प्रवासवर्ष: एप्रिल १९९७
प्रवास टिपण: एप्रिल १९९७
गोष्ट आहे सन १९९७ ची! मार्च महिना संपलेला होता. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उजाडला अन् पर्यटनाचे वारे घरात घोंगाऊ लागले. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात छान जोडून सुट्टी आलेली होती. आम्हाला असलेल्या मोजक्या दहा दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये मनाला भावेल अश्या ठिकाणी भटकंती करण्यासाठी चर्चा-मसलत सुरू झाली. पण अगदी शेवटच्या क्षणी प्रवासाचे नियोजन खूप जिकिरीचे होते. आमच्या वडीलांनी हुकमी एक्का वापरला! आम्ही ‘केसरी टुर्स’ ह्या प्रवासी कंपनी सोबत नैनितालची सहल निश्चित केली. १३ एप्रिलला सहलीची नियोजित तारीख! अन् १२ तारखेला सर्व बुकींग, सहलीची माहिती पत्रके, विमानाचे तिकीट वगैरे सर्व नक्की झाले. मग मात्र आनंद दुणावला!
पर्यटन! भटकंती, प्रवास म्हणजे स्वाभाविकच परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन, त्यातल्या कमी अधिक उणिवा दूर सारून आनंद तेवढा वेचणे! नेहमीच्या यंत्रवत अन् घड्याळाच्या काट्यावर गतिमान असणार्या चाकोरी बद्ध जीवनाला निसर्गाप्रमाणेच मनस्वी आणि स्वछंदी करून त्याचा पिंड जोपासणे! ज्या ठिकाणी जातो तेथील हवामान, रहाणीमान, खान-पान सर्वच आगळे वेगळे! तिथले विचार, आचार, संस्कृती, लोककला, लोकजीवन अर्थातच सर्वच अभ्यासक, चिकित्सक आणि रसिक मनाने अनुभवण्याजोगे! हिंडण्या-फिरण्याने आपल्या वृत्ती उल्हासित तर होतातच, पण झाकोळलेल्या, मळभ आलेल्या मनाला चैतन्य, उभारी सुद्धा येते! ह्या भटकंती मध्ये निसर्गाकडूनही शिकण्यासारखे, अनुभवण्यासारखे बरेच काही असते! मानवापेक्षा परिस्थितीशी तद्रूप होते ते वन्य जीवन, वृक्ष वल्ली! हवामानानुसार,भौगोलिक रचनेनुसार अगदी पाना-फुलांची सुध्दा निसर्गाशी साधलेली समरूपता, एकरूपता पाहीली की आपण खूपच ठेंगणे वाटू लागतो.
रविवार – १३ एप्रिल १९९७:
‘केसरी टुर्सच्या’ सौजन्याने अश्या निसर्गाच्या सानिध्यात, थंड प्रदेशांची राणी – ‘क्वीन ऑफ हिल स्टेशन’ म्हणजे नैनीताल येथे जाण्याचा योग अगदी नेमका जुळून आला! रविवारी १३ एप्रिल १९९७ रोजी आमच्या प्रवासाची रात्री सुरूवात झाली. पहाटे तीन वाजताचे विमान असल्यामुळे संपूर्ण रात्र झोपेचे सोंगच झाले! त्यातही विमानात प्रवेश केल्यावर उड्डाणास सज्ज असलेले विमान परत काही तांत्रिक अडचणीमुळे चक्क दोन तास उशिरा सुटले. ‘मुंबई-दिल्ली-रोम-मॅंचेस्टर’ असे आमचे विमान त्याच्या पहिल्या मुक्कामी म्हणजे दिल्लीत ठीक सकाळी पावणे सातला पोहोचले.
सोमवार – ता. १४/०४/१९९७:-
मला १५/१६ वर्षांपूर्वी पाहीलेली अंधुक स्मृती पटलावर तरळणारी दिल्ली आठवू लागली! बराच काळ लोटला होता. राजधानीतही खुप बदल झालेला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘इंदिरा गांधी-पंतप्रधान’ होत्या आणि त्यांचे अस्तित्व, वास्तव्य होते. आज तो थोर,धडाडीचा नेता दिवंगत झालेला होता. नंतर त्यांच्या सुपुत्राचेही निधन झालेले होते. राजधानी मध्ये फक्त त्यांच्या स्मृतींच्या आणि कार्य-कर्तुत्वाच्या खुणा शिल्लक होत्या. आज सत्ता-खुर्चीसाठी चाललेला वितंडवाद मात्र संसदेत जोरदार होता. देशावर अत्यंत वाईट परिस्थिती आली आहे. अन् काही दशकांमध्येच काय होईल? अशी धाकधूक निर्माण करणारी सर्व प्रश्नचिन्हे जागोजागी दिसत होती. एकंदरीत हया देशाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीचा वरदहस्त लाभून देखील आज शोककळा पसरावी, अन् दारिद्र्य, हिंसाचार, पैसा आणि सत्ता, ऐश्वर्य आणि सहज सुखाची लालसा मानवाला दानव करून टाकत आहे हया विचारांनी मन दिल्ली स्टेशनजवळ येऊन थांबताच अस्वस्थ झाले.
दिल्ली स्टेशनवर अजमेरी गेट जवळ सर्व केसरी टूर्सच्या मंडळीनी एकत्रित जमायचे होते. कारण तिथे नियोजित ‘पिकअप पॉइंट’ होता. त्यामुळे आम्ही दिल्ली विमानतळावरून प्रिपेड टॅक्सी करून न्यू दिल्लीच्या अजमेरी गेटपाशी येऊन थांबलो. तोपर्यत सकाळचे आठ वाजत आले होते. दिल्लीहून नैनीतालकडे कूच करण्याची नियोजित वेळ दुपारी साडे अकराची होती. वातावरणात असह्य उकाडा होता. नजर ‘केसरी टुर्स’च्या लक्झरी बसेसचे वेध घेऊ लागली. मनात ‘थंड हवेची राणी -नैनीताल’ झिम्मा खेळत होती. त्यामुळे उन्हाचे चटके सुसह्य होत होते! सुदैवाने ‘केसरी’ च्या बसेस लवकरच आल्या. अखेरीस दुपारी बारा वाजता आम्ही दिल्लीहून नैनीतालकडे जाण्यास निघालो. एकूण तीन लक्झरी बसेस होत्या. सुरुवातीला सर्व मंडळींना नाश्ता आणि फ्रूटी पेय देण्यात आले. एकूण दहा तासांचा प्रवास होता. गाडी सुरू होताच अचानक निद्रादेवीने अंमल सुरू केला. प्रवासामध्ये दुपारच्या जेवणासाठी गजरौला येथे आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी चहासाठी गाडी थांबली. अद्यापही काठगोदाम ८० किलोमीटर अंतरावर असल्याचे कळले. तिथून पुढे ४० किलोमीटरचा नैनीताल पर्यंतचा घाट होता. अत्यंत नागमोडी वळणे आणि झाकोळत अंधाराची शाल पांघरून आलेली संध्याकाळ!
