उत्तराखंड राज्यातील अल्मोडा जिल्ह्यात घनदाट देवदार वृक्षाच्या जंगलांनी वेढलेल्या हिरव्यागार टेकड्यांच्या परिसरात, जटा गंगा नदीच्या किनारी वर्षभर सुखद हवामानाचा वरदहस्त असलेले एक प्रसिद्ध आणि प्राचीन तीर्थस्थळ आहे – जागेश्वर धाम!
देवदारांच्या उंच वृक्षांची पार्श्वभूमी असलेल्या ह्या मंदिरांचा परिसर नितांत निसर्ग सुंदर असाच आहे आणि ही मंदिरे म्हणजे दगडात कोरलेली एक अखंड शिवनगरी जणू! ही मंदिरे त्या निसर्गरम्य शांत वातावरणात त्यांच्या रचनेतून भारताच्या समृद्ध स्थापत्य कलेची अद्वितीय परंपरा आपल्यासमोर उलगडतात.

पारंपरिक कैलास – मानसरोवर किंवा आदि कैलास यात्रेचा प्रारंभ बिंदु म्हणजे जागेश्वर धाम!
आदि कैलास-ॐ पर्वत यात्रेच्या निमित्ताने काठगोदामहून पिथौरागढ मुक्कामी जाताना आमच्या स्थल दर्शनामध्ये जागेश्वर मंदिर समूह समाविष्ट केलेले होते. आम्ही प्रथम कैंची धाम येथे पोहोचलो. तिथून आम्ही पुढे दुपारी दोन-अडीच वाजताच्या सुमारास जागेश्वर धाम येथे पोहोचलो. दुपारच्या जेवणाची वेळ झाल्याने आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी भोजन करून जागेश्वर गावातील मंदिर समूहाला भेट दिली. ह्यापुर्वी सन २०१४ मध्ये जागेश्वर धामला भेट दिलेली होती. परंतु आता पर्यटकांचा वावर तुलनेत जास्त होता.
अल्मोडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर, भगवान शिवाला समर्पित १२५ पेक्षा अधिक प्राचीन मंदिरांचा ऐतिहासिक समूह असलेले जागेश्वर धाम वसलेले आहे. जागेश्वरमध्ये प्राचीन दगडी मंदिराचे दोन समूह आहेत. जागेश्वरकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेला मंदिरांचा पहिला समूह ‘दांडेश्वर समूह’ आणि गावामध्ये प्रवेश केल्यावर दूसरा मंदिरांचा समूह आहे. या संकुलात ठिकठिकाणी विविध देवतांना समर्पित मंदिरे आहेत. ह्या ठिकाणाला बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग (नागेशं दारुकावने) म्हणून देखील गणले जाते. आदि शंकराचार्यांनी मूळ मंदिराचे पुनरुज्जीवन आणि नूतनीकरण केले असे सांगितले जाते.
जागेश्वर धाम हा केवळ मंदिर समूह नाही, तर प्राचीन शिल्पकला आणि ह्या प्रदेशाच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे. ह्या मंदिर संकुलातील भिंती आणि स्तंभांवर अनेक शिल्पे आणि शिलालेख कोरलेले आढळतात. ह्या मंदिर समूहाचा निर्माणकाल इ. स. ७ व्या शतकापासून ते १८ व्या शतकांपर्यंतचा असल्याचे सांगीतले जाते. ह्या समूहामध्ये प्रमुख मंदिरांमध्ये योगेश्वर (जागेश्वर), मृत्युंजय, केदारेश्वर, नवदुर्गा, सूर्य, नवग्रह, लकुलीश, बालेश्वर, पुष्टिदेवी आणि कालिका देवी यांची मंदिरे विशेष उल्लेखनीय आहेत.

७ व्या ते १४ व्या शतकांदरम्यान कत्यूरी राजांच्या शासनकाळात ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि बांधकाम झाले तर १५ वे ते १८ वे शतकात चंद शासकांनी वेळोवेळी दिलेल्या दानामुळे मंदिराची व्यवस्था राखली गेली. त्यामुळे ह्या मंदिर समूहाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक दृढ होत गेले. आजही जागेश्वर मंदिर समूह उत्तराखंडच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक म्हणून उभा आहे. सध्या जागेश्वर मंदिर समूह भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, देहरादून मंडळ यांच्याकडून राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून जतन केला जातो.

मंदिर संकुलाजवळच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने दोन दालनांचे एक संग्रहालय उभारलेले आहे. आम्ही मंदिर परिसर पाहिल्यानंतर संग्रहालयाला आवर्जून भेट दिली. पहिल्या दालनात या प्रदेशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्थानिक शासक पोना राजा यांचा चार फूट उंच कांस्य पुतळा आहे. संग्रहालयात पाऊल ठेवताच मनमोहक दगडी शिल्पे आपलं स्वागत करतात. उमा-महेश्वराच्या अप्रतिम प्रतिमा जतन केलेली आहे. तसेच सूर्यदेवाची नाजूक कलाकुसरीने सजवलेली उंच उभी भव्य मूर्ती असून तिच्या हातात कमळाची फुले आहेत.
संग्रहालय पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. माघारी जाताना आम्ही दंडेश्वर मंदिराजवळ थांबलो. दांडेश्वर मंदिर हे कुमाऊँ प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि उंच मंदिरांपैकी एक मानले जाते. कत्यूरी राजांनी इ.स.९- १०व्या शतका दरम्यान याची निर्मिती केली असावी अशी धारणा आहे. ह्या मंदिरसमूहात १४ उपमंदिरांचा समूह समाविष्ट आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून भगवान शिवाला समर्पित आहे.

श्रावण महिन्यामध्ये साजरा होणारा जागेश्वर पावसाळी उत्सव आणि साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान येणारा रंगीबेरंगी शिवरात्री मेळा असे दोन मुख्य उत्सव जागेश्वर धाममध्ये साजरे केले जातात.
केंची धाम आणि जागेश्वर मंदिर समूहाच्या भेटीने आमच्या आदि कैलाश-ओम पर्वत यात्रेचा ‘श्री गणेशा’ झाला.
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा