सिक्किम डायरीज् : भाग ५ –

आम्ही गंगटोकच्या तीन दिवसीय वास्तव्यात ‘नथू ला’ आणि ‘चांगु’ लेक साठी लागणार्‍या  परवानगीसाठी बरीच खटपट केली. परंतु बर्फ वृष्टीमुळे ‘रस्ता बंद’ ह्या कारणास्तव परमीट जारी करणे थांबविले होते. ‘नथू ला’ भेट शक्य होत नाही असा अंदाज आल्यावर आम्ही नॉर्थ सिक्किमची भटकंती करण्याचा निर्णय घेतला. गंगटोकमधील एका स्थानिक ट्रॅवल ऑपरेटरकडे जाऊन आमच्या नॉर्थ सिक्किम सहलीचे पैसे आम्ही एक दिवस आधीच भरून निश्चिंत झालो. नॉर्थ सिक्किम सहलीसाठी आवश्यक असणार्‍या inner line permit साठी आम्ही ट्रॅवल ऑपरेटरच्या कार्यालयात ओळखपत्र आणि फोटो देखील सुपूर्द केले. २५ डिसेंबर २०१८, नाताळाच्या दिवशी सकाळी लवकर नॉर्थ सिक्किमच्या दिशेने कूच करायचे होते!

आम्ही नाताळाच्या दिवशी सकाळी नाश्ता करून क्लब महिंद्र गंगटोकचा निरोप घेतला आणि रमेशच्या टॅक्सीने सकाळी गंगटोकच्या वज्र स्टँड भागात असणार्‍या वाहनतळावर  ट्रॅवल ऑपरेटरने नेमून दिलेल्या वेळापूर्वीच पोहोचलो. आम्हाला एका जीपमध्ये  नेऊन बसविण्यात आले. परंतु अजून सात-आठ जणांचा एक छोटा ग्रुप आमच्या जीप मध्ये येणार होता.  ग्रुपचे सर्व सदस्य जमा होईपर्यंत आणि नॉर्थ सिक्किम परमीटची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बराच उशीर झाला. आमची जीप गंगटोक शहराच्या बाहेर आता उत्तर सिक्किमच्या दिशेने निघाली.

आम्ही गंगटोकहून टिंगडा-काबी–फोडोंग – मंगन – चुंगथांग मार्गे लाचेन येथे जाणार होतो. चुंगथांग येथून एक रस्ता लाचेन कडे जातो तर दूसरा लाचुंग! ह्या गाडीचे ड्रायव्हर हेच आपले गाईड सुद्धा असतात. गंगटोक पासून लाचेन पर्यंतचा प्रवास अंदाजे १२२ किलोमीटरचा असला तरी संपूर्ण पर्वतीय प्रदेश आणि अरुंद वळणदार रस्ते ह्यामुळे हे अंतर कापण्यासाठी ७/८ तासांचा प्रवास नक्कीच होतो! आमच्या गाडी चालकाने लाचेन पर्यंतच्या प्रवासात आम्हाला सेवन सिस्टर्स वॉटरफॉल, सिंघिक येथील व्यू पॉइंट, नागा वॉटरफॉल अशी ठिकाणे दाखवत लाचेन मुक्कामी नेले.  

लाचेन

सिक्किम राज्याचे पर्यटनाच्या दृष्टीने ईस्ट सिक्किम, वेस्ट सिक्किम, नॉर्थ सिक्किम आणि साऊथ सिक्किम असे सर्वसाधारण विभाजन केले जाते. नॉर्थ सिक्किमच्या सहलीमध्ये सिक्किमच्या उत्तर जिल्ह्यामध्ये म्हणजे ‘ला चेन’- ‘ला चुंग’ ह्या गावांचा समावेश असतो. खरे तर ह्या किरकोळ लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये मुक्काम करून गुरुडोंगमार आणि युमथांग व्हॅली ह्या ठिकाणांना भेट देता येते. येथे मुक्काम करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे acclimatization! समुद्र सपाटीपासूनची उंची आणि प्रतिकूल वातावरणाशी समरूप होण्यासाठी हे आवश्यकच आहे! आमच्यासाठी नॉर्थ सिक्किम भेट ही एका विशिष्ट ठिकाणासाठी महत्त्वाची होती, ते म्हणजे गुरुडोंगमार लेक!!

सिक्किममधील भौगोलिक व्यापकतेनुसार आकाराने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नॉर्थ सिक्किम, ज्याला आता ‘मंगन’ म्हणून ओळखले जाते. मंगन सिक्किम राज्याच्या उत्तर भागात स्थित असून पश्चिमेस नेपाळ देश तर उत्तरेस चीन-तिबेटचा प्रदेश आहे. जिल्ह्याचे मुख्यालय मंगन गावात आहे. अगदी काही हजारांमध्ये लोकसंख्या असलेला हा जिल्हा भारतामधील सर्वात कमी लोकवस्ती असलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे. वेलदोडे उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या मंगन जिल्ह्यात असलेले लाचेन गाव म्हणजे गुरुडोंगमार लेकचे प्रवेशद्वार!

आम्ही गंगटोकहून निघून दरम्यानची पर्यटन स्थळे, दुपारचे जेवण असे थांबे घेत लाचेन कडे निघालो होतो. हळूहळू हवेतील गारठा प्रचंड वाढू लागला. संध्याकाळचे पाच वाजले आणि आम्ही चहासाठी एका धाब्यावर थांबलो. संपूर्ण काळोख झालेला होता. चहाच्या टपरीवाल्याने तिथेच शेकोटी पेटवलेली होती. आम्ही सर्वच जीपमधून उतरून लगबगीने शेकोटी भोवती वेढा टाकून बसलो. आमच्या चालकाने चहा झाल्यावर घाई केली, अजून बरेच अंतर पार करायचे होते. आम्ही साधारण संध्याकाळी सातच्या सुमारास लाचेन मुक्कामी पोहोचलो.

रात्र झाल्याने आपण नेमके कुठे आलो आहोत हे कळत नव्हते, पण अतिशय शांत आणि काही शेकड्यात मोजता येतील इतक्याच कुटुंबाची वस्ती असलेले लाचेन त्या काळोख्या रात्री सुद्धा मनाला भावले! आम्ही थंडीने पूर्ण गारठून गेलो होतो. आम्ही आमच्या मुक्कामाच्या हॉटेलमधील खोली ताब्यात घेतली, चहा घेतला आणि खाली गावात सैरसपाटा करण्यासाठी उतरलो. आमच्या हॉटेल जवळच असलेल्या एका घरगुती दुकानामधून लोकरीचे हा‍तमोजे घेतले आणि गावामधील वस्तीच्या मधोमध असलेल्या रस्त्यावरून पायी चालत निघालो. गावामध्ये स्तब्ध शांतता होती. आमचा त्या थंडगार हवेमध्ये फार वेळ टिकाव लागला नाही, आम्ही लगोलग आमची खोली गाठली.

आमचे मुक्कामाचे ठिकाण हॉटेलवजा होम स्टे होता. आम्ही सर्व डायनिंग रूममध्ये जेवणासाठी जमलो खरे, पण घास तोंडाजवळ येईपर्यंत थंड होत होता. जेवण उरकले आणि खोलीत धूम ठोकली. खोलीची सर्व तावदाने बंद करून दोन-दोन दुलयांमध्ये गुडूप झालो. आम्हाला दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे अगदी ब्रम्ह मुहूर्तावर उठून गुरुडोंगमार लेककडे कूच करायचे होते.

लाचेन-उत्तर सिक्किममधील इंडो-तिबेटीयन सीमेजवळ असलेले समुद्र सपाटी पासून ९६०० फुट उंचीवर शहराच्या कोलाहलापासून दूर हिमालयाच्या उंचच उंच शिखरांनी वेढलेले एक शांत आणि निसर्गरम्य गाव! तिबेटीयन भाषेत ‘ला-चेन’ म्हणजे मोठी खिंड! तीस्ता नदीच्या उपनद्या असलेल्या ‘ला-चेन’ आणि ‘ला-चुंग’ ह्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे लाचेन! 