काठगोदामपर्यंत ‘थंड’ हया शब्दाशी जणू जवळीकही नव्हती. जशी गाडी काठगेादाम येथे पोहोचली तसा अचानक हवेत आमूलाग्र बदल जाणवू लागला. काठगोदामपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा शेते पसरलेली दिसत होती. शेतांमध्ये गिधाडांची झुंबड, अधूनमधून शहरी वस्ती, गावे, रस्त्याच्या कडेला असणारे केनवुडचे फर्निचर विक्रेते असे दृश्य दिसत होते. एकंदरीत गावे म्हणजे वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नजरेस तरी बकाल आणि मागास वाटली. कदाचित ग्रामीण जीवन फार कष्टप्रद असावे! काठगोदाम स्टेशन गेल्यावर गाडी घाट चढू लागली. अन् थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला सुखावून गेली. आकाशात चांदण्या जमल्या होत्या. चंद्राशी गुजगोष्टी करत होत्या! वर चंद्राच्या झुंबराचे विशाल आभाळाचे छत, एका बाजूला खडे पहाड, दुसर्या बाजूने खोल दरी! मध्येच कुठे तरी डोंगराच्या कुशीत नदीच्या पात्रालगत चिमुकल्या घरांची वस्ती चमचमणाऱ्या प्रकाशामुळे दिसत होती. सुरुवातीला येणारा थंडगार वारा त्याची तीव्रता दाखवू लागला. गुलाबी थंडी म्हणून बराच वेळ गार वारं अंगावर घेत राहिलो. परंतु काही वेळाने खिडक्या बंद कराव्या लागल्या इतकी थंडी जाणवू लागली! रात्री दहाच्या सुमारास आम्ही नैनीताल येथे पोहोचलो. नैनीतालच्या मॉल रोडवर तल्लीतालमधील “हॉटेल एल्फिन्स्टॉन” – आमच्या नियोजित वास्तव्याचे ठिकाण होते. तिथे पोहोचताच संयोजकांच्या पत्नी सौ. सुनिता पाटील उर्फ “जिजी” यांनी सर्वांचे स्वागत करून प्रत्येकाला आपापल्या सुसज्ज खोल्या ताब्यात दिल्या व भोजनाची उत्तम व्यवस्था केली. मी आणि वडीलानी उपवास असल्याने मनसोक्तपणे भोजनावर ताव मारून ‘जाणिजे यज्ञकर्म – अन्न हे पूर्णब्रम्ह’ केले! प्रवासामुळे खूप थकवा आला होता. एकंदरीत व्यवस्था छान होती.
मंगळवार, ता. १५/०४/१९९७:-
नैनी सरोवराकाठची मनोरम सकाळ!
सकाळीच पक्षांच्या मधुर किलबिलाटाने जाग आली आणि साडेसहा वाजता “बेड-टी”ची आरोळी झाली! रविराज आपल्या सहस्त्र रश्मीचे जाळे पसरवून निसर्गाला सुप्रभात करीत होते. खोलीतून बाहेर बाल्कनीत आले आणि विलोभनीय दृश्य नजरेस पडले. ब्रिटिशांच्या कल्पकतेची आणि कलात्मकतेची जाणीव करून देणारी हॉटेलची रचना सुंदर होती! प्रत्येक मजल्यावरील खोलीला समोरच्या बाजूने नैसर्गिक दृश्यांची उघडीप होती. पहिल्या मजल्यावरील खोल्यांपुढे मऊशार हिरवळ, कुंड्यांमधून वाढवलेली निरनिराळी कॅक्टस कल्पकतेने सजविलेली होती. आमची खोली दुसर्या मजल्यावर होती. डाकबंगल्याच्या एखाद्या प्रशस्त सूट प्रमाणे खोलीची रचना होती. ड्रेसिंग रूम, बेडरूम, बाहेर फॉर्मल सिटींग रूम! आणि त्याबाहेर बाल्कनी! तिथूनच सकाळी दिसणारे नैनीताल फारच मनमोहक होते. गुलाबी थंडीत आयता चहाचा कप आणि जोडीला निसर्गाचा देखावा! अहाहा! समोर दिसणारे शांत नैनी सरोवर, त्याला वेढणाऱ्या पर्वतरांगा, जवळच नैनादेवीच्या मंदिरात होणारा घंटानाद, आणि पर्वतांवर असलेली घनदाट देवदार वृक्षराजी! खरोखर अगदी यथायोग्य वर्णन- क्वीन्स ऑफ हिल स्टेशन!
कुमाऊंची राणी – नैनीताल
उत्तर प्रदेशातील (आजचे उत्तराखंड) समुद्र सपाटीपासून १९३८ मीटर उंचीवर कुमाऊं टेकड्यांवर वसलेले नैनीताल म्हणजे निसर्गाचा आगळावेगळा आविष्कार आहे. कुमाऊं किंवा कुरूमाचल प्रदेश म्हणजे कासवाच्या पाठीच्या आकाराचा प्रदेश! येथील प्रत्येक ठिकाणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक पार्श्वभूमी आहे. त्याला वास्तु कला शास्त्राचीही जोड आहे. आजही ब्रिटीशांनी त्यांच्याकरिता वसवविलेल्या हया शहराच्या जागोजागी प्रातिनिधिक खुणा सुस्पष्ट आहेत. नैनीतालला पर्यटन स्थळ म्हणून जगभर प्रसिद्धी सन १८४१ मध्ये पीटर बॅरत नावाच्या ब्रिटिश वंशाच्या व्यक्तीमुळे मिळाली. नैनीतालचे रमणीय नैसर्गिक वातावरण आणि सुखद हवामानामुळे इंग्रजानी हया शहराला ग्रीष्मकालीन राजधानीचे स्वरूप दिले होते.
सहलीच्या आयोजनाप्रमाणे आजचा सकाळचा वेळ विश्रांतीचा आणि परस्पर परिचय कार्यक्रमाचा होता. उबदार पाण्याने आंघोळी आटोपून, चहा-नाश्ता करून सर्व केसरी मंडळी हॉटेलमधील कॉन्फरन्स रूममध्ये परस्पर परिचयासाठी जमली. केसरी टुर्सच्या संचालक “जिजि” आणि सहलीचे ग्रुप लिडर आणि त्यांचे अनेक सहकारी हयांनी अत्यंत सहजतेने व खेळीमेळीच्या वातावरणात परस्पर परिचयाचा कार्यक्रम पार पडला. प्रत्येकाने आपापले नाव, कार्यक्षेत्र, छंद सांगून परस्पर परिचय करून घेतला. त्यामुळे मनोलहरी जुळण्यास सुलभता आली. केसरीच्या ग्रुप लिडरने सहलीचा आखीव कार्यक्रम सांगीतला. परिचयाच्या कार्यक्रमानंतर नैनीताल मधील प्रसिध्द् नैनीलेकमध्ये बोटींग, नैनादेवी मंदीराचे दर्शन आणि संध्याकाळी रोपवे राईड, स्नो व्हयू पॉइंटचे दर्शन असा त्या दिवसाचा कार्यक्रम होता.
‘नैनीलेक’ मधील नौकानयन!
नैनीताल चौफेर पर्वतरांगांनी अन् घनदाट वृक्षराजींनी संपन्न असलेले आणि सरोवरांचे शहर! नैनीतालमध्ये प्रवेश केल्यावरच नजरेस पडतो तो ‘नैनीलेक’! सरोवराचे नाव त्या सरोवराच्या काठाशी असलेल्या नैनादेवी मातेच्या मंदिराच्या नावावरून पडले असे म्हणतात. परंतु अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. हया सरोवराला ‘त्रिऋषी’ सरोवर सुध्दा म्हणतात, कारण एक दंतकथेनुसार अत्रि, पुलस्त्य आणि पुलह ऋषींनी मानस सरोवराच्या पवित्र जलापासून तलावाचे निर्माण केले असे सांगीतले जाते म्हणून हयाला ‘लघु मानस सरोवर’ सुद्धा म्हणतात.
आम्हा सर्वांना सरोवरामध्ये नौका विहारासाठी कुपन्स देण्यात आले. नैनीलेकमध्ये पेंडल बोटींगचा (पायांनी चालवण्याची) आनंद काही वेगळाच होता. सरोवराची व्याप्ती खूपच मोठी होती. साधारणतः २९ मीटर खोल आणि ३६२० मीटर परीघ असलेल्या हया सरोवराचे सौंदर्य काही वेगळेच होते. परिकथेत असणार्या हिरव्यागार वनराजीप्रमाणे सरोवराच्या वरच्या अंगाला झाडांची दाटी, एका बाजूला नैनादेवीचे मंदीर आणि पर्वतरांगा! बोटींगचा मनसेाक्त आनंद लुटला. थंड हवेमुळे अजिबात थकवा जाणवला नाही.
संध्याकाळी रोपवे राईडला जाण्यासाठी निघालो. नैनीताल शहराचे वरचा आणि खालचा असे दोन भागात विभाजन केलेले आहे, पैकी खालच्या बाजूस म्हणजे शहराच्या सुरुवातीला असणार्या भागास ‘तल्लीताल ’ म्हणतात आणि वरच्या बाजूस ‘मल्लीताल’! ह्या दोन्ही भागांना जोडणारा मॉल रोड! ब्रिटीश प्रशासनाचा नमुना! हया मॉल रोडचेही विभाजन केलेले आहे. पूर्वी ब्रिटीशांच्या काळात गोऱ्या लोकांसाठी जाण्याचा वरच्या बाजूचा रस्ता अन् स्थानिक लोकांसाठी खालच्या बाजूचा!
रोपवे राईडला जाण्यासाठी मल्लीताल येथे जायचे होते. माणसांनी वाहून नेण्याच्या सायकल रिक्षांमधून जायचे होते. मनाला काही पटेना! अमानवी वाटू लागले! पण वेळेत ग्रुप बरोबर जाणे सक्तीचे होते आणि एक प्रकारे स्थानिकांची रोजीरोटी! त्यामुळे आम्ही पाच ते सहा मिनिटांसाठी सायकल रिक्षात बसलो. दोन माणसांसाठी तीन रूपये, आणि तीन जण असतील तर पाच रूपये! रोपवे मधून स्नो व्हयू पॉइंटला जाताना नैनीताल शहराचे दर्शन झाले. विस्तीर्ण जलाशय असलेला नैनीलेक! बाजूने कुमाऊं पर्वतरांगा! आणि त्यांच्या कुशीमध्ये जागोजागी विसावलेली छोटी मोठी घरे! माणसाच्या जगण्यासाठीची, अस्तित्वासाठीची स्पर्धा!
उत्कृष्टपणे बांधलेली चर्चेस, शाळा येथील शैक्षणिक पार्श्वभूमीचे द्योतक होते! रोपवेच्या ट्रॉलीने ‘स्नो व्हयू’ पॉइंटला गेलो. स्नो व्हयू पॉइंटवरून उत्तरेकडील हिमालयाचे दर्शन होते. बर्फाच्छादित पर्वतरांगांचे सौंदर्य अनुभवण्यास हे ठिकाण सर्वोत्तम आहे. अर्थातच निसर्गराजा प्रसन्न असेल तरच! आम्हाला हवा ढगाळ असल्यामुळे ‘स्नो-व्हयू’ काही मिळाला नाही. परंतु इथून दिसणारे दृश्य फार विहंगम होते. तिथून एक स्थानिक चाचा आपल्या मोठ्या टेली दुर्बिणी मधून नैनीताल शहराच्या विशेष स्थळांचे दर्शन घडवून आणत होते. तिथेच चहापानाचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर सर्वजण नैनादेवीच्या मंदीरात गेलो. प्रशस्त मंडप असलेले देवी मातेचे मंदीर नैनालेकच्या काठापाशीच होते. मन प्रसन्न झाले. नंतर सर्वजण शेजारीच असलेल्या तिबेटीयन मार्केटमध्ये गेलो. सुंदर रंगाच्या, देखण्या नाजूक तरूण आणि मध्यमवयीन तिबेटीयन स्त्रिया अत्यंत व्यवहार कुशलतेने अनेकविध वस्तुंची विक्री करण्यात व्यस्त होत्या. अगदी कपड्यांपासून ते इलेक्ट्रानिक्स वस्तू, लेदरच्या वस्तू वगैरे विकण्यासाठी दुकाने थाटलेली होती. तिथून येताना मॉलरोडवरून चालत निघालो. संध्याकाळच्या वेळी तळयाकाठी मारलेला फेरफटका आनंददायी होता. मॉल रोडवरून चालताना वृक्षराजी, विविध दुकाने, खाद्य पदार्थांची हॉटेल्स ह्यांची रेलचेल दिसत होती.
