सर्वसाधारणपणे कैलाश-मानसरोवर यात्रेची प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा दडून असते. तशीच माझ्या मनातही आहे. त्या यात्रेचा योग येईल तेव्हा येईल, पण त्याच कैलास मानसरोवर यात्रेच्या प्राचीन आणि पारंपरिक मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा आहे – “आदि कैलास आणि ओम पर्वत”- शंभू महादेवाचे प्रथम निवास स्थान! असं म्हटले जाते की, ज्यांना श्री कैलास मानसरोवरची यात्रा करणे शक्य नाही त्यांनी “आदि कैलाश” यात्रा करावी. भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यात हिमालयीन पर्वतरांगेत स्थित आदि कैलास किंवा ‘छोटा कैलाश’ म्हणजे तिबेटमध्ये असलेल्या कैलास पर्वतशिखराचे प्रतिरूप! समुद्रसपाटीपासून १९,५०५ फुट उंची असलेल्या ह्या पर्वत रांगेचे हिंदूंसाठी धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अनन्यसाधारण आहे.
पंच कैलाशांपैकी “आदि कैलाश” दूसरे महत्त्वपूर्ण पर्वत शिखर मानले जाते. तिबेटमधील प्रथम मुख्य कैलास पर्वत, भारतातील उत्तराखंड राज्यात असणारे दुसर्या स्थानावर असणारा आदि कैलास पर्वत आणि हिमाचल प्रदेशमधील अनुक्रमे श्रीखंड महादेव कैलाश, किंनौर कैलास आणि पाचवे मणीमहेश कैलास असे पंचकैलास मानले जातात.
उन्हाळी सुट्टीचा कार्यक्रम काय ठरवावा असा मनात विचार येता-येता “आदि कैलाश-ओम पर्वत” यात्रेचा बेत ठरला. कुमाऊ मंडळ विकास निगम ह्या पर्यटनाला चालना देणाऱ्या संस्थेशी निगडीत कार्यरत असलेल्या ‘उत्तराखंड टूर आणि ट्रॅवल’ पर्यटन कंपनीमार्फत आम्ही आदि कैलास -ओम पर्वत यात्रेचा कार्यक्रम आखला. दोन महीने पूर्वीपासून चौकशी, प्रवासाचे नियोजन, itinerary अश्या सर्व गोष्टींची खातरजमा झाली. उत्तराखंड टूर आणि ट्रॅवल कंपनीने आम्हाला साधारण एक आठवड्याचा पूर्ण आखीव कार्यक्रम हाती दिला. आदि कैलाश-ओम पर्वत यात्रा आणि त्यानंतर परतीच्या प्रवासात ‘दारमा व्हॅली’ करून चौकोरी मार्गे काठगोदाम असा उन्हाळी सुट्टीचा बेत नक्की झाला. दररोज नियमित चालण्याचा सराव आणि प्रवासाच्या दिवसाची प्रतीक्षा सुरू झाली!
आदि कैलाश-ओम पर्वत यात्रेच्या प्रवासाचा मोठा पल्ला आणि टप्प्या-टप्प्यात समुद्रसपाटीपासून वाढत जाणारी उंची ह्यामुळे विरळ हवेत तग धरावा ह्या दृष्टिकोनातून रात्रीच्या मुक्कामाचे नियोजन आवश्यक असते. त्यातच इंडो-तिबेटियन सीमेशी अगदी खेटून ही सर्व स्थळे असल्याने inner line permit आवश्यक असते. त्यामुळे, आमच्या ट्रॅवल कंपनीने आमच्याकडून आमचे यात्रा परमीट फॉर्म्स भरून घेतले आणि त्याचीही तजवीज केली. सर्व गोष्टींचे यथावकाश नियोजन झाले होते त्यामुळे फार काही विवंचना नव्हती. मनोमन एकच प्रार्थना करत होते की, सर्व नियोजन तर उत्तम झाले आहे, परंतु निसर्गदेवतेने जर कृपा केली नाही तर कसले काय! पण महादेवाचा बुलावा आल्यावर कोणतीही योजना तडीस जाणार नाही हे अशक्यच!