लाचेनची एक खास ओळख म्हणजे तेथील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा – “झुमसा” (Dzumsa) स्वशासन व्यवस्था! ह्या पारंपरिक गाव प्रशासनाच्या पद्धतीमध्ये प्रत्येक घराचे प्रातिनिधिक स्वरुपात योगदान असते. संपूर्ण गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागाने स्थानिक प्रशासन, वाद निराकरण, सामुदायिक समस्या, सामाजिक उपक्रम अश्या गोष्टीमध्ये सर्व संमतीने निर्णय प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे गावामध्ये सामाजिक सलोखा, जुने सांस्कृतिक रितीरिवाज जपले जातात असा येथील स्थानिकांचा दाट विश्वास आहे. लाचेन मधील ही पारंपरिक प्रथा स्थानिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा गाभा आहे.  प्रामुख्याने येथे भूतिया आणि तिबेटीयन वंशाचे लोक राहतात. शांत आणि पारंपरिक वातावरण असलेले लाचेन मनात घर करून राहतं!

पर्यटन हाच लाचेनच्या स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे! जगातील सर्वात उंच सरोवरांपैकी गुरुडोंगमार लेक, हंगामी निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध थांगू व्हॅली आणि चोपता व्हॅली ह्यांच्या भेटीसाठी लाचेन हे मुक्कामाचे ठिकाण आहे. शरद ऋतुमध्ये मेपल आणि लार्चच्या वृक्षांमुळे विविध रंगाने ही खोरी नटलेली पाहावयास मिळतात तर हिवाळ्यात बर्फाळ वाळवंटाप्रमाणे शुभ्र हिमाची दुलई पांघरून दूरदूर पर्यंत केवळ हिमाच्छादित पर्वत शिखरे अनुभवण्यास मिळतात! वसंत ऋतुमध्ये मात्र ही व्हॅली रंगीबेरंगी फुलांनी बहरून आपल्या स्वागतासाठी तयार असते.

भल्या पहाटे आम्ही दोघी मैत्रिणी मोबईलचा अलार्म वाजल्यावर उठलो खऱ्या, पण ब्रश करण्यासाठी देखील पाणी हातात घेता येत नव्हते इतकी थंडी होती! आम्ही गीझर चालू करायचा प्रयत्न केला, पण त्यामधील पाणी देखील गोठले होते! सरते शेवटी खोली बाहेर येऊन झोपलेल्या हॉटेलच्या कामगाराला उठवून आम्हाला शुचिर्भूत होण्यासाठी थोडे तरी पाणी गरम करून देण्याची विनंती केली. कसेबसे हुडहुडत तयार होऊन सामान बांधून तयार झालो. आम्ही पाच-साडेपाचच्या सुमारास आमच्या मुक्कामाच्या हॉटेलबाहेर आमचा ग्रुप तयार होण्याची वाट पहात उभे होतो. समुद्र सपाटी पासून ९००० फुटावरून १७,८०० फूटावरच्या गुरुडोंगमार सरोवराच्या विरळ हवेत जाण्यासाठी वातावरणाशी समरूप तर झालेच पाहिजे! टुमदार लाचेन गावातला रात्रीचा मुक्काम त्यासाठीच महत्त्वाचा!

गुरुडोंगमार

झुंजुमुंजु पहाट झालेली होती. पण हिवाळ्याच्या थंड हवेने अवघा आसमंत गारठून गेला होता. निसर्गाचे पहाट गीत जणू कंठातच थिजून गेले होते. दूर उंच पर्वत शिखरांवर शुभ्र हिमवर्षाव झालेला दिसून येत होता. आम्ही सर्व जीपमध्ये आमचे सामान टाकून गुरुडोंगमारच्या दिशेने निघालो. तिथून आम्ही परस्पर लाचुंग मुक्कामी जाणार होतो! लाचेन ते गुरुडोंगमार हे अंतर अंदाजे ६५ किलोमीटर इतकेच आहे. परंतु येथील प्रतिकूल हवामानामुळे खराब रस्ते आणि भौगोलिक परिस्थिती ह्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी ४-५ तास सहजच लागतात.       

लाचेन गावांमधून पुढे गुरुडोंगमारच्या दिशेने जाणारा रस्ता आपल्याला ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या थांगू गावात घेऊन जातो. साधारण सकाळी पावणेसातच्या सुमारास आम्ही थांगू येथे चहा-नाश्ता साठी थांबलो. थांगू व्हॅली हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. नॉर्थ सिक्किमचा हा भाग चीन सीमेच्या अत्यंत निकट असल्याने त्यासाठी पर्यटन कार्यालयाकडून विशेष परवानगी लागते. तेथून पुढे अधिक उंचीवर जाण्यासाठी थांगू व्हॅलीमधे थोडा वेळ व्यतीत करणे सर्वात उत्तम! आपण आपसूक त्या विरळ हवामानाशी समरूप होऊ शकतो.

अगदी रस्त्यालगत असलेल्या घरवजा दुकानामध्ये आम्हाला नेण्यात आले. आमच्या ड्रायवरने आमच्या ग्रुपच्या नाश्त्याची ऑर्डर देऊन तो आमच्या पुढील प्रवासाच्या परवानगीचा शिक्का मिळवण्यासाठी तेथील चेक पोस्ट वर गेला. आम्ही त्या घरवजा दुकानाच्या मध्यभागी असलेल्या धुनीभोवती गोलाकार बसलो. चहा-नाश्ता झाल्यानंतर शरीराला थोडी ऊब मिळाल्यामुळे आजूबाजूला निदान परिसर काय आहे हे पहाण्यासाठी बाहेर पडण्याची हिम्मत केली!  अतिशय थंडी होती.

आम्ही ज्या दुकानात थांबलो होतो, त्याच्या मागच्या बाजूच्या सर्व परिसराने जणू बर्फाची चादर पांघरलेली होती. लष्कराच्या छावण्या देखील बर्फाने वेढलेल्या दिसत होत्या. अगदी रस्त्यालगत देखील नुकताच झालेला भुसभुशीत बर्फ जमा झाला होता. समुद्र सपाटीपासून १३,००० फुट उंचीवर असलेली थांगू व्हॅली ऐतिहासिक दृष्ट्‍या पूर्वी व्यापारी आणि पशुपालकांचे महत्त्वाचे विश्रांतीचे ठिकाण!  धुळमातीचे रस्ते जागोजागी बर्फाने आच्छादलेले दिसत होते.

आम्ही काही वेळ थांगूमध्ये थांबून पुढे निघालो. आता मात्र खडबडीत दगड धोंडे आणि धुळमातीने भरलेल्या रस्त्यावरून आमची जीप मार्गक्रमण करू लागली. धुरळा उडत असल्याने गाडीच्या खिडक्या उघडून फोटो अथवा विडियो शूट करण्यासारखी अजिबात परिस्थिती नव्हती. त्याहूनही गार वारं नाका-कानाला झोंबत होते! आम्ही काचातूनच त्या प्रवासाची दृश्ये टिपण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळातच बर्फाळ वाळवंटात प्रवेश केल्यासारखे वाटू लागले, कुठेही वस्ती नाही, हिरवळीचा मागमूस नाही आणि होडकं पाण्यावर डुलावे तशी आमची जीप त्या बर्फाळ वाळवंटातून पुढे जात होती! क्वचितच लष्कराची गाडी आणि आमच्या सारख्या टुरिस्ट गाड्या पण अगदी बोटावर मोजता येईल इतक्याच! विस्तीर्ण माळरानासारखा पसरलेला फक्त आणि फक्त बर्फाळ प्रदेश! त्या वातावरणाचा रुक्षपणा अगदी गाडीतून देखील जाणवू लागला.

आम्ही साधारण दहाच्या सुमारास गुरुडोंगमार तलावाच्या पायथ्याशी पोहोचलो. बर्फ वृष्टीमुळे काही अंतरावरच गाड्या उभ्या होत्या. तेथून पुढे थोडा चढ ओलांडून सरोवराच्या दिशेने जायचे होते. हिवाळा नसेल तेव्हा वाहन थोडे अंतर अधिक वर चढून जाते पण आता तेथे संपूर्ण हिमाचे साम्राज्य पसरलेले होते! आम्ही गाडीतून उतरल्यावर विरळ हवेत आल्याची जाणीव झाली. चढ चढताना धाप लागत होती! अगदी काही मिनिटांचे अंतर, तरीही आव्हानात्मक वाटत होते. संपूर्ण बर्फाळ वाटेवरून पाय  रोवत आम्ही हळूहळू एक चढण ओलांडून ज्या ठिकाणी पोहोचलो तेथील दृश्य अगदी अविस्मरणीय होते!