नैनीतालमधील थंड हवा उल्हसित करते. नैनीतालच्या उत्तरेला चेन्ना पर्वत श्रृंखला, पश्चिमेला देवपथ आणि दक्षिणेला अंयारपाटा पर्वत श्रृंखला आहेत. रात्री दिव्यांच्या प्रकाशात हया पर्वतरांगा दिवाळीच्या दिव्यांची आरास केल्याप्रमाणे भासतात. त्यांचे सरोवरामध्ये पडणारे प्रतिबिंब मनाला मोहून टाकते. ह्या सर्व सौंदर्याचे नेत्रसुख घेत हॉटेलवर कधी पोहोचले कळले सुद्धा नाही.
बुधवार- दि.१६/०४/१९९७ – रामनवमी:-
रानीखेत-कौसानी
पहाटे वीजांच्या कडकडाटासह झालेल्या हिमवर्षावामुळे झोप उडालेली होती आणि आम्ही त्या गुलाबी थंडीत हॉटेलमध्ये उबदार ब्लँकेट पांघरून गुडूप झालेलो होतो. थंडीचा कडाका पावसामुळे अचानक वाढला. सकाळी उजाडताच बाल्कनीमध्ये जाऊन समोरच दिसणाऱ्या पर्वतरांगा आणि वृक्षराजीचे मनोरम दृश्य दिसत होते. आल्हाददायक अनुभव होता तो! निसर्गाची किमया, त्या वातावरणामधील जादू शब्दात पकडण्यासारखी नव्हेच! अगदी स्वच्छंदी होऊन छोटे झरे वाहू लागले होते! नैनीलेकचे पाणी अधिक चमकदार वाटू लागले.
सकाळी रानीखेत मार्गे कौसानीला जायचा कार्यक्रम होता. रानीखेत हे कुमाऊं पर्वतरांगेमधील हिमालयाच्या कुशीत वसलेले थंड हवेचे ठिकाण! असंख्य पर्वतरांगा, त्यावर सृष्टि देवीने मुक्त हस्ते उधळलेले विविध रंग हीच राणीखेतची खरी ओळख! चीड, देवदार, पाईन वृक्षांनी वेढलेले असे हे पर्यटन स्थळ आहे. येथील ग्रामीण जीवन आणि नैसर्गिक सौंदर्याची लयलूट मनाला भुरळ पाडते. ‘रानीखेत’ या नावाविषयी सुध्दा एक दंतकथा प्रसिध्द आहे. एक राणी आपल्या निसर्ग यात्रेत रममाण असताना हया ठिकाणी आली. इथल्या सौंदर्याने मुग्ध होऊन आपले निवासस्थान हया ठिकाणी वसवविले. हिमालयाच्या विशाल पर्वतरांगाचे होणारे दर्शन, सभोवार पाईन, देवदारांची वृक्षराजी, दूरदूर पसरलेली शेते त्यामध्ये विविध रंगांची लयलूट! शेतांच्या सानिध्यात असलेले राणीचे निवास स्थान अर्थातच् ‘राणीखेत’! राणीखेतला कुमाऊंचे छावणी क्षेत्र आहे. कुमाऊं रेजीमेंटचे मुख्य कार्यालय राणीखेत येथे आहे.
नीम करोली बाबा आश्रम-कैंची –
प्रथम आम्ही रस्त्यामध्ये ‘‘कैंची’’ येथे नीमकरोली बाबा हयांच्या आश्रमास भेट दिली. अत्यंत स्वच्छंद, शांत आणि प्रसन्नतेचे वातावरण होते. मंदिराची जागा तर अत्यंत सुरेख होती. बाजूने वाहणारी नदी, रस्त्याच्या पलीकडे डोंगरांच्या कुशीत विसावलेली, बोटांवर मोजण्या इतपत घरे! अलीकडे कैंचीधाम म्हणजेच नीमकरोली बाबांची मठी! आणि नीरव शांतता! निसर्गात रममाण होऊन स्वतःशी आणि परमात्म्याशी जवळीक साधायची असेल तर हयापेक्षा दुसरी योग्य जागा नाही! प्रकृती आणि आत्मा हयांना जोडणारा दुवा! निश्चितच आत्मिक आनंदाने मन फुलून आले. हे बाबा म्हणजे इथले स्थानिक लोकांनी मानलेले दैवी अवतार! अनेक रोगांवर कुमाऊं पर्वत रांगांच्या कुशीत दडलेल्या औषधी वनस्पतींचा योग्य वापर करून लोकांना त्याचा लाभ घडवून देणारे हे तेथील मानलेले संतच! त्यांच्या मठालगत दुर्गामातेचे, रामसीता आणि हनुमानाचे मंदिर आहे. अगदी रस्त्यावर असलेले हे ठिकाण मनाला खूप भावले. मंदिराच्या बाहेरच तिथे वास्तव्यास असलेल्या लोकांनी दुकान वजा स्टॉल थाटलेले होते. एक सरबताचे दुकान होते. पिवळ्या रंगाचे लिंबू वर्गातले मोसंबीपेक्षा मोठे (माल्टा)पिवळ्या सालीच्या फळाचे ताजे गारेगार सरबत तिथे विकण्यास ठेवले होते. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो. अत्यंत वळणावळणाचा रस्ता, एका बाजूला डोंगर-पहाड आणि खाली दरीतून दिसणारे नदीचे पात्र असा रस्ता अनेक किलोमीटर पर्यंत होता.
चिलीयानौला – हैंडाखान बाबा मंदीर-
साधारणतः राणीखेतपासून पाच किलोमीटरवर असणाऱ्या “चिलीयानौला” हया गावी हैंडाखान बाबा मंदीराला भेट दिली. हेही तेथील थोर व दैवी शक्तीचा संचार असलेली विभूती होते. मंदिराची पार्श्वभूमी फारच सुंदर आहे. संगमरवरी मंदिरात प्रवेश केल्यावर मुर्तीच्या दर्शनाने आणि शांत वातावरणाने मन प्रसन्न होते. मंदिराच्या प्रांगणात छोटे-छोटे बगीचे आहेत आणि नानाविध प्रकारच्या व रंगांच्या फुलांनी मंदिराच्या परिसराची शोभा अधिकच खुलवली आहे. इथूनही हिमालय दर्शन घडते. मंदीरातून खालच्या बाजूस उतरून गेल्यावर ‘कुमाऊं मंडळ विकास निगम’ चे शानदार विश्राम गृह आहे. पंचतारांकीत हॉटेलच्या तोडीने त्याचे बाह्य स्वरूप जाणवते. तसेच येथे धर्मादाय हॉस्पिटल देखील आहे. आयुर्वेदिक औषधांचा कारखाना हेही येथील वैशिष्ट्य आहे. कुमाऊं परिसरांत मिळणाऱ्या वनौषधीपासून येथे औषधे बनवली जातात. आम्ही किरकोळ खरेदी करून परत आमचा प्रवास सुरू झाला.
युद्ध संग्रहालय
रानीखेतमध्येच भारतीय सैन्यातील कुमाऊं रेजीमेंटने निर्माण केलेले युद्ध संग्रहालय आहे. संग्रहालयामध्ये पहिल्या जागतिक युद्धामध्ये हस्तगत केलेल्या अनेक जुन्या शस्त्रांचे व आर्मी रायफल असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे देण्यात आलेल्या पदकांचे त्यांच्या मानक-यांच्या नावासकट प्रदर्शनी ठेवलेले आहे. पहिल्या व दुस-या महायुद्दात हस्तगत केलेल्या शस्त्रांमध्ये इटालीयन तसेच जपानी बनावटीची रायफली, पिस्तूले तसेच ‘बेसागन’ संग्रही आहेत. प्रामुख्याने अंगावर रोमांच उठविणारी, शौर्याचे आणि देश प्रेमाचा उमाळा सहजच मनामध्ये आणणारी विशेष गोष्ट संग्रहालयात आहे, ती म्हणजे दुसऱ्या परमवीर चक्राचे मानकरी ‘‘सैतान सिंग’’ यांचे बंदुकीच्या गोळयांनी छिन्न-विछीन्न झालेले जॅकेट जतन करून ठेवले आहे. संग्रहालयाच्या बाहेर भारतीय युद्ध इतिहासात पहिले परमवीर चक्र प्राप्त मेजर सोमनाथ शर्मा यांच्या नावाचे शहीद स्मारक आहे. संग्रहालयाच्या परिसरातून उतरून खालच्या बाजूस युद्धामध्ये गतप्राण झालेल्या लढवय्या योद्ध्यांच्या विधवा स्त्रियांसाठी निर्माण केलेले प्रशिक्षण व उत्पादन केंद्र आहे. तिथे शाली व इतर लोकरीच्या वस्तू तयार केल्या जातात. पर्यटकांसाठी त्या वाजवी दरात तिथे उपलब्ध केल्या जातात. आपलेही काही कर्तव्य हया भावनेने आम्ही तिथे गरम कपड्यांची खरेदी केली. जवळच एका पूर्व नियोजित ठिकाणी आमच्या दुपारच्या जेवणासाठी व्यवस्था केली होती. तिथे जेवण करून काही वेळ विश्रांती घेतली. निसर्ग राजाने आपला मूड थोडा बदलला होता. पावसाची रिपरिप चालूच होती. त्यामुळे कुंद हवेत अत्यंत गारवा होता. भर दुपारी सर्व जण थंडीने हुडहुडत होते. तिथून पुढे निघून आम्ही कौसानीच्या दिशेने प्रयाण केले.
रस्त्यामध्ये फिल्म शूटिंग साठी प्रसिध्द गोल्फ ग्राऊंड आहे. डांबरी रस्ता! आणि दुतर्फा पसरलेले देवदारांचे वृक्ष! त्यामध्ये गोल्फचे मैदान! अगदी सिनेमामध्ये धावत गाणे म्हणतात त्याप्रमाणे धावावे वाटले. झाडांच्या मधून साद घालत पळत सुटावे असे वाटले! परंतु कडाक्याची थंडी व पावसाच्या रिपरिपमुळे आमची मजल फक्त कॅमेरामध्ये दृश्य चित्रित करण्यापुरतीच सीमित राहिली. निमिष मात्र डोळे उघडे ठेवून दिवास्वप्नाप्रमाणे मनाला मात्र हया झाडांमधून मैदानावर स्वच्छंदी धावण्यास, पळण्यास मुक्तता दिली होती. तिथून थेट आम्ही निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व हिमालयाचे अतिशय जवळून दर्शन घडविणाऱ्या कौसानीला जायचे होते. मनामध्ये अनेक कल्पना आकार घेत होत्या. नेपाळ सहलीनंतर परत एकदा हिमालयाचे दर्शन होणार होते.
अनासक्ती आश्रम – कौसानी
अल्मोडा जिल्ह्यातील पर्यटकांसाठी स्वर्ग असणारे नयन मनोरम- कौसानी! कौसानीला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते ते काही चूक नाही! घनदाट वृक्षराजी, फुलांनी डवरलेली झुडपे, रसदार फळांनी सजलेल्या बागा, मनमोहक सुगंधांनी मोहोरलेले वळणदार घाट रस्ते! रस्त्याने जाताना विखुरलेल्या फुलांप्रमाणे दिसणारी जनसामान्यांची छोटी घरे मनाला मुग्ध करत होती. एकमेकांशी स्पर्धा करीत, लपंडाव करीत पर्वतरांगांवर रूंजी घालणारे ढग! हया निसर्ग सौदर्यांचे वर्णन शब्द बद्ध करूच शकत नाही. केवळ नेत्र सुख घेऊन अनुभवण्याचा आनंदच घ्यावा! डोंगरामध्ये वसलेले कौसानी- नैसर्गिक, अभिजात, सौंदर्याचे व प्रसन्न वातावरणाचे वरदान मिळालेले एक पर्यटन स्थळ! कौसानीच्या एका बाजूस वाहते कोसी नदी आणि दुसर्या बाजूस गोमती नदी! दोन्ही नद्यांच्या मधील पिंगनाथ शिखरावर वसलेले आहे ‘कौसानी’! कौसानीला जातानाच काही वळणांवरून हिमालयाचे स्वरूप नजरेस भरत होते.