काठगोदामच्या दिशेने-
आमचा पाच जणांचा कंपू आदि कैलास – ॐ पर्वत यात्रेसाठी निघाला. आमच्या पैकी तिघांनी १९ मे २०२६ रोजी रेल्वेने दिल्लीकडे कूच केले. आम्ही दोन जणांनी २० मे २०२६ रोजी विमानाने दिल्ली गाठली. विमानतळावरून मेट्रो एक्सप्रेसचा आनंद घेत आम्ही नवी दिल्ली गाठली. दिल्लीच्या त्रस्त करणाऱ्या ट्रॅफिक आणि भयंकर उष्म्यापासून सुटका मिळाली! रात्रीच्या रानीखेत एक्सप्रेसने आम्ही सर्व काठगोदामला जाण्यासाठी निघालो. आमची ट्रेन दोन तास उशिराने धावत होती. जुनी दिल्ली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तीन तास कसे घालविले त्याचा विचारही नकोसा वाटतो! दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे सहाच्या दरम्यान कुमाऊं हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचलो. काठगोदाम स्टेशन बाहेर आल्यावर आमच्यासाठी गाडी तयारच होती आणि आमचा आदि कैलास यात्रेचा प्रवास सुरू झाला! आमच्या सहल संचालकाने आमच्या आदि कैलास पर्यंतच्या प्रवासा दरम्यान असणारे काही स्थलदर्शन सुद्धा समाविष्ट केले होते. त्यामुळे आम्ही सर्व खुश होतो.
काठगोदाम स्टेशनपासून अगदी दोन-तीन किलोमीटर अंतरावर हलद्वानी – नैनीताल मार्गावर रानिबाग येथे “रॉयल विंडसर” हॉटेल मध्ये आमच्या सकाळच्या नाष्ट्याची सोय केलेली होती. आम्ही सर्व जण फ्रेश झालो आणि मनसोक्त नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघालो. मी खूप वर्षाने पुन्हा ह्या प्रदेशात आले होते. सन १९९७ मध्ये नैनीतालची प्रथम भेट, त्यानंतर सन २०११ मध्ये पिंडारी ग्लेशियरच्या ट्रेकसाठी आणि सन २०१४ मध्ये मुक्तेश्वर सहलीच्या वेळी शेवटचा मुक्काम नैनीताल येथे केला होता. माझ्या आठवणीतले कुमाऊं आता पार बदलले होते. निसर्गाचा र्हास झालेला दिसत होता. काठगोदामला सकाळच्या वेळी सुद्धा वातावरणात उकाडा जाणवत होता.
उत्तराखंड राज्य गढवाल आणि कुमाऊं हिमालयात विभागलेले आहे. कुमाऊंचा प्रदेश अलमोडा, बागेश्वर, चंपावत, नैनीताल, पिथौरागढ आणि उधमसिंहनगर अश्या सहा जिल्ह्यात विस्तारलेला आहे. आपल्या नैसर्गिक वैभवाने आणि सौंदर्याने नटलेला, इतिहास आणि अध्यात्मिकतेने समृद्ध असलेला उत्तराखंड राज्यातील कासवाच्या पाठीच्या आकाराच्या डोंगराळ प्रदेशात पसरलेला कुमाऊं हिमालयाचा प्रदेश जणू एका सुंदर चित्राप्रमाणे! जिथे देवदार, पाईन, ओक यांसारख्या भव्य वृक्षांच्या आणि विविध रंगाने बहरलेल्या रोडोडेंड्रॉनच्या घनदाट जंगलांनी वेढलेल्या हिरव्यागार डोंगर टेकड्या! सफरचंद, पीच, जरदाळू, आलूबुखार यांच्या विपुल फळबागा आणि स्फटिकासम चमचमणाऱ्या पाण्याचे तलाव आणि निळ्या निरभ्र स्वच्छ आकाशात आपली नजर जिथवर पोहोचेल तिथवर दिसणार्या विशाल हिमालयाच्या पर्वतरांगा!
कैंची धाम -निम करोली बाबा आश्रम
आमच्या धारचुला पर्यंतच्या प्रवासासाठी एरटीगा गाडी देण्यात आली होती. आम्ही साधारण दिड-दोन तासातच कैंची धाम येथील ‘निम करोली बाबा’ यांच्या आश्रमाजवळ पोहोचलो. अगदी रस्त्यालगत असलेल्या कैंची धामला पर्यटकांची गर्दी लोटली होती. आम्ही गाडीतून उतरून बरेच अंतर पायी चालून गेलो. मी कैची धामला फार वर्षांपूर्वी भेट दिलेली होती. कैंची धाम एक अध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील आश्रमासोबत हनुमान मंदिराला देखील पर्यटक भेट देतात. अलीकडेच जागतिक ख्यातीच्या व्यक्तींच्या भेटीमुळे कैंची धाम पर्यटनाच्या पटलावर बहुचर्चित आहे. सर्वांवर प्रेम करावे, सेवा करावी, कायम सत्य वचन करावे अन् देवाचे नामस्मरण करावे अशी साधी पण वैश्विक शिकवण देणारे हे संत निम करोली बाबा अनेक सिद्धी प्राप्त केलेले होते असे सांगण्यात येते. हनुमानावर खास भक्ती असणार्या ह्या बाबांना संपूर्ण उत्तर भारतात “चमत्कारी बाबा” म्हणून देखील ओळखले जाते. आम्ही तेथील प्रचंड गर्दीतून काढता पाय घेत पुढच्या प्रवासाला लागलो.
जागेश्वर धाम
पिथौरागढच्या दिशेने जाताना, अल्मोरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर, भगवान शिवाला समर्पित १२५ पेक्षा अधिक प्राचीन मंदिरांचा समूह असलेले जागेश्वर धाम कुमाऊं हिमालयाच्या घनदाट देवदार वृक्षांनी वेढलेल्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेले आहे. जागेश्वरमध्ये प्राचीन दगडी मंदिराचे दोन समूह आहेत. जागेश्वरकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेला मंदिरांचा पहिला समूह ‘दांडेश्वर समूह’ आणि गावामध्ये प्रवेश केल्यावर दूसरा मंदिरांचा समूह आहे. या संकुलात ठिकठिकाणी विविध देवतांना समर्पित मंदिरे आहेत. दुपारचे दोन-अडीच वाजताच्या दरम्यान जागेश्वर मंदिर समूहापाशी पोहोचलो. दुपारच्या जेवणाची वेळ झाल्याने आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी भोजन करून जागेश्वर गावातील मंदिर समूहाला भेट दिली. मंदिर परिसराच्या शेजारीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने दोन दालनांचे एक संग्रहालय उभारलेले आहे. आम्ही मंदिर परिसर पाहिल्यानंतर संग्रहालयाला आवर्जून भेट दिली. केंची धाम आणि जागेश्वर मंदिर समूहाच्या भेटीने आमच्या आदि कैलाश-ॐ पर्वत यात्रेचा ‘श्री गणेशा’ झाला!
पिथौरागढ
आमच्या सहलीचा पहिला टप्पा होता पिथौरागढ! आम्ही रात्री पिथौरागढ येथील KMVN च्या पर्यटक आवासात मुक्कामासाठी पोहोचलो. एका खोऱ्यात विस्तीर्ण पसरलेले शहरवजा गाव म्हणजे पिथौरागढ! मूलभूत सोईनी सुसज्ज असलेले आणि मुख्यतः स्वच्छ असलेले गेस्ट हाऊस पाहून हायसे वाटले! आदल्या रात्रीच्या ट्रेन प्रवासात झोपेचे सोंगच झालेले होते त्यामुळे आम्ही लवकरच जेवण करून निद्राधीन झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. आमच्या पर्यटक आवासामधूनच थोडी पायपीट करीत वरच्या दिशेला चालत गेले. तिथून पिथौरागढचा परिसर दृष्टिक्षेपात येत होता. कुमाऊं हिमालयातले समुद्रसपाटीपासून सुमारे ५३३८ फुट उंचीवर वसलेले एक मोठे शहर – पिथौरागढ! चीनच्या आक्रमणानंतर, अल्मोडा जिल्ह्याचा एक मोठा भाग वेगळा करून पिथौरागढ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या नव्या जिल्ह्यात अत्यंत दुर्गम सीमावर्ती भागांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतचा हा जिल्हा असल्याने, लिपुलेख, कुंग्रिबिंग्री, लम्पिया धुरा, लावे धुरा, बेलचा आणि केओ ह्या महत्त्वाच्या खिंडी तिबेटच्या दिशेने उघडत असल्यामुळे त्याचे सामरिक महत्त्व खूप आहे. उत्तरेकडे तिबेट आणि पूर्व दिशेला नेपाळ अश्या दोन आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेला हा प्रदेश भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तितकाच संवेदनशील! उत्तरेस इंडो–तिबेटन जलविभाजक रेषा आणि पूर्वेस काली नदी नेपाळशी लागून असलेली सलग सीमा तयार करते.