संपूर्णपणे गोठलेले गुरुडोंगमार सरोवर

समुद्र सपाटीपासून १७,८०० फुट उंचीवर असणारे हे सरोवर स्थानिकांसाठी पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण बर्फाळ वाळवंटी प्रदेश पार करून चौफेर हिमाच्छादित पर्वतांनी वेढलेल्या एका पूर्णपणे गोठलेल्या सरोवरापाशी आम्ही पोहोचलो होतो. आम्ही खरोखरच हिमालयातील ‘कोल्ड डेजर्ट’ मध्ये येऊन पोहोचलो होतो. आम्हाला विरळ हवेचा परिणाम  सुस्पष्टपणे जाणवू लागला. अगदी क्षुल्लक अंतर चढून आलो होतो, पण आमचा श्वास फुलला होता! सरोवराजवळ मोजकेच आम्ही पर्यटक वगळता मानवी वावर नव्हता. विरळ हवेत तेथील शांतता कानात गुंजत होती. आमच्या हालचाली मंदावल्या. आम्ही अगदी सावकाश त्या सरोवराच्या परिसराचा आढावा घेऊ लागलो. संपूर्ण तलाव गोठलेला होता. जणू हिमाच्या राशी तेथे जमा झाल्या होत्या! तलावाच्या आजूबाजूने रंगीत ध्वजपताका  हवेत जणू ‘ओम मणि पदमे हम्’चा नाद करीत प्रार्थना अर्पण करीत होत्या.

हिवाळ्यात साधारण नोव्हेंबर ते मे महिना गुरुडोंगमार तलावाचे पाणी गोठलेले असते. जून ते ऑक्टोबर ह्या कालावधीत तलावाचे पाणी वितळते. आमच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी वितळलेल्या निळ्याशार पाण्यात तेथील हिमशिखरांचे दिसणारे प्रतिबिंबाचे अवर्णनीय दृश्य ही एक पर्वणीच असते! सरोवराच्या एका बाजूला पाणी दिसत होते! कुतुहल वाटले, संपूर्ण सरोवर गोठलेले असताना इतक्याच भागात पाणी कसे! ह्यामागील स्थानिकांतर्फे सांगण्यात येणारी कथा अशी की, बौद्ध धर्मगुरु पद्मसंभव त्यांच्या तिबेट यात्रेचेवेळी ह्या प्रदेशाला भेट देऊन गेले. अतिशय थंड आणि बर्फाळ प्रदेशात राहणार्‍या त्यांच्या अनुयायींनी त्यांना अनुग्रह करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी आपल्या एका बोटाचा पाण्याला स्पर्श केला अन् त्याचक्षणी तेथील बर्फाचे पाण्यात रूपांतर झाले. तेव्हापासून थंडीत संपूर्ण सरोवर गोठलेले असताना देखील सरोवराच्या ह्या भागातील पाणी गोठत नाही! स्थानिकांची अशी मान्यता आहे की, हा एक प्रकारे गुरु पद्मसंभवांचा आशीर्वादच आहे!  हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीय लोकांसाठी हा तलाव एक धार्मिक आस्था स्थान असल्याचे सांगीतले जाते. आशीर्वाद प्राप्तीसाठी ह्या तलावाची परिक्रमा केली जाते असेही कळले. तलावाच्या एका बाजूला जिथे पाणी दिसत होते त्या बाजूस तळ्याकाठी जाण्यासाठी एक लोखंडी शिडी लावलेली दिसत होती.

संपूर्ण सरोवर गोठलेले असताना देखील ह्या भागातील पाणी गोठत नाही!