कौसानीला महात्मा गांधीच्या अनासक्ती आश्रमात गेल्यावर तिथे गांधीच्या जीवनावर चित्रमय लघुपट अनुभवला. कौसानीला गांधीजींनी सन १९२९ मध्ये साधारणतः बारा दिवसांच्या मुक्कामात अनासक्ती योगासंदर्भात टिप्पणी लिहिलेली आहे. गांधीजींनी कौसानीचे निसर्ग सौंदर्य आणि मन उल्हासित करणाऱ्या हवामानाची खूपच प्रशंसा केली आहे. स्वर्गीय सुखाचा आनंद मिळाल्याचे समाधान कौसानीला पोहोचताच होते. गांधीजींच्या आश्रमात एक प्रार्थना हॉल आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये अभ्यासक पर्यटकांची अध्ययन व निवासाची सोय केली आहे. एकंदरीत वातावरण शांत आणि चित्त एकाग्र करणारे आहे. गांधीजींनी कौसानीच्या वास्तव्यानंतर केलेले वर्णन फारच सुंदर आहे. त्यांच्या मते कुमाऊं पर्वतरांगांमध्ये इतके प्राकृतिक सौंदर्य, प्रसन्न हवा, चेतनादायी वातावरण असताना शरीर व मन स्वास्थासाठी आपल्या भारतीयांना युरोपसारख्या ठिकाणी जाण्याची गरजच काय? हे तर भारताचे स्वित्झर्लंडच आहे! गांधीजींचे म्हणणे अगदी यथार्थ आहे. कौसानीचा सूर्योदय तर जग प्रसिध्द आहेच परंतु सूर्यास्तही फार प्रेक्षणीय आहे. सूर्यास्ताच्या वेळी ३५० किलोमीटर दूरवर पसरलेल्या हिमालय रांगांमधील हिमशिखरांवर त्याची मावळतीची किरणे विविध रंगाच्या छटा फाकत डोळ्याचे पारणे फेडतात. मावळत्या सुर्यकिरणांचे परावर्तन हिमशिखरांवर होऊन बर्फाच्या राशी स्फटिकांप्रमाणे विविध रंगांमधे प्रतिबिंबित होताना दिसतात. गांधी आश्रमाच्या प्रांगणातून अगदी सहजतेने हिमालय रांगांमधील नंदाघुटी, त्रिशूल, सुंदरडुंगा हया हिमशिखरांचे दर्शन झाले. सूर्यास्तानंतर अल्मोडामार्गे नैनीतालला परतताना बालमिठाई घेतली. निव्वळ शुद्ध व ताज्या खव्यापासून बनणारी येथील बालमिठाई खूप प्रसिध्द आहे. स्वर्गीय सुखाच्या नादातच कौसानीहून रात्री नैनीतालला परतलो.
रात्री परतीच्या प्रवासात कायम आठवणीत राहील असा एक अनुभव पावसाळी वातावरणाने कुमाऊंच्या घाटात आला. एक ट्रक त्याचा मार्ग सोडून आमच्या मारूती गाडीच्या दिशेने आला. प्रसंगावधान राखत आमच्या ड्रायव्हरने गाडीला रिव्हर्स घेऊन गाडी तशीच मागे नेली. क्षणातच समोर आलेला ट्रक डाव्या बाजूच्या डोंगर कपारीवर आदळला. अंगावर शहारे उठले. क्षणमात्र सर्वांचे धाबे दणाणले होते. हृदयाची गती मंदावली होती. परंतु सराईत ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेने होणारा अपघात टळला.
गुरूवार – दि.१७/०४/१९९७:-
निसर्ग सुंदर किलबरी
आज लख्ख ऊन पडले होते. काल थोडे निसर्गाचे रूसलेले रूप अनुभवले. आजचा कार्यक्रम हलका फुलका होता. नैनीताल शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘किलबरी’ला सकाळी भेट दिली. इथे वनविभागाचे रेस्ट हाऊस आहे. उंचावर असल्यामुळे थंड आल्हाददायक मंद हवा अनुभवास येते. सभोवताल देवदारांचे साम्राज्य पसरलेले आहेच. तेथून हिमालयाचे रमणीय दृश्य नजरेस पडते. पक्ष्यांच्या गोड गुंजारवामध्ये आणि हिरव्यागार वृक्षराजीमध्ये थंड हवेत गरमागरम चहा-पान झाले. किलबरी समुद्र सपाटीपासून २५२८ मीटरच्या उंचीवर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. तिथे सर्व केसरी सदस्यांनी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. खेळ, गाणी, गप्पा हयामध्ये वेळ कसा गेला काहीच कळले नाही. खऱ्या अर्थाने वनविहार साजरा केला. देवदार, पाईन, फर हयांच्या मेळाव्यात ‘केसरी ग्रुपचा’ एक छोटासा आनंदमेळावा! आबालवृद्धानी वय विसरून सहलीचा खराखुरा आनंद लुटला. उन्हं वर आल्यावर दुपारच्या जेवणासाठी हॉटेलवर परतलो.
गोलू देवता मंदिर –
संध्याकाळी लवकरच निघून घोडाखालला कुमाऊंच्या ग्राम देवतेच्या दर्शनास गेलो. गोल देवाचे म्हणून प्रसिध्द असलेले हे देवीमातेचे मंदीर आहे. कुमाऊं जनसामान्यांचे हे कुलदैवत आहे. चांगल्या- वाईट अश्या सर्व गोष्टींचा आरंभ करताना हया दैवताला साक्षी ठेवून त्याच्या संमतीने सर्व काही होते. देऊळाच्या प्रांगणात असंख्य घंटा बांधलेल्या आढळतात. अधिक माहिती घेता कळले की, देवापुढे नवस केला जातो, मनाजोगते घडल्यावर ऐपतीप्रमाणे लहान-मोठी आकाराची घंटा देवाला चढवली जाते. ग्रामीण माणसापासून नोकरदार सुशिक्षित माणसापर्यंत भाविकांची येथे गर्दी दिसते. भारतीय संस्कृतीचा गाभा म्हणजे श्रध्दा! मग तो धर्म,जात,पंथ कोणताही असो!
नौकुचिया ताल
देवळातून दर्शन घेऊन नौकुचिया ताल सरोवर पाहावयास गेलो. नऊ कोन असलेले, नऊ मीटर खोल “नौकुचिया ताल” नैनीतालचे प्रसिध्द सरोवर आहे. या सरोवरामध्ये कमळाची सुंदर फुले फुलतात. चौफेर वेढलेल्या पहाडांच्या कुशीत, सरोवराकाठी असलेल्या वृक्षांमुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. शेजारीच कुमाऊं पर्यटन विकास महामंडळाचे विश्रांतीगृह आहे. नौकुचियातालकडून भीमतालला गेलो.
भीमताल
नैनीताल जिल्ह्यातील हे सर्वात मोठे सरोवर आहे. हयामध्ये विविध प्रकारचे मासे मिळतात. हयाचे वैशिष्ट्य म्हणजे सरोवराच्या मध्यभागी छोटे बेट वजा जमिनीचा पृष्ठभाग आहे. भीम तालाचीही आख्यायिका सांगितली जाते. वनवासात असताना भीमाने हिंडीबेबरेाबर विवाह केल्यानंतर जल-पानासाठी उभयता भटकंती करत असता हया ठिकाणी भीमाने गदेच्या प्रहाराने पाणी निर्माण केले म्हणून भीमताल! बेटावर सध्या रेस्टॉरंट आहे. त्यामुळे त्याच्या सौंदर्याला थोडे गालबोटच लागले आहे.
हनुमान गढी
भीमतालहून लवकरच निघून सूर्यास्त पहाण्यासाठी हनुमान गढीला रवाना झालो. हे एक धार्मिक स्थान आहे. इथ नीमकरोती बाबांनी हनुमानाची १२ फूट उंचीची मूर्ती स्थापन केलेली आहे. सोबतच राम,सीता,लक्ष्मण व शंकराचे मंदिर आहे. भगवंताच्या दर्शनानंतर इथून दिसणाऱ्या मनोरम सूर्यास्ताचे दर्शन घेतले. दोन पर्वतांच्या मुळे तयार झालेल्या इंग्रजी ‘व्ही’ अक्षरासारख्या कपारीमध्ये ‘तो सोन्याचा गोळा’ मावळताना पाहून मनमोहीत झाले. सूर्यास्त पाहून परत हॉटेलवर रवाना झालो. संध्याकाळी लवकरच परतल्यामुळे हॉटेलवर सगळ्यांनी संगीत खुर्ची, नाचगाणी हयांचा जल्लेाष चालविला होता. आमच्या ग्रुपमधील प्रत्येक व्यक्ती आनंदाने वयाचे भान विसरून पार स्नेहानंदामध्ये बुडून गेले होते. जेवणानंतर प्रत्येक जण आपापल्या खोल्यांमध्ये पांगले.
शुक्रवार- दि. १८/०४/१९९७:-
सहल अरविंदाश्रम आणि मुक्तेश्वरची –
दोन दिवसांच्या लांब पल्ल्यांच्या भटकंतीनंतरचा आजचा विश्रांतीचा दिवस होता. पूर्णतः आराम आणि खरेदी हयासाठी सर्व जणांना मोकळा वेळ होता. ऐच्छिक कार्यक्रमानुसार काही जणांनी विश्रांती तर काही जणांनी प्रसिध्द ‘ जिम कार्बेट पार्क’ ला जाण्यासाठी तयारी केली. आम्ही चौकशी केल्यानंतर बहुतांशी लोकांचे मत असे पडले की, कॉर्बेट पार्क ज्या स्वैर विहार करणाऱ्या प्राण्यांसाठी विशेषतः वाघांसाठी प्रसिध्द आहे, ते प्राणीच बरेच वेळा दिसत नाहीत. अनेक प्रकारची पूर्वी संरक्षित अभयारण्ये दक्षिणेकडे पहिल्यावर त्यात तेवढे स्वारस्य नव्हते. फक्त त्या राष्ट्रीय महत्व असलेल्या अभयारण्याला शूर जिम कॉर्बेटच्या थरारक शौर्याची पार्श्वभूमी असल्यामुळे कुतुहल होते. परंतु नैनीताल पासून सुमारे ६६ किलोमीटर दूर असलेल्या हया ठिकाणास जाऊन काहीच दृष्टीस न पडल्यामुळे उदास होऊन येण्यापेक्षा आम्ही नैनीतालमधील अरविंदाश्रम आणि शहरापासून सुमारे ५१ किलोमीटर दूर असलेल्या मुक्तेश्वरची निवड केली.
अरविंदाश्रम –
सकाळीच नाश्ता आटोपून आम्ही अरविंदाश्रमाला गेलो. श्री अरविंदो हे एक थोर योगी, तत्ववेत्ते, सामाजीक, राजकीय स्तरावरील कार्यकर्ते होते. त्यांनी विविध ठिकाणी निर्माण केलेल्या आत्मिक साधनेसाठीच्या संस्था आजही कार्यरत आहेत. त्यापैकीच ही एक! आश्रमाची रचना फार छान आहे. निसर्गाच्या सानिध्यात स्वत:ला ओळखणे! निसर्गाची तादात्म्य पावणे हे त्यांच्या साधनेमधील मुख्य अंग आहे.
आश्रमाचा परिसर झाडा-पानांनी झाकलेला आहे. आश्रमात प्रवेश केल्यावर वरच्या बाजूस प्रार्थना हॉल, समोरच मेडिटेशन हॉल आहे. आश्रमामध्ये विविध उपक्रम राबवविले जातात. सुट्टीमधील काही विशेष कार्यक्रमांतर्गत भारतीय युवक युवतींसाठी ठराविक कालावधींचे नियोजित आखीव कार्यक्रम असतात. त्याचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय एकात्मता विकास हा असतो. तसेच प्राण साधना आदींवर भर दिला जातो. तिथून आम्ही काही वेळ प्रार्थना हॉल मध्ये व्यतीत करून तेथील अभ्यास वर्गाच्या सहभागी कार्यकर्त्यांसमवेत प्रार्थनेत भाग घेऊन काही वेळाने परतलो. दुपारच्या जेवणानंतर मुक्तेश्वरला जायचे होते. जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही मुक्तेश्वरला निघालो.
मुक्तेश्वर
मुक्तेश्वर चारही बाजूंनी हिरव्यागार बागांनी वेढले होते. मुक्तेश्वरला जाताना हल्द्वानी – अल्मोडा मार्गावर भवाली गाव लागते. आमच्या गाडीचा ड्रायव्हर तेथे स्थायिक असल्यामुळे गाईडचे काम तो चांगल्या प्रकारे करत होता. भवाली आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. रस्त्यावर अनेक फळबागा नजरेस पडतात. विशेषतः सफरचंदांच्या लागवड केलेल्या पुष्कळ बागा टप्प्या-टप्प्यांच्या अंतरावर दिसत होत्या. नुकताच सफेद स्वच्छ फुलांचा मोहोर झाडांनी पकडला होता. काही ठिकाणी इवली सफरचंदाची फळे येण्यास सुरूवातही झाली होती. त्या बागांच्या मोहोराचा सुगंध मात्र मनाला वेडे करीत होता. मुक्तेश्वरला हिमशिखर दर्शन असा खास सहलीचा पॉइंट आहे. तिथून हिमालयाचे सौंदर्य न्याहाळता येते. आम्हाला ढग आल्यामुळे फक्त पंचशूली हया शिखराचे दर्शन झाले. चहा-पानानंतर आम्ही परत हॉटेलवर निघालो. बाजारात फेरफटका करून गप्पा-गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेऊन दिवसाची सांगता झाली.
शनिवार दि. १९/०४/१९९७:-
निरोपाचा दिवस
आठ दिवसाच्या नियोजित सहलीचा आजचा शेवटचा दिवस होता. नैनीताल शहराच्या आसपासच्या निसर्ग सुंदर स्थळांना घोड्यावर रपेट करीत भेट देण्याचा असाच काहीसा बेत होता. सहलीचा शेवटचा दिवस हया अनुभूतिमुळे थोडी नाराजी वाटतच होती. सकाळीच लवकर उठून सुमारे १४ किलोमीटर चढण घेाडस्वारीने जाऊन एक आगळा वेगळा रोमांचकारी अनुभव घेतला. प्रथम ‘टिफिन टॉप’ हया पॉइंटवर पोहोचलो. सर्वात उंच गेल्यावर थोडा पठारासमान भाग आहे. अर्थातच वनभोजनासाठी सुयोग्य असा सहलीतील टिफिन टॉप! तिथून पुढे गेल्यावर नैनीताल मधील नैनापीक नंतरच्या उंचीवर असणाऱ्या ‘चायना पीक’ला भेट दिली. तेथून होणारे नैनीताल शहराचे दर्शन अतिशय मनोरम होते. चौफेर पर्वतरांगांनी आणि समृद्ध अश्या हिरव्यागार वनराजींनी वेढलेल्या नैनीलेकच्या काठाकाठाने डोंगरांच्या कुशीत उतारा-उतारावर वसलेले शहर! खरंच अभिजात नैसर्गिक सौंदर्याची जोड लाभलेले, ऐतिहासिक,पौराणिक तसेच सांस्कृतिक वारसाचे ठसे जपणारे शहर मनाच्या कोपर्यात घर करून राहीले. मन, शरीर उल्हासित आणि प्रसन्न करणारे, चित्तवृत्ति जागृत करणारे हवामान! क्षणमात्र स्थानिक राहिवाश्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहीला नाही.
दुपार नंतर स्नेह संमेलनाचा सोहळा होता. सहलीतील अनेक बाळगोपाळांनी मनोरंजनाचे कार्यक्रम केले. सहभागी पर्यटकांनी आपापले अनेक सहलींचे अनुभव कथन केले. काहींनी हया सहलीचा वेगळेपणा, ह्या कुमाऊंच्या राणीच्या सौंदर्याने भारावून तिच्या गौरवास्पद प्रशंसेचे शब्दांकन केले. अश्या रीतीने सहलीचा स्नेहमयी, आनंदमयी वातावरणात समारोप झाला.
संध्याकाळी परत एकदा ते ‘अनमोल सौंदर्य’ डोळ्यांत साठवण्यासाठी आणि खरेदीसाठी बाजारात फेरफटका मारला. शहरामध्ये बाजारात विविध ठिकाणी लोकरी कपडे, लाकडी कलाकृतींचे नमुने, तसेच विविध लाकडी सजावटीच्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू विक्रीस उपलब्ध होत्या. येथील विशेष म्हणजे विविध रंगांच्या,आकारांच्या निरनिराळ्या साच्यांमधल्या मेणबत्त्या! सजावट आणि उपयोग असा दुहेरी लाभ साधणार्या मेणबत्त्या फारच आकर्षक व स्वस्त! थोडीफार खरेदी करून हॉटेलवर परतलो. मनात पिंगा घालीत होते ते उंच उंच पर्वत! हिरवी गार, मलमल पांघरलेली चिमुकली निसर्ग समृद्ध गावे!
रविवार – दि. २०/०४/१९९७
सांगता प्रवासाची –
पहाटे चार वाजता नैनीतालहून प्रयाण केले अन् परतीचा प्रवास सुरू झाला. सकाळी पहाटेच्या वातावरणात शरीर, मन, वृत्ती हे सर्व उल्हसित आणि सहलीच्या आनंदाने परिपूर्ण झाले होते. मन अजूनही त्या त्रिऋषिंच्या सरोवरा काठी मुक्त छंदात विहार करत होते. त्या गिरी-शिखरांच्या उंच उंच पहाड कड्यांच्या वेधात भिरभिरीत होते. पण नित्यकर्म विसरून चालणार नव्हतेच! माघारी परतायला हे हवेच! अर्थातच गोड अविस्मरणीय स्मृती जपून! त्या रम्य प्रदेशातील, विविध रंगांनी नटलेल्या निसर्गाच्या आठवणींची गोडगुलाबी प्रावरणे मनाला घालून! मनाच्या सांदीकोपऱ्यात त्या आठवणी जपून परत यायचे होते.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आम्ही गजरौला (मुरादाबाद) येथे पोहोचलो. केसरीच्या नियोजित हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. आम्हा सर्वांना लंच पॅकेटस् दिली गेली. कारण थेट दिल्ली आणि तिथून पुढे मुंबईपर्यंत असा प्रवास होता. मुंबईकडे जाणारी आमची ‘ऑगस्ट क्रांति’ रेल्वे सायंकाळी पाच वाजता रवाना होणार होती. त्यामुळे दुपारच्या जेवणाची अवस्था ‘यथातथा’ होऊ नये हयासाठी केसरीच्या आयोजकानी केलेला तो प्रपंच!
दुपारी दोन वाजता दिल्लीत पोचलो. वातावरणात उष्मा फारच जाणवू लागला. हवेतील अचानक झालेल्या बदलामुळे उकाडा त्रासदायक वाटत होता. संध्याकाळी ऑगस्ट क्रांतीने निघून प्रवासाची अन् सहलीची सांगता झाली. दुसर्या दिवशी सोमवारी सकाळी घरी पोहोचलो पण अद्यापही बंद पापण्यांसमोर ती उंच हिमशिखरे, उंच चिनार, देवदार अन् पाईन वृक्ष तसेच प्रसन्न, आल्हाददायक सरोवरे मनाचा ठाव सोडीत नव्हती!
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.
यावर आपले मत नोंदवा