प्राचीन काळी कुमाऊं क्षेत्राला मानसखंड आणि गढवाल क्षेत्राला केदारखंड म्हटले जायचे. स्कंद पुराणाच्या संदर्भानुसार पिथौरागढ आणि त्याचा आसपासचा परिसर हा मानसखंडाचा भाग होता, जो उत्तरेला कैलास पर्वतापासून ते दक्षिणेला भाबर आणि तराईपर्यंत पसरलेला होता. असुर आणि नाग ह्या प्रदेशचे मूळ रहिवासी असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर किरात, खस आणि कुनींद आले. नंतरच्या कालावधीत हा प्रदेश कुरमांचल राज्याच्या आधिपत्याखाली आला. ह्या प्रदेशांवर प्रामुख्याने चंद आणि कत्यूरी राजांचे साम्राज्य होते. चंद राजवटीमध्ये सांस्कृतिक पुनरुत्थानाचा काळही होता. पुरातत्वीय सर्वेक्षणांच्या संदर्भानुसार ह्या काळात संस्कृती आणि कला प्रकारांचा विकास झाल्याचे दर्शवतात.
पिथौरागढची निसर्गसंपदा तर अवर्णनिय! हिमालयाची उंच पर्वत शिखरे, विस्तीर्ण हिरवीगार कुरणे, असंख्य निर्झर, विविधतेने नटलेली घनदाट जंगले आणि अद्यापही बऱ्याच ठिकाणी निर्मळ राहिलेला निसर्ग! या जिल्ह्यात अनेक रमणीय पर्यटनस्थळे आहेत—चंदाक, थल केदार, गंगोलीहाट (काली मंदिरासाठी प्रसिद्ध), पाताळ भुवनेश्वर, बेरीनाग (चौकोरीच्या चहाच्या बागा), दिधीहाट, मुनस्यारी (मिलम, रालम आणि नामिक हिमनद्यांच्या ट्रेकसाठी बेस कॅम्प), धारचुला (कैलास–मानसरोवर यात्रा, आदि कैलास यात्रा आणि नारायण स्वामी आश्रम) आणि जौलजीबी. पिथौरागढ मोटोरेबल रोडने अनेक महत्वाच्या शहरांना जोडलेले असल्याने पर्यटक देशाच्या इतर भागातून इथवर येऊ शकतात.
मां उल्का देवी
आमचे पर्यटक आवास अगदी मुख्य रस्त्यालगतच होते. पर्यटक आवासाच्या शेजारीच उल्का देवी मातेचे मंदिर होते आणि त्याच्या बाजूला शहीद स्मारक. उल्का देवी मंदिराची स्थापना गोरखा समुदायाच्या शासनकाळामध्ये झाल्याचे सांगीतले जाते. मां उल्का देवी मंदिर हे येथील स्थानिकांसाठी आस्था, शक्ति आणि मनोकामना पूर्तीचे स्थान मानले जाते. हिंदू पंचांगातील पहिल्या महिन्यात म्हणजेच चैत्रात येथे “चैतोल” हा सण साजरा केला जातो. ह्या सणाचे स्वरूप साधारणपणे दोन दिवस आणि दोन रात्री साजरा होणाऱ्या महोत्सवाचे असते. ह्यावेळी, स्थानिक लोक जागरण करतात, त्यानंतर देवतांच्या मोठ्या जनसमुदायासोबत मिरवणुका निघतात. पिथौरागढ महोत्सवाचे खरे प्रयोजन त्यांच्या स्थानिक अद्वितीय संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्यासाठीच असावे! महोत्सवात कुमाऊंनी संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन केले जाते.