तलावाजवळच एक छोटे गुरु पद्मसंभवांचे मंदिर आणि एक गुरुद्वारा आहे. हा परिसर लष्कराच्या ताब्यात असल्याने पर्यटकांच्या हालचालीवर करडी नजर असते.  चीन आणि तिबेट सीमा अगदीच लगत असल्याने इथे विदेशीय पर्यटकांना येण्यास परवानगी नसते. खरं तर आम्हाला सरोवरापाशी फक्त पंधरा मिनिटे थांबण्याची परवानगी मिळाली होती. पर्यटकांना गुरुडोंगमार तलावाजवळ हवा विरळ असल्याने अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ थांबण्याची मुभा नसते. अॅक्युट माउंटेन सिकनेसचा (AMS) धोका उद्भवू शकतो. तेथून दुपार होण्याआधी परतावे लागते. हवेत प्रचंड गारठा होता. संपूर्ण परिसर बर्फाच्छादित होता. आम्ही तेथून आम्हाला मिळालेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करत पुन्हा आमच्या जीपगाडीकडे जाण्यासाठी निघालो. पुन्हा त्याच बर्फाळ वाळवंटाला पार करून आम्ही काला पत्थर येथे जाण्यासाठी निघालो.

काला पत्थर     

गुरुडोंगमार सरोवराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गापासून २० किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून अंदाजे १४,८५० फुट उंचीवर असलेले काला पत्थर म्हणजे काळाकभिन्न उंच पहाडांनी शुभ्र वस्त्रांची प्रावरणे परिधान केलेला प्रदेश! क्वचितच पर्यटक असणारा! काला पत्थर येथील बर्फाच्छादित कांचनजंगा पर्वतरांगेची विहंगम दृश्ये बघावयास मिळतात. प्रवासादरम्यानचा हा एक छोटा ब्रेक पॉइंट म्हटलं तरी चालेल! भारत-तिबेट सीमेजवळचे हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. इथे जागोजागी लष्करासाठी असलेले बंकर दिसतात. अगदी वर्षभर बर्फाच्छादित असणारा हा उत्तर सिक्किमचा भाग अगदी “no man land” सारखा भासतो. गुरुडोंगमार तलावाच्या तुलनेत हे ठिकाण कमी उंचीवर आहे. इथे पोहोचण्यासाठी रस्ता फार काही बरा नव्हता. आम्ही गाडीतून उतरून थोडे अंतर पायी चालत गेलो. रस्ता पूर्णतः बर्फाने झाकलेला होता. संपूर्ण परिसर पांढर्‍या बर्फाने आणि काळ्या खडकांनी व्यापलेला होता. अवघे काळ्या-पांढर्‍या रंगाचे साम्राज्य पसरलेले होते!  भर दुपारचे दोन वाजलेले होते, तरीही त्या काळ्या पहाडांच्या मागे निळ्या आकाशात कापूसाच्या पुंजक्यांप्रमाणे जमा झालेल्या शुभ्र-करड्या ढगांनी सूर्य जणू गिळंकृत केलेला होता.  आमच्या शिवाय कोणाचाही पायरव नव्हता, त्यामुळे तेथील वातावरणातील शांतता अगदी गूढ भासू लागली. हे ठिकाण भारतीय लष्कराच्या देखरेखीखाली असल्याने तिथे जास्त वेळ थांबण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा आमच्या गाडीकडे पावले वळवली. आणि आम्ही लाचुंग मुक्कामी रवाना झालो. साधारण सूर्यास्तापूर्वी आम्ही लाचुंग येथे पोहोचलो. हवेत गारठा वाढू लागला. दुसर्‍या दिवशी पुन्हा पहाटे लवकर प्रवास सुरू करून युमथांग व्हॅलीकडे जाऊन गंगटोक मुक्कामी परतायचे होते.

लाचुंग

आम्ही लाचुंग गावात पोहोचेपर्यंत दिवस मावळतीला आलेला होता. मंगन जिल्ह्यातील तिबेट सीमेच्या जवळच असलेले “लाचुंग” गाव “Gateway to Yumthang Valley” असे मानले जाते. ‘La Chung’ म्हणजे छोटी खिंड! तिस्ता नदीच्या दोन उपनद्या लाचेन आणि लाचुंग ह्यांच्या संगमावर साधारण समुद्र सपाटीपासून ९६०० फुट उंचीवर लाचुंग वसलेले आहे. गंगटोक पासून साधारण १२५ किलोमीटर अंतरावर असलेले लाचुंग हे तेथील वळणा-वळणाचे पर्वतीय रस्ते, हिमाच्छादित पर्वत शिखरे आणि अप्रतिम अल्पाइन निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

