सिक्कीम डायरिज् : अंतिम भाग

डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर सिक्किमच्या सफरीनंतर आम्ही रात्रीच्या मुक्कामासाठी  गंगटोकला थांबलो होतो. तिथून परतीचा प्रवास सुरू होणार होता. परतीच्या प्रवासात रावंगला आणि नामची ह्या स्थळांना भेट देऊन सिलिगुडी येथे मुक्कामाला जायचे ठरविले. गंगटोक भटकंतीसाठी आम्हाला रमेश ड्रायवरची खूप मदत झाली होती. आम्ही पुन्हा रमेशला संपर्क केला आणि त्याला अगदी आम्हाला सिलिगुडीपर्यंत सोडायचे आणि रस्त्यामध्ये इतर काही स्थल दर्शन असेल तर तेही आम्हाला दाखवायचे ह्या बोलीवर त्याची गाडी निश्चित केली. संपूर्ण परतीच्या प्रवासासाठी वाहनाची सोय झाल्याने आम्ही निश्चिंत झालो.

सकाळी गंगटोकचा लवकरच निरोप घेतला. आम्ही गंगटोकहून निघून प्रथम “गांजू लामा द्वार” ह्या वॉर म्यूझियमला धावती भेट दिली आणि रमेशच्या सूचनेनुसार आम्ही नामचीला मुक्कामासाठी जायचे ठरविले. नामचीहून सिलिगुडी गाठणे सहज सुलभ होईल असा त्याचा प्रस्ताव होता. आम्ही नामची पहाता येईल, तिथे राहता येईल ह्या विचारानेच खुष झालो. गंगटोक पासून नामची साधारण ८० किलोमीटरच्या अंतरावर आहे. नामचीपासून सुमारे १०० किलोमीटर सिलिगुडी! त्यामुळे परतीच्या प्रवासातील दोन दिवसांचे नियोजन लागलीच करून टाकले! एक रात्र नामची आणि तिथून बागडोगरा विमानतळ गाठण्यासाठी सिलिगुडीला मुक्काम! आम्ही तातडीने रमेशच्या सूचनेला होकार दिला आणि नामचीच्या दिशेने निघालो.

“नामची” – स्थानिक भाषेत ज्याचा अर्थच आहे आकाशा एवढा उंच; नाम-sky ची- High – “The Top of the Sky”! समुद्र सपाटीपासून सुमारे ५५०० फुट उंचीवर वसलेले दक्षिण सिक्किम मधील एक मुख्य शहर. जणू दक्षिण सिक्किमचे हृदय! मेली आणि जोरथांगच्या ही दोन शहरांच्या दरम्यान मुख्य रस्त्यापासून थोडे दूर चौफेर गर्द हिरव्या पर्वतराजीने वेढलेले, गंगटोकच्या तुलनेत पर्यटकांची कमी संख्या असणारे नामची, तेथून दृश्यमान होणार्‍या भव्य आणि भारावून टाकणार्‍या विलक्षण सुंदर हिमाच्छादित कांचनजंगा पर्वतरांगांच्या नजार्‍यांसाठी ओळखले जाते.

बागडोगरा विमानतळ, न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन, सिलिगुडी ह्या ठिकाणांहून नामचीला  साधारण चार तासांच्या प्रवासाने सहजच पोचता येत असल्याने नामची अगदी कमी कालावधीमध्ये पर्यटनाच्या पटलावर एक धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्ग सुंदर पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आलेले आहे. होम स्टे, बजेट हॉटेल्स, आरामदायी रिसॉर्ट ह्यांची बऱ्यापैकी रेलचेल नामचीमध्ये आहे. नामचीमध्ये नेपाळी, भूतीया, आणि शेर्पा ह्या स्थानिक समुदायांमुळे सांस्कृतिक समृद्धी आणि आदरातिथ्यात असणारा उबदारपणा खास जाणवतो. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही सोलोफोक स्थित “डुंगमाळी रिसॉर्ट” मध्ये घेतला.  उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीमध्ये दक्षिण सिक्कीमची सफर एक वेगळा अनुभव देणारी ठरते. आम्ही डिसेंबर २०१८ मध्ये अनुभवलेले नामची आणि मे २०२५ मध्ये अनुभवलेले नामची अगदी वेगळा अनुभव देणारे!

गंगटोक पासून नामची अंदाजे २-३ तासांच्या अंतरावर होते. रमेशच्या सूचनेनुसार आम्ही नामची दर्शनाचा बेत आखला. प्रथम सिद्धेश्वर धाम आणि नंतर समद्रूप्तसे टेकडीवर पद्मसंभवांचा भव्य पुतळा असलेले स्मारक पहाण्याचे ठरले.

सिद्धेश्वर धाम/चारधाम

आम्ही थेट नामचीला चारधाम परिसरात पोहोचलो. सोलोफोक टेकडीवर ढगाळ वातावरण आणि धुक्याचे आधिपत्य होते, त्यामुळे थंडी वाजू लागली. चारधाम म्हणजे सिक्कीमला पर्यटनासाठी सज्ज करण्यासाठी सिक्कीम सरकारने  सन २०११ मध्ये  एक भव्य सांस्कृतिक संकुलाचे लोकार्पण केलेले एक उल्लेखनीय पर्यटन स्थळ! ह्या परिसरास सिद्धेश्वर धाम म्हणून देखील ओळखले जाते. सोलोफोक टेकडीवर वसलेले सिद्धेश्वर धाम हे नामची शहरापासून पासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. ह्या संकुलामध्ये हिंदूची चार पवित्र तीर्थक्षेत्रे – बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ व रामेश्वरम हया चार धामांच्या आणि बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत. तसेच नंदीसह १०८ फूट उंच असलेली एक भव्य शिव मूर्ती आहे. महाभारताच्या युद्धात अर्जुनाला दिव्य शस्त्रांचा आशीर्वाद देणार्‍या किरातेश्वरची पूजनीय मूर्ती शिव मूर्तीच्या विरुद्ध बाजूस विराजमान आहे.

ह्या संकुलातील शांत परिसर, त्याचे धार्मिक महत्त्व आणि भव्य प्रतिकृती हयांमुळे हे ठिकाण पर्यटक आणि भाविक दोघांसाठीही अत्यंत खास आहे. येथील परिसर एकंदरीत मन प्रसन्न करणारा आहे. ह्या संकुलामध्येच अभ्यागतांसाठी शुद्ध आणि स्वादिष्ट शाकाहारी पदार्थ असणार्‍या उपहारगृहाची सुद्धा सुविधा आहे.  

चारधाम पासून जवळच अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असंगथांग भागात साई बाबांचे शिर्डी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये साकारलेले शुभ्र आणि सोनेरी रंगांच्या रंगसंगतीमध्ये साकारलेले भव्य मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर चक्क “साई शिर्डी मंदिर” असा फलक लावलेला दिसला. आमच्या दिवसाची सुरुवात अगदी आध्यात्मिक वातावरणात झाली म्हणायला हरकत नाही!  चारधाम परिसर फिरताना जेवणाचा वेळ उलटून गेला. ढगाळ वातावरणात पोटातल्या कावळ्यांनी भुकेचा आक्रोश सुरूच केला होता. आम्ही हलकाफुलका नाश्ता करून समद्रूपत्से टेकडीच्या दिशेने निघालो.

समद्रूपत्से

नामची शहराजवळ असलेली समद्रुप्त्से टेकडी ही येथील सर्वात लोकप्रिय स्थळांपैकी एक आहे. ह्या टेकडीवर विराजमान असलेली, २६ फुट उंच गुरु पद्मसंभवांची (गुरु रिनपोंचे) भव्य सुवर्णमय मूर्ती हे नामचीच्या पर्यटनामधील आणखी एक मोठे आकर्षण आहे. स्थानिक समजुतीनुसार ही टेकडी एका सुप्त ज्वालामुखीशी संबंधित मानली जाते आणि तिच्या शांतिसाठी इथे बुद्धिस्ट लामा सतत प्रार्थना करीत असतात असे मानले जाते. इथे सतत आपल्या कानामध्ये ‘ओम मणि पद्मे हम्”चा मंजुळ जप घुमत राहतो. समद्रुप्त्से ही “इच्छापूर्ती करणारी टेकडी” म्हणूनही प्रसिद्ध आहे. तेथून नामची शहर, सभोवतालची हिरवाई आणि दूरवर दिसणाऱ्या कांचनजंगा पर्वतरांगा यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. आम्ही समद्रुप्त्से टेकडीजवळ पोहोचलो  तेव्हा पूर्ण धुक्यात टेकडी लुप्त झालेली होती. त्यामुळे पद्मसंभवांचा पुतळा दिसतही नव्हता. परंतु आम्ही चढून प्रांगणात जाईपर्यंत धुक्याने आपला आंचल बाजूला सारला आणि आम्हाला त्या भव्य मूर्तीचे दर्शन झाले. पद्मसंभवांचा पुतळा जणू एका रक्षकासारखा अवघ्या नामचीवर आपली कृपादृष्टी ठेवून आहे! आम्ही परिसर पाहून त्या टेकडीवरून उतरून वाहनतळामधील आमच्या गाडीजवळ येईपर्यंत आम्हाला भुरभुरणाऱ्या हिमवर्षावाने गाठले. आम्ही गाडीत धाव मारली आणि भुरभुरणाऱ्या हिमाने जोरदार बर्फवृष्टीचे स्वरूप घेतले.

आम्ही आमचा मोर्चा हॉटेल मुक्कामी वळवला. हिवाळ्याचा मौसम आणि भुरभुरणारा बर्फ ह्यामुळे पोटात भूक उसळून आली. संध्याकाळी अंधार लवकर दाटून आला. आम्ही मुक्कामच्या हॉटेल कडे जाताना नामचीच्या सेंट्रल पार्क मध्ये थांबलो. चहा आणि गरमागरम कांदाभजी आणि मोमो! वाह! एकदम झकास संध्याकाळ होती! सेंट्रल पार्क मध्ये विंडो शॉपिंग सुद्धा केले. नामचीचा सेंट्रल पार्क मला अगदी एखाद्या पाश्चिमात्य शहरातील सिटी सेंटर सारखा वाटला. अनेक रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या टांगून परिसर सुशोभित केलेला होता. लोकाना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केलेली होती.

आम्ही प्रवासात असतानाच सोलोफोकमधील डुंगमाळी रिसॉर्टमध्ये आमची मुक्कामाची सोय केलेली होती. अंधारून आल्याने रिसॉर्टच्या आसपास नेमके काय आहे, व्ह्यू कसे आहेत हा काही अंदाज आला  नाही.   रात्री सिक्किमी थाळीचा आस्वाद घेऊन आमच्या खोलीमध्ये सुखावलो. आमच्या खोलीला एक छोटी बाल्कनी होती. तिथून रिसॉर्टच्या आवारातील सजावट आणि बगीचा दिसत होता. पण अंधारामुळे काहीच लक्षात येत नव्हते. आम्ही दिवसभराच्या भटकंतीने लवकर झोपलो.

दूसरा दिवस परतीचा प्रवास! लवकरच जाग आली. आदल्या दिवशीचे बाल्कनीचे कुतूहल पुन्हा मनात जागे झाले. आम्ही उठून बाल्कनी मध्ये गेलो आणि आमचे डोळे विलक्षण दृश्याने विस्फारले! डुंगमाळी रिसॉर्टच्या बाल्कनी मधून अवघ्या नामचीचे, समद्रुप्त्से, कांचनजंगा पर्वतरांगा आणि रंगीत व्हॅलीचे अतिशय नयनरम्य दृश्य दिसत होते. सूर्योदयाची वेळ होत होती. आम्ही आमचे चहाचे कप आणि कॅमेरा घेऊन थेट रिसॉर्टच्या इमारतीच्या गच्चीत पळालो. थंडीमुळे अगदी डोळ्यातून, नाकातून पाणी आणि तोंडातून धूर निघत होता. पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती.

समोर कांचनजंगा पर्वत शिखरांवर उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या आविष्कारांनी आमचे भान हरपून गेले! आदल्या दिवशी झालेल्या ताज्या हिमवृष्टीमुळे हिमशिखरे सूर्य किरणांमध्ये सोनेरी तांबूस रंगाने न्हाहून निघालेली होती. आम्ही मनसोक्त सूर्योदयाचा  आनंद घेत थंड झालेल्या चहाचे घुटके घेत राहिलो! आमच्या रिसोर्टच्या गच्चीतून खालच्या दिशेला गुलाबांच्या रोपांची मोठी बाग निर्माण करण्यात आलेली दिसत होती. खूप मोठ्या परिसरात गुलाबांच्या अनेकविध जातींची लागवड केलेली दिसून येत होती. सूर्योदयाच्या वेळेचा तो नजारा, आजूबाजूचा परिसर, अगदी नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या कांचनजंगा पर्वतरांगा सगळं काही मनाला मोहून टाकणारं! उंच उंच टेकड्यांवर वसलेले एक शांत शहर- नामची! डुंगमाळी रिसॉर्ट आमच्या मनाला अगदी भावले! आता नाश्त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघायचे होते.

 इंडियन हिमालयीन सेंटर फॉर अॅडव्हेंचर आणि ईकोटुरिजम 

नामची सोडून परतीच्या प्रवासात रवंगला करून सिलिगुडी गाठावे असा विचार मनात आला, आणि रमेशने गाडी थेट रावंगलाच्या दिशेने हाकली. परंतु बर्फ वृष्टिमुळे वाहनांची यातायात बंद झाल्याचे कळले. आम्ही अर्ध्या अंतरावर पोहोचलो तिथेही रस्ताभर बर्फाची शुभ्र चादर पसरलेली होती. त्यामुळे अर्ध्या रस्त्यांमधूनच माघारी परतणे पसंत केले. मात्र परतीच्या वाटेवर नामची पासून अंदाजे १६ किलोमीटर अंतरावर चेमची, दामथांग येथील इंडियन हिमालयीन सेंटर फॉर अॅडव्हेंचर अँड ईको -टुरिजम ह्या संस्थेला भेट दिली. तेथील अधिकारी हयानी आमचे चांगले आदरातिथ्य केले. संस्थेची माहिती दिली. तिथे होणाऱ्या सर्व प्रशिक्षणाबद्दल सांगितले.

जगातील सर्वात उंच असणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या प्राचीन कांचनजंगा पर्वतरांगाच्या अगदी कुशीत नामची जिल्ह्यातील चेमची गावातील एका टेकडीवर समुद्र सपाटीपासून ६५८२ फूट उंचीवर इंडियन हिमालयन सेंटर फॉर ॲडव्हेंचर अँड इकोटुरिझम (IHCAE) ही संस्था २१.२ एकर क्षेत्रात वसलेली आहे. सन २००९ मध्ये या संस्थेचे औपचारिक उद्घाटन भारत सरकारच्या माननीय केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीमती कुमारी सेलजा यांच्या हस्ते झालेले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून चार वर्षांच्या आत, ‘ऑन द टॉप ऑफ वर्ल्ड’ माउंट एव्हरेस्टवर एकदा, दोनदा नव्हे तर तीनदा संस्थेचा ध्वज अभिमानाने फडकवण्याचा उल्लेखनीय पराक्रम करणारी (IHCAE) ही भारतातील अशा प्रकारची पहिली संस्था आहे. निसर्गप्रेमी आणि साहसी खेळ प्रकारांमध्ये रुचि असणाऱ्यांसाठी ही संस्था एक आश्रयस्थान आहे. रोडोडेंड्रॉन आणि इतर विविध अल्पाइन वनस्पतीच्या गर्द हिरवाईने झाकलेल्या सुंदर जंगलातून वाट असणारा जगप्रसिद्ध सर्वोत्तम ट्रेकिंग ट्रेलपैकी एक (सिंगिलिला) ह्याच्या सान्निध्यात ह्या संस्थेचे असणे हाच एक आनंददायी अनुभव आहे. आम्ही डिसेंबर २०१७ मध्ये सिंगलीला नॅशनल पार्क मधून जाणारा “संदकफू ट्रेक”च्या आठवणी ताज्या झाल्या!

कॅम्पस चांगल्या पायाभूत सुविधांसह निवासी प्रशिक्षणाची सोय आहे. प्रशिक्षणार्थींना रॉक क्लाइंबिंग, गिर्यारोहण, व्हाईटवॉटर राफ्टिंग, स्कीइंग, माउंटन बाइकिंग आणि पॅराग्लायडिंग अशा विविध क्रीडा उपक्रमांची संधी मिळते. प्रशिक्षणार्थींसाठी शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक सतर्कता विकसित करण्यासाठी डिझाइन केलेला १४ अडथळ्यांच्या टप्प्यांचा कोर्स हा सर्वात आव्हानात्मक कार्यक्रम आहे. जगातील साहसी क्रीडा प्रकार आपल्याला एक निखळ आत्मिक आनंद, कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि undying spirit of mankind चा अनुभव देतात.

आम्ही त्या परिसरात बराच वेळ व्यतीत केला आणि पुन्हा नामची सेंट्रल पार्कला आलो. तिथे आमची पाऊलं रेंगाळली! नामचीच्या organic vegetable market ला भेट दिली आणि दुपारी आम्ही सिलिगुडीकडे प्रस्थान केले. दिवस मावळून गेल्यावर आम्ही सिलिगुडी येथे पोहोचलो. सिलिगुडी येथील लोकल मार्केटचा फेरफटका करून विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच्या विमानाने मुंबई गाठली!

मला बागडोगरा विमानप्रवास अगदी जिव्हाळयाचा वाटतो कारण येता जाता आकाशात सर्व ८००० मीटर्स उंचीच्या पर्वत रांगा आपल्याला विमानाच्या खिडकीतून खुणावत राहतात! आणि ‘स्लिपींग बुद्धा’  म्हणजेच कांचनजंगा हिमशिखरे विमानाच्या पंखाआडून, वरून अशी आपल्याकडे पहात असतात एकटक! परतीच्या प्रवासात मात्र जसे विमान पुढे वेग घेते तसतसे हे चित्र धूसर होत जाऊन पुन्हा कधी ह्या दिग्गजांची नजरभेट होईल अशी हुरहूर मनाला लागते.

आज हा ब्लॉग लिहिताना, डिसेंबर २०१८ आणि मे २०२५ च्या सिक्कीम भेटीच्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन गेल्या. मे २०२५ मध्ये टेमी टी गार्डनला भेट दिल्यानंतर नामचीची भेट टाळू शकलो नाही. आमच्या वाहनचालकाने तुम्हाला एक मोठे “रोज गार्डन” दाखवतो असे सांगून ज्या ठिकाणी नेले तिथे गेल्यानंतर आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. डिसेंबर २०१८ च्या सहली मध्ये डुंगमाळी रिसॉर्टच्या खालच्या दिशेला बाल्यवस्थेत असलेले, नुकताच लागवड केलेली गुलाबाच्या रोपांच्या वाटीकेचे रूपांतर एक मोठ्या विशाल बागेत झाले होते.

सिक्कीम म्हणजे निसर्गसंपन्न हिमालयाच्या कुशीत वसलेली, आपला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी शहरे! सिक्कीम म्हणजे शांत दऱ्या-खोऱ्यांमध्ये “ओम मणि पदमे हम्” चा नाद करीत फडफडणारे  रंगीत प्रार्थना ध्वज आणि सुंदर आणि पवित्र बुद्ध विहार! सिक्कीम म्हणजे चहाच्या मळ्याचा सुगंध, ढगांच्या कुशीत हरवलेल्या हिरव्यागार टेकड्या आणि त्यांच्या मागे स्थितप्रज्ञासारख्या अविरत उभ्या हिमालयाच्या पर्वतरांगा!  

सिक्किमला दोन वेळा भेट दिली तरीही सिल्क रूट आणि झुलूक बकेट लिस्ट मध्ये-बाकीच! पुन्हा सिक्कीमचा योग येईल तेव्हा येईल!


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