कुमाऊं मधील सण आणि लोकसाहित्य अगदी वैविध्यपूर्ण! गायन आणि लोकनृत्य हा त्यांच्या उत्सव आणि परंपरांचा अविभाज्य भाग! कुमाऊंनी होळीचा संगीतमय उत्सव असो किंवा पर्णीच्या हंगामाची सुरुवात साजरा करणारा सण, किंवा शिव-पार्वतीच्या विवाहाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा “हरेला” आणि “भिटौली” सण! गंगा नदीच्या स्वर्गातून पृथ्वीवर अवतरणाचा मे-जून दरम्यान साजरा होणारा उत्सव- गंगा दशहरा, आणि इतर ऋतु बदलानुसार साजरे होणारे सण कुमाऊंनी लोकांच्या निसर्गाशी समरूप होऊन जगण्याची प्रचिती देतात.
कुमाऊंच्या छोट्या–मोठ्या गावातून प्रवास करताना आपल्याला तेथील लोकजीवन, खाद्यसंस्कृतीची, राहणीमानाची, स्थानिकांच्या दैनंदीन कष्टप्रद दिनचर्येशी आपसुक तोंडओळख होत जाते. आम्ही तेथील मंदिराना दिलेल्या भेटीत मला आकर्षित केले ते “ऐपन” ह्या लोककला प्रकाराने! जसा महाराष्ट्रामधील गावांमध्ये सणासुदीला तांदळाच्या पिठाची रांगोळी अथवा ‘कणा’ काढतात त्याच प्रकारे एक शुभ आणि धार्मिक विधी म्हणून जमिनीवर किंवा भिंतींवर तांदळाची पेस्ट आणि गेरू वापरुन स्त्रिया पारंपरिक पद्धतीने भौमितिक रचनांची चित्रे तयार करतात. आजकाल ह्या लोककला विविध वस्तूंवर डिजिटल स्वरूपात उपयोग करून डायरी, कोस्टर, पिशव्या आणि अगदी साड्यांवर सुद्धा पाहण्यास मिळतात.
कुमाऊंनी खाद्य संस्कृतीमधील आवर्जून उल्लेख करावा असे पदार्थ म्हणजे भट्ट की चुरकानी (काळ्या सोयाबीनची आमटी), आलू के गुटके, बाडी, सींगोडी, लेसु, झांगोरा की खीर इत्यादि पदार्थ जरूर चाखून पहावेत असे. अल्मोडाची बालमिठाई तर प्रसिद्धच आहे!
पिथौरागढच्या नावामागेही एक इतिहास आहे. हिमालयाच्या कुशीत विसावलेला हा प्रदेश कधी कत्युरींच्या सामर्थ्याचा साक्षीदार होता, तर कधी सौरच्या बम राजांच्या कारकीर्दीचा. पण या भूमीवर सर्वाधिक ठसा उमटवला तो कुमाऊंच्या चंद राजांनी—ज्यांनी येथे एक भव्य किल्ला उभारून या पर्वतरांगांवर आपले साम्राज्य विस्तारले. चंद राजवंशातील सरदार पिरू, म्हणजेच पृथ्वी गोसाईन यांच्या नावाने पूर्वी ओळखले जाणारे हे गाव ‘पृथ्वीगढ’! नाव बदलले, काळ बदलला, पण या भूमीची ओळख मात्र तिच्या इतिहासाच्या खोल मुळांशी घट्ट जोडलेलीच राहिली. फक्त नावाचा अपभ्रंश झाला – पिथौरागढ! पिथौरागढच्या आधुनिक शहरातून जाताना आजही ही भूमी आपल्या हृदयात प्राचीन कुमाऊं इतिहासाची ओळख आणि वारसा जपत असल्याचे जागोजागी प्रतीत होते.
मां उल्का देवी मंदिर परिसरातून विस्तीर्ण पसरलेल्या पिथौरागढ शहराचा सुंदर नजारा दृष्टीस पडला. आम्ही मंदिर आणि शहिद स्मारकला भेट दिली. सकाळच्या हलक्या मंद हवेने मनाला आणि शरीराला तजेला मिळाला. आम्ही आमच्या पर्यटक आवासाकडे पावले वळविली. आम्हाला आमचा पुढचा टप्पा – गुंजी येथे पोहोचावयाचे होते! आम्ही नाश्ता आणि आंघोळी उरकून प्रसन्न मनाने पुढील प्रवासाला सुरुवात केली.
पिथौरागढ ते गुंजी या दरम्यानचा प्रवास मात्र शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवा आणणारा असाच आहे. अगदी वळणा-वळणाच्या डोंगर-पहाडांमधून पोखरून काढलेले रस्ते, सोबतीला खोल दऱ्या, आणि हवामानाची अनिश्चितता! भुसभुशीत हिमालयाच्या एखाद्या कडेकपारीला भवपाशातून कधी मुक्त व्हावे वाटेल याचा काही नेम नसतो! सतत कोसळणार्या दरडी रस्त्यांची दैना करून टाकतात. त्यातच इंद्र देव अवचित प्रसन्न होऊन पाऊस झाला तर मग काय विचारू नये अशी अनिश्चितता! जसजशी आमची गाडी अनेक मैलांचे अंतर कापत पुढे पळत होती, तसतशी समुद्रसपाटीपासूनची उंची वाढत होती. पिथौरागढ ते गुंजी हा १७० किलोमीटर अंतराचा टप्पा! किमान सहा ते सात तासांचा दीर्घ प्रवास होता.
एक पल्ला पार केल्यानंतर आम्ही जौलजिबी गावात थांबलो. येथे ऐतिहासिक ज्वालेश्वर महादेव मंदिर आहे. असकोट साम्राज्याचा राजा पुष्कर पाल याने हे मंदिर स्थापित केलेले आहे. जौलजिबीचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे गोरी नदी (धवलगंगा) आणि काली नदीचा संगम पहावयास मिळतो. ह्या काली नदीच्या अखंड प्रवाहाने दोन देशांमध्ये नैसर्गिकरित्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषा तयार केलेली आहे. हीच काली नदी पुढे “शारदा” नाव धारण करते. एका सस्पेंशन ब्रिजने दोन देशांच्या भूमीला जोडले आहे, जेणे करून दोन्ही देशातील लोक ये-जा करू शकतात. ह्या ब्रिजवरून ये-जा करण्यासाठी इथे आपल्या आधारकार्डची नोंद होते. आपल्याला ब्रिज पार करून पायी नेपाळ देशात जाऊन येता येते. फोटो/विडियो सक्त प्रतिबंधित आहे. आम्ही प्रदेशाचा पायीपायी सैरसपाटा करून आलो. नेपाळमध्ये जाऊन तेथील स्थानिक थंडपेय पिऊन आलो! आणि पुन्हा आमची गाडी धारचुलाच्या दिशेने धावू लागली. इथून पुढे सतत आपल्या फोन मध्ये अधेमध्ये नेपाळ देशाचे नेटवर्क ये-जा करीत राहते!
रस्त्यामध्ये बरेच ठिकाणी BRO च्या सौजन्याने रस्ता दुरुस्तीचे काम चालू होते, एका ठिकाणी लष्कराची गाडी नेमकी चढण असलेल्या वळणावर येऊन बंद पडलेली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक स्थगित झालेली होती. परंतु आम्ही अश्या सर्व अडथळ्यांना पार करून साधारण दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान धारचुला येथे पोहोचलो.

काली नदीच्या काठावर वसलेले आणि आदि कैलास यात्रेचा मुख्य पडाव असलेले सीमान्त शहर म्हणजे धारचुला! काली नदीच्या दोन तीरावर दोन देश वसलेले आहेत. अलीकडे भारत आणि पलीकडे नेपाळ! धारचुला येथे आमच्या दुपारच्या जेवणाची सोय केलेली होती. हॉटेलच्या बाल्कनी मधून नदी पल्याड नेपाळची लोकवस्ती दिसत होती. धारचुला येथे मात्र आमचे वाहन बदलण्यात आले. धारचुलापासून पुढील प्रवासासाठी फक्त एसयूव्ही-जीपच वापरल्या जातात. त्यामुळे आम्हाला स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली. आमच्या नव्या गाडीचा चालक – ‘बादल’ हा त्याच्या नावाप्रमाणेच अगदी मनस्वी होता. पण गाडीवरचा त्याचा ताबा वाखणण्याजोगा होता. आमचा लंच ब्रेक झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
धारचुला ते गुंजी
धारचुलाहून आम्ही गुंजीच्या दिशेने निघालो. धारचुला ते गुंजी अंदाजे ८० किलोमीटरचा प्रवास! धारचुलाहून तवाघाट, मालपा, आणि बुढीमार्गे पारंपरिक कुमाऊंनी गावांमधून जाणारा हा यात्रेचा मार्ग सतत काली नदीच्या काठाने पुढे जात राहतो. संपूर्ण प्रवासात भारत आणि नेपाळची नैसर्गिक सीमा असलेली काली नदी कधी आपल्या सोबत नजरेच्या टप्प्यात, अथवा कधी खोल दरीमध्ये अखंड खळाळत, कधी तिच्या विहंगम दृश्याने तर कधी तिच्या प्रचंड आवाजाने तिच्या अस्तित्वाची साक्ष देत साथ-सोबत करते. तवाघाटच्या लोखंडी पूलाजवळ डावीकडे एक रस्ता डोंगराच्या कुशीतून ‘दारमा व्हॅली’कडे जात होता. ह्या ब्रिजला धोेलीगंगा सेतु असे नामकरण केलेले आहे. पूल ओलांडल्यावर रस्ता अरुंद होत जातो. आम्ही तवाघाटचा पूल पार केला आणि अचानक पावसाने गाठले. आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण पावसाळी हवामानामुळे आदि कैलास आणि ॐ पर्वताचे दर्शन झाले नाही तर सर्व मुसळ केरात! पण काही अंतर गेल्यावर पाऊस थांबला. हायसे वाटले!
ह्या प्रवासात जसजशी उंची वाढत जाते, तसतसा निसर्ग बदलत जातो. घनदाट जंगले मागे पडतात, आणि पाईन, देवदारांची वृक्षराजी आपले लक्ष वेधून घेते. पुढे दूर उघडे, खडकाळ आणि बर्फाच्छादित हिमपर्वतांचे सुळके आपल्याला बोलावत राहतात! आणि मग आपण ‘आदि कैलाश’ यात्रेचा प्रवास करीत आहोत ह्याची जाणीव होऊ लागते. अत्यंत अरुंद आणि डोंगर कपारीतून कोरून काढलेले रस्ते, सलग असणारे एस-बेंडस (s-bends) वाहन चालकांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. त्यातच दरडी कोसळणे आणि रस्ता वाहून जाणे हे तर नित्याचेच!
कैलाश-मानसरोवर यात्रेचा मुख्य टप्पा असणारे “मालपा” गाव! येथे यात्रेकरू रात्रीच्या मुक्कामासाठी थांबत असत. साधारण सन १९९८ च्या ऑगस्ट महिन्यात पहाटेच्या सुमारास संपूर्ण ‘मालपा’ गाव एका प्रचंड भुस्खलनामुळे उध्वस्त झाले. कैलास यात्रेला निघालेले यात्रेकरू आणि स्थानिक यांच्यासह मोठी जीवित हानी झाली होती. ह्या भीषण घटनेत प्रसिद्ध नृत्यांगना प्रतिमा बेदी हिचा मृत्यू ओढविला होता. त्यामुळे ह्या मार्गावरचा प्रवास जागोजागी आपल्या हृदयाचा ठाव घेतो.
गुंजीकडे जाणारा रस्ता जितका थरारक तितकाच निसर्गरम्य सुद्धा! टप्प्या टप्प्यांमध्ये सहस्त्र सीमा दलाचे चेकपोस्ट आहेत. बुदी आणि चीयालेख येथे आमचा यात्रेचा परवाना तपासला गेला. चीयालेख चेकपोस्ट अत्यंत निसर्गरम्य आहे. चौफेर उंच हिमाच्छादित पर्वत शिखरे आणि हिरवीगार गवताळ कुरणे! सूर्य मावळतीला जात होता. घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांची किलबिल, हवेत झालेला आमूलाग्र बदल आणि सभोवतालचा परिसर सर्व काही मंत्रमुग्ध करणारे! काही अंतरावर गरबियांग येथे पुन्हा आमचा यात्रेचा परवाना तपासला गेला.

गरबियांग एक ऐतिहासिक सीमावर्ती गाव आहे. गरबियांग येथे काली नदी नेपाळ मधून येणाऱ्या टिंकर नदीला येऊन मिळते. भारत-तिबेट-नेपाळ ह्या तीन देशांच्या सीमांच्या संगमावर आदि कैलास आणि ॐ पर्वत यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक महत्त्वाचा मुक्कामाचा तळ म्हणून ह्या ठिकाणाला पसंती दिली जाते. इंडो-तिबेट व्यापार मार्गामुळे हे गाव कधीकाळी समृद्ध होते. परंतु भू: स्खलनामुळे येथील घरे क्षतिग्रस्त झालेली आहेत.