येथील बहुतांशी रहिवासी लेपचा आणि तिबेटीयन वंशाचे लोक आहेत.  साधारण ऑक्टोबर ते मे ह्या कालावधी मध्ये उत्तर सिक्किम मधील ह्या लाचेन-लाचुंगमध्ये पर्यटनामुळे गजबज पाहावयास मिळते. उन्हाळा आणि हिवाळा ह्या दोन्ही ऋतुमध्ये निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार पाहावयास मिळतात. अत्यंत निसर्गसुंदर आणि शांत ‘लाचुंग’ युमथांगच्या जवळ असल्याने लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास आलेले आहे. येथे मार्च ते मे विविध रंगांच्या फुलांची उधळण होत असते आणि हिवाळ्यात प्रचंड बर्फ वृष्टी होते. युमथांग मुळे हे ठिकाण ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून देखील ओळखले जाते. लाचुंग गाव हे सुद्धा ‘झुमसा’ ह्या स्थानिक स्वायत्त प्रशासनासाठी ओळखले जाते.

आमचा दिवसभराचा प्रवासाचा शीण लाचुंगच्या अनोख्या वातावरणात आल्यावर कुठच्या कुठे पळाला. संधिकालानंतर वातावरणामधील गारठा प्रचंड वाढला. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून युमथांग व्हॅलीला भेट देऊन उत्तर सिक्किमचा निरोप घ्यायचा होता.    

युमथांग व्हॅली

आम्ही शुचिर्भूत होऊन तयार झालो. सकाळी लवकरच सहा वाजता लाचुंगचा निरोप घेतला आणि आमचा कंपू युमथांग व्हॅलीकडे निघाला! युमथांग व्हॅलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा प्रवास हाच एक अविस्मरणीय अनुभव ठरला! संपूर्ण प्रदेश हिमाची दुलई पसरून गुडूप झालेला होता. ह्या खोऱ्यात सदाहरित देवदार, पाइन वृक्षांवर शुभ्र हिम ओघळलेला, झाडांच्या शाखांमध्ये लटकलेला दिसत होता. मला सांताक्लोज आणि युरोपातील नाताळ आठवला. स्वित्झर्लंड, अलास्का, आणि युरोपातील अल्पाइन कुरणे, अगदी असेच वाटावे असा निसर्ग! सिक्किम मधील हे ठिकाण म्हणजे एक आश्चर्य आहे, हिवाळ्यात गोठलेल्या नद्या, बर्फाच्छादित डोंगर आणि गरम पाण्याचे नैसर्गिक झरे!

रस्त्यावर सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली होती. वाहतुकीसाठी अगदी धोकादायक! पण येथील वाहनचालक अत्यंत सरावलेले होते. आम्ही साधारण आठ वाजता युमथांग व्हॅली येथे पोहोचलो. युमथांग व्हॅलीचा परिसर शिंगबा ऱ्होडोडेंड्रॉन अभयारण्यामध्ये येतो. चौफेर डोंगरांनी वेढलेले बर्फाचे विस्तीर्ण कुरण आणि लगत गोठलेली नदी म्हणजे “winter wonderland”- युमथांग व्हॅली! हिमवर्षावामुळे आजूबाजूच्या सूचिपर्णी जंगलातील वृक्षांच्या शाखा-उपशाखांमध्ये अडकून राहिलेला शुभ्र हिम अगदी सांताक्लॉजच्या लांब शुभ्र दाढीसारखा लटकलेला दिसत होता!

आम्ही अभयारण्याच्या प्रवेशद्वाराची कमान पार करून चालत पुढे आलो. रस्त्याच्या दुतर्फा भूतीया लोकांनी दुकाने थाटलेली होती. बर्फामध्ये खेळण्यासाठी गम बूट, मोजे, काठी, कोट अश्या विविध वस्तु पर्यटकांसाठी भाड्याने उपलब्ध करून देत होते. इथे पर्यटकांचा खूपच वावर होता. रस्त्याच्या उजव्या बाजूला खालच्या दिशेने त्या दुकानापासून काही अंतरावर पुढे जाऊन नदीकाठाने सर्वदूर पसरलेल्या बर्फाच्या कुरणावर पर्यटक मौज-मस्ती करीत होते! आम्ही देखील त्या बर्फाच्या कुरणावरून चालत नदी काठाकडे गेलो. नदीच्या पलीकडे दाट पाइन वृक्षांच्या सांदी-कोपऱ्यातून शुभ्र हिमाचे पुंजके डोकावत होते.

बर्फामध्ये खेळण्याची हौस भागल्यानंतर तेथील नदीकाठच्या एका बाकड्यावर बसून मी सभोवतालचे दृश्य पाहण्यात गुंग झाले. नदी पात्रामधील पाण्याच्या प्रवाहाचे रूपांतर जणू एका झऱ्यात झाले होते. वाहत्या पाण्याचा पृष्ठभाग जणू एका पारदर्शक काचेप्रमाणे भासत होता. नदीचा पृष्ठ भाग गोठलेल्या बर्फाच्या पातळ थरामुळे काचेसारखाच दिसत होता. काही अंतरावर बुद्धिस्ट प्रार्थना ध्वज पताका लावलेल्या होत्या. आम्ही त्या हिमाच्या दुलईत लपेटलेल्या परिसरामध्ये रमून गेलो. हिवाळ्यातील युमथांग व्हॅली शुभ्र हिमाने सजलेली होती. हेच खोरे वसंत ऋतुमध्ये नानाविध रंगाच्या फुलांनी नटलेले असते. मनात विचार आला, किती सुंदर असेल तो वसंत ऋतुचा नजारा! ऱ्होडोडेंड्रॉनच्या विपुल फुलांमुळे हे खोरे लाल, गुलाबी, जांभळ्या आणि पिवळ्या रंगाने नखशिखांत बहरलेले असते. हिमालयाची मजा काही औरच असते, इथे प्रत्येक  ऋतु अनुभवला पाहिजे! आमच्या गाडी चालकाने धाडलेल्या निरोपाने माझी तंद्री भंग झाली. आम्हाला आता निघणे आवश्यक होते. साधारण साडे नऊ वाजून गेले होते. आमचा गंगटोकच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला. आम्ही युमथांग व्हॅली सोडून काही अंतर पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे एकाएकी आमच्या गाडीने रस्ता सोडून बुद्धिबळाच्या पटावरच्या उंटासारखी तिरकी चाल करून मुख्य रस्त्यावरून खड्ड्यात घसरली! आमचे नशीब बलवत्तर म्हणून आमच्या वाहन चालकाच्या वाहनावरील उत्तम नियंत्रणामुळे दरीच्या बाजूला न जाता डोंगराच्या  दिशेने त्याने गाडी वळवली.  

परतीच्या प्रवासात त्या हिमाच्छादित पर्वत रांगा, दरी-खोरी, रस्त्यात निवांत चरणारे याक अश्या दृश्यांचा सामना करीत आम्ही संध्याकाळी साधारण सहाच्या दरम्यान गंगटोकला पोहोचलो. एम जी मार्गावरची रोषणाई झगमगत होती. आम्ही रात्रीच्या मुक्कामाकरिता बाजारपेठेजवळच्या एका हॉटेलचा आसरा घेतला. आमच्या हाती अजून एक दिवस होता. त्यामुळे परतीच्या प्रवासात बागडोगराच्या दिशेने जाताना अजून एखादया ठिकाणाला भेट देता येईल का? ह्याची खलबतं करीत आम्ही दोघी झोपी गेलो. पण उत्तर सिक्किमची सहल गुरुडोंगमार आणि युमथांग व्हॅली मुळे अगदी मनात कोरली गेली!

गुरुडोंगमार सरोवराची धवल रंगात मिसळलेली आकाशाची निळाई, लाचेन-लाचुंगच्या शांत दऱ्यांमधून पसरणारा सकाळचा धूसर प्रकाश, तितकीच तेथील साधी, उबदार माणसं! हे सगळं काही आपल्या मनात घर करून राहतं! लाचेन-लाचुंगच्या प्रवासात जाणवतं की, नॉर्थ सिक्किम हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर एक अनुभव आहे!      


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

यावर आपले मत नोंदवा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