नव्हते.

अखेर संध्याकाळी आम्ही १४,७६४ फुटांवर असलेल्या ‘नाबी डांग’मध्ये दाखल झालो. आदि कैलास आणि कैलास-मानसरोवर यात्रेतील हा अंतिम उंचीवरील विश्रांतीचा टप्पा आहे. भारतातून कैलास-मानसरोवर यात्रा मार्गावर लिपूलेख खिंडीच्या खालच्या दिशेला नाबी डांग कॅम्प वरून ॐ पर्वताचे विहंगम दृश्य नजरेस पडते. सभोवतालचा प्रदेश अगदी निर्मनुष्य! ॐ पर्वत दर्शनाला येणारे पर्यटक, भाविक, ट्रेकर्स हीच मर्यादित जनसंख्या!

आमचा मुक्काम अगदी लिपुलेख खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या नाबी डांग येथेच होता. बादलने आमची जीप एका “टी हाऊस” सारख्या धाब्याजवळ आणून थांबविली. अत्यंत दुर्गम आणि निर्मनुष्य अश्या पर्वतावर एक कुमाउंनी धीट मुलगी ते टी हाऊस चालवत होती. तिच्या सोबत पाहुण्याची ऊठबस करण्यासाठी एक मदतनीस होता. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तीची साफसफाई चालू होती.

टी हाऊस समोर अगदी दगडमाती आणि लाकडापासून बनविलेली एक मोठी खोली होती. आमची मुक्कामाची सोय तिथे केलेली होती. आम्हाला चौघांना खोली उघडून दिली आणि आम्ही खोलीत प्रवेश केला. फक्त अन्न आणि निवारा इतक्याच मूलभूत गोष्टींची सोय होती. ह्यापेक्षा अधिक काही अश्या दुर्गम ठिकाणी विरळ हवेत महत्त्वाचेही नव्हते. खोलीत आठ ते दहा जण झोपू शकतील अश्या पद्धतीने सलग पलंग लावलेले होते आणि उबदार पांघरूणं  होती. आम्ही चौघांनी पलंगावर आमचे सामान ठेवून खोलीच्या बाहेर पडलो. इथे एक अडचण अशी होती की, खोलीत शौचालय नव्हते. खोलीबाहेर रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या टी हाऊस लगत शौचालयाची व्यवस्था होती. थंडीने हुडहुडत तिथवर जाणे म्हणजे शिक्षा वाटू लागली!

आमच्या टी हाऊस शेजारीच फलक लावलेला दिसला – “ॐ पर्वत” व्यू पॉइंट! समोर छोटे मंदिर होते. मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर त्रिशूल उभे केले होते आणि नारिंगी रंगाच्या कमानीवर मोठी घंटा बांधलेली होती.  पण तेथील दरी-खोऱ्यामध्ये पावसाळी हवा दाटून आल्याने समोरच्या पर्वत रांगा धुक्यात लुप्त झालेल्या होत्या. नाबी डांग हा एक वेगळाच प्रदेश आहे. इथली हवा विरळ पण स्वच्छ. मी टी  हाऊसच्या लगतच मोकळ्या जागी उभी होते, दूरवर काहीच दिसत नव्हतं-फक्त धुकं, वारा आणि कानात गुंजणारी शांतता! काही वेळातच अवघ्या परिसराला धुक्याने व्यापले आणि हलका पाऊस सुरू झाला. वातावरणामध्ये गारठा वाढला. हवेचा विरळपणा प्रकर्षाने आता जाणवू लागला होता.

आम्ही टी हाऊसमध्ये बसून गरमागरम चहा घेत होतो. इतक्यात पोटात भुकेची जाणीव तीव्र झाली. त्या थंड हवेत ‘पहाडोवाली मॅगी’ आणि ‘चहा’ यापेक्षा अधिक सुखद  काय असू शकते? चहासोबत गरमागरम मॅगीही झाली, आणि नाबी डांगची ती शांत, निवांत संध्याकाळ दाटून आली. ॐ पर्वताचे दर्शन दुर्लभ झाले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे निघून लिपुलेख खिंडीत दुरवरून कैलास पर्वताचे दर्शन करण्याचा मनोदय होता. आम्ही जेवण उरकून लवकरच झोपी गेलो, पण आमच्या शेजारच्या खोलीत असलेल्या पाहुण्यांचे लहान मूल सतत रडत होते. त्याला बहुधा विरळ हवेने त्रास होत असावा. मला रात्री दोन वाजता जाग आली. खोलीचा दरवाजा उघडून पायऱ्यांजवळच उभी राहिले, ॐ पर्वत शिखर दिसते का ह्याचा अंदाज घेतला आणि पुन्हा खोलीत जाऊन उबदार पांघरूणामध्ये स्वतःला गुरफटून घेतले.

आम्ही पहाटे लवकर उठलो. पण मला आणि माझ्या मैत्रिणीला अंमळ जरा विरळ हवेत झालेला त्रास पाहून टी हाऊसच्या मालकीणबाईने लिपुलेख पर्यन्त जाऊ नये अशी सूचना दिली. कारण नाबी डांग कॅम्प पासून काही अंतर चढाई करून लिपू लेख खिंडीपाशी जावे लागते. भारत-नेपाळ-तिबेटच्या त्रिसीमेवर अंदाजे १७,००० फुटापेक्षा जास्त ऊंचीवर लिपू लेख खिंड आहे. भारताच्या हद्दीतील हा शेवटचा प्रादेशिक बिंदू आहे. प्राचीन काळापासून भारत आणि तिबेट दरम्यान प्रवास करणारे व्यापारी, भिक्षू आणि यात्रेकरू ह्या खिंडीचा वापर करीत आले आहेत. लिपुलेख खिंड ही कुमाऊँच्या भोटियांनी भारत-तिबेट सीमा व्यापारासाठी ऐतिहासिकदृष्ट्या वापरलेल्या खिंडींपैकी एक होती. सीमेवर वसलेल्या भोटियांच्या गोरी, दारमा, चौदान आणि ब्यान ह्या अत्यंत उंचावर वसलेल्या हिमालयीन खोऱ्यांमधील लोक तिबेटला जाण्यासाठी ह्या उंच पर्वतीय खिंडींचा वापर करीत असत. लिपुलेख खिंड सर्वात “प्रसिद्ध” मानली जात असे, कारण ही खिंड तिबेटी व्यापारी केंद्र पुरंग (तकलाकोट) शहराच्या सर्वात जवळ आहे आणि तेथून थेट कैलास पर्वताकडे जाता येते. लिपूलेख खिंडीमधून तिबेटमध्ये असलेल्या कैलाश पर्वताचे दुरवरून दर्शन घेण्यासाठी “स्पेशल एरिया परमीट” भारतीय लष्कराकडून घ्यावे लागते.

आम्हाला विशेष परवानगी मिळूनही लिपूलेख खिंडी पर्यंत जाता आले नाही ह्यामुळे मन हिरमुसले झाले. पण मनात स्वतःशीच पुटपुटले आणि प्रार्थना केली, “बहुधा दुरून दर्शन करणार हे कैलासपती महादेवाला रुचलेले दिसत नाही! कैलास – मानसरोवर यात्रेचा योग लवकर आण महादेवा!! ॐ पर्वत परिसरात नाबी डांग येथे रहाण्याचा योग आला हे महत्त्वाचे! कारण पहाटेच्यावेळी सूर्योदय होताना ॐ पर्वताचे दर्शन करता येणार होते.  

नेपाळ-भारत-तिबेट सीमेवरच्या भूभागात कुमाऊ हिमालयाच्या उपरांगांमध्ये असलेल्या १९,००० फूट उंचीच्या एका भव्य पर्वत शिखराच्या मस्तकावर जणू निसर्गानेच ॐ चिन्ह रेखाटलेले आहे. पर्वताच्या शिखराची रचना इतकी अद्वितीय आहे की, काळ्या-करड्या खडकाळ पर्वतावर हिम वृष्टी झाल्यावर नैसर्गिकरित्या हिमरेषांनी ॐ चिन्ह तयार होते. तीन देशांच्या सीमेवर असलेला हा निसर्गाचा चमत्कार मात्र आपल्या भारतातील भूभागातूनच दृश्यमान होतो. शिवपुराणातील संदर्भानुसार, विश्वाच्या निर्मितीपूर्वी ‘ॐ’चा उगम झाला. पौराणिक ग्रंथ आणि लोककथांमध्ये असे म्हटले जाते की, जगात आठ गुप्त नैसर्गिक ‘ओम’ चिन्हे आहेत, त्यापैकी एक नाबी डांग कॅम्प वरून ॐ पर्वताच्या रूपात दिसते.

ॐ पर्वत

पहाटेच्या वेळी मोकळ्या आकाशात समोर ॐ पर्वत स्पष्ट दिसत होता. आश्चर्यकारकरित्या आदल्या दिवशीचे ढगाळ वातावरण अगदी स्वच्छ झाले होते. निळ्याभोर आकाशाशी सभोवतालचे पर्वतराज जणू संवाद साधत होते! आकाश उजळले आणि सूर्याच्या अभेमुळे त्या करड्या रंगांच्या खडकाळ पर्वतावर हिमरेषांनी रेखाटलेले दिव्य ॐ चिन्ह सुस्पष्ट होत गेले. नाबी ढांगच्या साधारण १४,००० फुट ऊंची असलेल्या व्हयू पॉइंटवरून  १९,००० फूट उंचीचे ते दिव्य ॐ पर्वत शिखर आमच्या अगदी नजरेच्या टप्प्यात होते.

भारताच्या अध्यात्मिक परंपरेत संपूर्ण विश्वाच्या स्पंदनाचा आद्य नाद  म्हणजे “ॐ”! ॐ  हा अस्तित्वाचा नाद, चेतनेचा आधार आणि ईश्वराचे द्योतक मानले जाते. ॐ चे तीन श्रवणीय घटक अ – उ – म  मानवी चेतनेच्या तीन अवस्थांचे प्रतीक आहेत. जागृत, स्वप्न, सुषुप्त आणि तुरीय या चारही अवस्थांना व्यापणारा हा आद्य नाद अंतर्मुख शांततेकडे, समर्पणाकडे आणि ईश्वरानुभूतीकडे नेणारा आहे.

समोरच्या भव्य पर्वत शिखरावरील ॐ चिन्हाकडे पाहताना असे वाटत होते जणू निसर्ग ध्यानस्थ होऊन मंत्रोच्चार करत त्या पर्वत शिखरावर ॐ रेखाटत आहे. आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापासून पुढे अगदी कड्यापर्यंत गेलो. जिथून कोणत्याही अडसराशिवाय ॐ पर्वताचे पॅनोरमिक दृश्य दिसत होते. निस्तब्ध शांतता होती. त्या शांततेत पर्वतावर उमटलेल्या ॐ चिन्हाचा मंत्रोच्चार कानात गुंजत आहे असे वाटत होते. निसर्गाशी एकरूप होण्यासाठी व्यास खोऱ्यात वसलेल्या ह्या आदि कैलाश आणि ॐ पर्वत प्रदेशांसारखे दुसरे उत्तम ठिकाण नाही! कदाचित म्हणूनच आदिम काळापासून ऋषी-मुनि, साधकांनी हिमालयातील अत्युच्च उंचीवर असलेल्या पर्वतांना ध्यान, साधना आणि आत्मानुभूतीचे सर्वश्रेष्ठ ठिकाण मानले असावे.

ॐ पर्वताच्या त्या दिव्य स्वरुपाकडे बघताना ब्रम्हानंदी टाळी लागल्यासारखे झाले! पण जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला तसतसा तिथे पर्यटकांचा पायरव वाढला. शांतता भंग होऊ लागली. आम्ही आमच्या गेस्ट हाऊसवर माघारी परतलो. सकाळचे साडे आठ वाजले होते. आमच्या होम स्टेच्या मालकीण बाईचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतीच्या प्रवासात एक अनहद नाद जणू कानात गुंजत होता – चिदानंद रुपः शिवोऽहम् शिवोऽहम् !

कालापानी – काली नदीचे उगम स्थान

काली माता मंदिर, कालापानी

परतीच्या मार्गावर साधारण सकाळी आठच्या सुमारास आम्ही कालापानी येथे पोहोचलो. कालापानी येथे सैन्याची छावणी आहे. नाबी डांगहून खालच्या दिशेला येताना गुंजीपासून साधारण ९ किलोमीटर अलीकडे, सुमारे १२,००० फूट उंचीवर वसलेले कालापानीचे प्राचीन काली माता मंदिर वैदिक काळाशी निगडित असल्याचे मानले जाते. मंदिराच्या प्रवेशापाशी लावलेल्या फलकावरून ह्या मंदिर आणि प्रदेशाबाबत माहीती मिळते. स्थानिकांची अशी मान्यता आहे की, कैलास–मानसरोवर यात्रेची इच्छा असलेला प्रत्येक यात्रेकरू सर्वप्रथम या कालीमाता मंदिराचे दर्शन घेऊनच पुढील प्रवासाला निघत असत. कालीमातेचे ह्या प्रदेशाला वरदान असल्याचे मानले जाते.

व्यास गुंफा

प्राचीन कथांनुसार, मंदिराच्या समोरच्या पर्वतावर दिसणाऱ्या गुहेमध्ये महान ऋषी वेद व्यास यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी तपस्या केली होती असे मानले जाते. त्यामुळे त्या पर्वतावरील गुहेला “व्यास गुंफा” म्हणून ओळखले जाते. काली मातेनें ऋषींना स्वप्नात दर्शन देऊन आपल्या नावाने एक मंदिर उभारण्याची आज्ञा दिली. काली मातेनें वरदान दिले होते की या मंदिरामुळे या प्रदेशात हिरवाई, उपजाऊपणा आणि समृद्धी वाढेल. या मंदिराचे अस्तित्व या संपूर्ण प्रदेशातील हिरवाई, समृद्धी आणि कल्याणासाठी समर्पित मानले जाते. काली नदीचा उगम मंदिरातील काली मातेच्या चरणांना स्पर्श करत सुरू होतो—यामुळे ही नदी अत्यंत पवित्र मानली जाते. स्थानिक लोकांसाठी हे मंदिर एक पूजनीय आणि अत्यंत पवित्र स्थान आहे. काली नदीला ते दैवी स्रोत मानतात. स्थानिक लोक त्याच्या दिवंगत प्रियजनांचे अस्थि विसर्जन देखील ह्या नदी मध्ये करतात.

ह्या मंदिराची देखभाल, पूजा-अर्चना आईटीबीपी आणि भारतीय सैन्याद्वारे केली जाते. भारत-नेपाळ-चीन सीमावर्ती ठिकाण असल्याने इथे चोवीस तास गस्त असते. मंदिर परिसरात सैनिकांनी एक कॅंटीन सुरू केलेले आहे. तिथे गरमागरम नाश्ता उपलब्ध करून देतात. आम्ही तिथे नाश्ता करून पुढे निघालो. आदि कैलास – ॐ पर्वत दर्शनानंतर आम्ही थेट ‘दारमा व्हॅली’ येथे जाणार होतो. परंतु आमच्या चालकाने दुपारच्या जेवणासाठी आम्हाला थेट धारचुला पर्यंत नेले. तेथून पुन्हा मागे तवाघाट पूलापर्यंत येऊन आम्ही दारमा व्हॅलीकडे मार्गस्थ झालो. दारमा व्हॅली, चौकोरी, पंगोट, नैनीताल अश्या ठिकाणांना भेट देऊन आम्ही माघारी परतलो.

यात्रा पूर्ण करून आम्ही सुरक्षितपणे घरी परतलो, तेव्हा मनात एक विलक्षण समाधान होतं. पण परतल्यावर लगेचच ‘आदि कैलाश – ॐ पर्वत’ मार्गावरील अडचणींच्या बातम्या ऐकल्या आणि क्षणभर मन थबकलं. ज्या रस्त्यांवरून आम्ही सहज, कोणताही अडथळा न येता, निसर्गाच्या कृपेने मार्गस्थ झालो— त्याच रस्त्यांची काही दिवसांतच वाताहत झाली होती. काही ठिकाणी भूस्खलन, काही ठिकाणी मुसळधार पाऊस! काही काळ यात्रा स्थगित केली गेली!  अनेक यात्रेकरूना तर हवामान बिघडल्यामुळे आदि कैलाश – ॐ पर्वताचे दर्शनही घेता आले नाही. त्या क्षणी मनात एकच विचार आला — महादेवाचा बुलावा आल्याशिवाय त्याच्या दरबारात आपल्याला प्रवेश मिळत नाही हेच खरं! महादेवांच्या राज्यात जाण्याचा मार्ग नकाशावर असला तरी त्यांच्या अनुभूतिपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नशीबातच असावा लागतो! आणि तो महादेवाची कृपा झाली तरच मिळतो. मनोमन महादेवाला नमस्कार करून सुखरूप घडवून आणलेल्या यात्रेबद्दल त्याचे आभार मानले!

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ।।


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