चीयालेख पासून गुंजी पर्यंतचा रस्ता अगदी थरारक आणि वाहनचालकाचा कस लागणारा आहे. चेक पोस्टवरून निघाल्यावर आमचा चालक बादल म्हणाला, “मॅडमजी अभी आप आगे आनेवाले मोड गिनते रहिये. जहा मोड खत्म, पहुच गये गुंजी”. मला काही कळेना! पण गाडी रस्त्यावर पळू लागली तेव्हा लक्षात आले, डोंगरामध्ये इतका आव्हानात्मक वळणदार रस्ता कोरून काढला होता की, जणू सर्पीलाकार “एस” अक्षराच्या पट्ट्या! एक तीव्र वळण जात नाही तर दुसरे अशी आम्ही अंदाजे तीस पेक्षा जास्त झिगझॅग वळणे मोजली. प्रत्यक्षात चीयालेख ते गुंजी मार्गावर साधारणपणे ८०-८५ एस-बेंडस आहेत. अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक रस्ता आहे!
प्रवासादरम्यानच आमच्या यात्रा संचालकाकडून खुशखबर मिळाली की, आम्हाला लिपुलेख पास पर्यंत जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे एक छोटा ट्रेक करून आम्ही लिपू लेख खिंडीतून दूरवर दिसणार्या साक्षात कैलास पर्वताचे सुद्धा दर्शन करू शकणार आहोत, ह्या कल्पनेने आम्ही सर्व खूप खुष झालो. थोडक्यात छोटा आणि मोठा कैलास अश्या दुहेरी दर्शनाचा लाभ होणार ह्यामुळे आनंद आणि उत्साह दोन्ही दुणावले!

चीयालेख पार केल्यावर आपण व्यास खोऱ्यात प्रवेश करतो. भारत-नेपाळ सीमेलगत प्रवास करत, डोंगर पोखरून काढलेल्या भयभीत करणाऱ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत आम्ही संध्याकाळी गुंजीला पोहोचलो. गुंजी गावाच्या आधी नापालचू मधील “शिवधाम” होमस्टे मध्ये आमची रहाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. आम्ही होमस्टेमध्ये प्रवेश करताच पावसाची रिपरिप चालू झाली. वातावरणात गारठा प्रचंड वाढला. गुंजीला रात्रीच्या वेळेला शून्य ते सहा डिग्रीच्या आसपास तपमान जाते. दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाशात आल्हाददायक हवामान असले तरी रात्री पाण्यात हातही घालू नये इतकी थंडी वाजू लागते. आम्हाला गरमागरम ब्लॅक टी दिला गेला, त्यामुळे शरीराला जरा ऊब मिळाली. होम स्टेबाहेर जाऊन आजूबाजूला काय आहे ह्याचा आढावा घेण्याची खूप इच्छा होती. परंतु पाऊस आणि गारठा ह्यामुळे निमूट आम्ही स्वत:ला जेवणाच्या वेळेपर्यंत खोलीत बंद करून घेतले! आमच्या होमस्टेमध्ये अजून काही लोकांचा मोठा कंपू होता. ह्या कंपूने मात्र फारच उच्छाद मांडला होता. रात्री खूप उशिरापर्यंत अगदी कर्णकर्कश आवाजात गाणी लावून त्यावर नाच आणि दंगा करीत होते. आपण भारतीय पर्यटक किमान शिष्टाचाराचे नियमही का पाळत नाही ह्याचे मला फार वैषम्य वाटते!
आम्ही लवकरच जेवण करून आपापल्या अंथरुणात विसावलो. उद्याच्या दिवसाची उत्कंठा होती! मनात आशंका होतीच, जर पाऊस थांबला नाही तर उद्याचे ‘आदि कैलाश’ पर्वताचे दर्शन होईल की नाही? ह्या धाकधुकीने डोळा लागत नव्हता. पण मनोमन त्या सांब सदाशिवाची प्रार्थना केली आणि घट्ट डोळे मिटून घेतले.
क्रमशः
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा