आदि कैलाश यात्रा पूर्ण करून काठगोदामला परतल्यावर अधिकच्या चार दिवसांच्या सुट्टीची तजवीज करून ठेवलेली होती. कुठेही धावपळ न करता फक्त विश्रांती घेणे हा त्यामागचा हेतु! अनेकदा नैनीतालला भेट दिलेली होती. नैनीताल म्हटले की, आपल्याला आठवते ते फक्त- नैनीलेक, मॉल रोड, स्नो व्यू पॉइंट! एक गजबजलेले हिल स्टेशन म्हणून नैनीतालने आपली ओळख राखलेली आहे. ह्यावेळी मला खुद्द नैनीतालमधे मुक्काम करायची अजिबात इच्छा नव्हती.मॉल रोडवरील ट्रॅफिक जाम, पर्यटकांची गजबज ह्यामुळे नैनीलेकलगत मॉल रोडवर वास्तव्य टाळले. प्रत्येक हिल स्टेशनला प्रस्थापित झालेले पर्यटन कल्चर बऱ्यापैकी नैनीतालमध्ये सुद्धा दृढ झालेले आहे.

नैनीतालच्या जवळपास निसर्गाने परिपूर्ण नटलेली सामान्य पर्यटकांच्या यादीमधून निसटलेली काही ठिकाणे आहेत त्यापैकी एक पंगोट! पर्यटकांच्या कोलाहलापासून सुट्टीचे काही निवांत क्षण अनुभवून ताजेतवाने होऊन पुन्हा आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत रुजू होताना अशी ठिकाणे मनाला भावतात. त्यामुळे नैनीताल पासून काही अंतरावर असलेल्या पंगोट येथे रहाण्याचा मनोदय होता, परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही.
आम्ही काठगोदामहून थेट आमचा मोर्चा ह्या Aryabhatta Research Institute of Observational Sciences (ARIES) एरिजच्या गेस्ट हाऊसकडे वळविला. खुद्द नैनीताल पासून १०-१२ किलोमीटर अंतरावर नैनीताल शहराच्यावर, हिरव्या जंगलांच्या कुशीत अंदाजे २,२०० मीटर उंचीवर लपलेले एक शांत शिखर म्हणजे – मनोरा पीक! ओक, पाइन, देवदार ह्यांच्या दाट झाडीमधून थेट मनोरा पीककडे जाणारा रस्ता म्हणजे जणू एक सिनेमॅटिक जंगल प्रवास!
नैनीताल – मनोरा पीक
आदि कैलाश यात्रेच्या कंपूमधील आमचे मित्र श्री. अमोल भागवत ह्यांच्या सौजन्याने नैनीतालच्या मनोरा पीकवरील एरिज ह्या एका जुन्या ऑब्झर्व्हेटरीच्या गेस्ट हाऊसमध्ये रहाण्याचा योग आला. एका मोठ्या प्रवासानंतर निवांत आणि विश्रांतीसाठी लाभलेले उत्तम ठिकाण! डॉ. अमोल भागवत Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER) तथा ‘समीर’ ह्या भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रमुख स्वायत्त संशोधन आणि विकास संस्थेचे निवृत्त प्रोग्राम डायरेक्टर आहेत. आमच्या सहलीच्या दरम्यान त्यांच्या कामाच्या निमित्ताने एरिजच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची मुभा मिळाली. गेस्ट हाऊसच्या खोल्या अगदी अद्ययावत, स्वच्छ, नीट-नेटक्या आणि मूलभूत सोयी सुविधांनी सज्ज होत्या. गेस्ट हाऊसमध्येच जेवणाची देखील सोय होती. गेस्ट हाऊसपासून नैनीताल शहरामध्ये जाण्यासाठी ठराविक वेळांना शटल बसची सोय होती. मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे एरिजचा निसर्गरम्य परिसर आणि तेथील नीरव शांतता! मनन-चिंतन-लेखनासाठी अगदी योग्य ठिकाण!
हिमालयाच्या हवामानाचा कोड उलगडणारी भारतीय तंत्रज्ञानाची किमया

आम्ही गेस्ट हाऊसला पोहोचताच आमचे सामान आमच्या खोल्यांमध्ये ठेऊन ऑब्झर्व्हेटरीच्या रडार प्रणालीला भेट देण्यास गेलो. श्री. भागवत हयांनी तेथील अधिकारी ह्यांच्याशी अगोदरच संपर्क करून विनंती केल्याने मला तेथील स्ट्रॅटोस्फियर ट्रोपोस्फियर रडार (ARIES ST RADAR) प्रणाली पाहता आली. वायुमंडलीय विज्ञानात रडार प्रणालींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि वातावरणातील सूक्ष्म बदल समजून घेण्यासाठी रडारच्या साहाय्याने सातत्यपूर्ण व अचूक मापन केले जाते. विशेषतः ढगांची रचना, वाऱ्यांचा वेग व दिशा, क्षोभमंडलीय तापमान, अशांतता (turbulence) आणि इतर वातावरणीय घटकांचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रणालींचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भारतामध्ये, विशेषतः हिमालयीन प्रदेशात, उच्च-उंचीवरील आणि उच्च-रिझोल्यूशन असलेल्या रडार प्रणालींची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते. हिमालयीन प्रदेशाचा भूभाग गुंतागुंतीचा असून येथील हवामान आणि वायुमंडलीय प्रक्रिया अत्यंत जटिल आणि गतिशील आहेत. त्यामुळे येथे होणाऱ्या वायुमंडलीय हालचालींचा अभ्यास करण्यासाठी संवेदनशील, अचूक आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप अशी प्रणाली आवश्यक ठरते.
Stratosphere–Troposphere (ST) Radar ही नैनीताल येथील मनोरा पीकवर स्थापन केलेली भारतातील पहिली उच्च-उंचीवरील सक्रिय VHF रडार सुविधा आहे. हिमालयीन भूभागामुळे उपलब्ध जागा मर्यादित असल्याने ही संपूर्ण प्रणाली अत्यंत कॉम्पॅक्ट पद्धतीने उभारण्यात आली आहे. रडार दोन मजली इमारतीवर बसवलेला असून, परिसरातील पर्वतरांगांमुळे निर्माण होणारा clutter कमी करण्यासाठी सभोवती ठराविक उंचीची धातूची कुंपण रचना करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रणाली हिमालयातील गुंतागुंतीच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक साधन ठरते.
“Gateway to the Central Himalaya” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैनीताल प्रदेशात, ARIES ST Radar उच्च-रिझोल्यूशन वायुमंडलीय मापनाद्वारे हवामान अंदाज अधिक अचूक करण्यासाठी उच्च-रिझोल्यूशन माहिती उपलब्ध करून देणे, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्वतीय हवामान प्रक्रियांच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण माहिती पुरवते. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी वेळेवर आणि विश्वासार्ह माहिती पुरवणे अश्या सर्व बाबींसाठी ह्या रडार प्रणालीचा उपयोग केला जातो. ARIES ST Radar ही हिमालयाच्या गुंतागुंतीच्या हवामानाचा कोड उलगडणारी भारतीय तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण वैज्ञानिक किमया आहे.
ऑब्झर्व्हेटरीला भेट दिल्यानंतर संध्याकाळी आम्ही नैनी लेकमध्ये बोटिंगचा आनंद घेण्यासाठी नैनीताल शहरामध्ये गेलो. बोटिंग, मॉल रोड, नैना देवी मंदिर असा फेरफटका मारून पुन्हा मनोरा पीकवरील गेस्ट हाऊस कडे परतलो.

एरिजच्या दोन दिवसीय मुक्कामात रडार सिस्टम आणि star gazing चा आनंद घेता आला. कल्पना करा की, सूर्य मावळल्यावर काही वेळातच दाट अंधाराचे साम्राज्य पसरते आणि थंड हवा, स्थिर शांत पर्वत रांगा, दूरवर नैनीताल शहराची पुसट प्रकाश रेषा आणि विस्तीर्ण आकाशात विखुरलेले असंख्य तारे आणि ग्रह! मनोरा पीक हा फक्त एक viewpoint नाही— तो भारताच्या सर्वात शांत, सुंदर आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या stargazing ठिकाणांपैकी एक आहे. इथे उभं राहून ताऱ्यांकडे पाहिलं की वाटतं— मनोरा पीकच्या उंचीवर आकाश अधिक जवळ आलेले आहे, आणि हिमालयीन प्रदेश एक विशाल कॉस्मिक कॅनवास आहे!
किलबरी – पंगोट
नैनीताल मधील दोन दिवसीय मुक्कामात आम्ही एक संपूर्ण दिवस किलबरी आणि पंगोट येथे भटकंतीसाठी राखून ठेवलेला होता. पंगोटमध्ये मुक्काम शक्य झाला नाही तरी किमान भटकंती करून येऊ हा उद्देश! आजकाल नैनीतालमध्ये वाजवी दरात स्कूटी किंवा मोटर सायकल दिवसभरासाठी भाडे आकारून दिली जाते. मी कित्येक वर्षे दुचाकी चालविणे सोडून दिल्याने नैनीतालच्या अनोळखी आणि वळणावळणाच्या रस्त्यांचा अंदाज नसल्याने नको ते साहस करण्याचे टाळले! त्यावर अगदी सोयीस्कर उपाय म्हणून आम्ही दुचाकी चालकांसह भाडे तत्वावर स्कूटर घेऊन pillion rider बनून पंगोटची भटकंती करणे पसंत केले.
पंगोट हे उत्तराखंडमधील एक शांत, निसर्गरम्य डोंगराळ गाव आहे, जे गजबजलेल्या नैनिताल शहरापासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. नैनीतालपासून किलबरी, पंगोट येथे दुचाकीवर मागे बसून जाण्याचा अनुभव अगदी रोमहर्षक होता! रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ओक, पाइन आणि र्होडोडेंड्रॉनच्या दाट जंगलांमधून जाणारा रस्ता, हिमालयीन पर्वतीय वाऱ्याचा सुखद स्पर्श पंगोटकडे जाणारा प्रवास एक आनंददायी अनुभव देतो.
किलबरी बर्ड सॅंक्च्युरी — पक्षीनिरीक्षकांचे नंदनवन! नैनीतालच्या गजबजाटापासून थोड्याच अंतरावर वसलेली किलबरी बर्ड सॅंक्च्युरी पंगोट जवळच आहे. भारतातील उत्कृष्ट birdwatching स्थळांपैकी एक म्हणून तिची ओळख आहे; म्हणूनच पंगोटला ‘Birdwatcher’s Paradise’ म्हटले जाते. किलबरी परिसरात २५० हून अधिक पक्षीप्रजाती आढळतात. हिमालयन मोनल, खलिज पिझंट, चीअर पिझंट, हिमालयीन ग्रिफॉन, स्लेटी-हेडेड पॅराकीट, युरेशियन जय, काळ्या डोक्याचा जय आणि मरून ओरिओल हे येथे दिसणारे काही प्रमुख पक्षी आहेत. ओक, पाइन आणि र्होडोडेंड्रॉनच्या दाट झाडीतून किलबरीकडे जाणारा रस्ता एखाद्या शांत, रम्य जंगल ट्रेलचा अनुभव देतो. आमच्या स्कूटर चालकांनी किलबरी फॉरेस्ट हाऊसच्या प्रवेशद्वाराबाहेर गाड्या उभ्या केल्या आणि आम्हाला पायी भटकंती करून येण्यास सुचविले.

खूप वर्षांपूर्वी किलबरी फॉरेस्ट गेस्ट हाऊसला दिलेल्या भेटीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. नैना देवी हिमालयन बर्ड कॉन्झर्वेशन रिझर्व्हमधील घनदाट ओक आणि पाइनच्या जंगलांत वसलेले किलबरी गेस्ट हाऊस हे निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक आणि शहराच्या गजबजाटापासून दूर शांतता शोधणाऱ्यांसाठी अप्रतिम ठिकाण आहे. हिमालयाची मनमोहक दृश्ये, स्वच्छ पर्वतीय हवा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरलेल्या वातावरणात निसर्गाशी जवळीक साधू इच्छिणाऱ्यांसाठी किलबरी गेस्ट हाऊस हा निवासासाठी एक उत्तम पर्याय आहे! पक्षीनिरीक्षण, ट्रेकिंग, छायाचित्रण किंवा विश्रांती करिता हे ठिकाण अगदी उत्तम आहे.

किलबरी फॉरेस्ट रेस्ट हाऊस, ज्याला किलबरी गेस्ट हाऊस म्हणूनही ओळखले जाते, हा १९२०च्या दशकात बांधलेला वसाहतकालीन बंगला आहे. उत्तराखंड वनविभागाच्या व्यवस्थापनाखालील हे गेस्ट हाऊस जुन्या काळाचे आठवण करून देते. येथे खोल्या मर्यादित आहेत आणि रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत सौरऊर्जेवर वीज उपलब्ध असते. मोबाईल नेटवर्क मर्यादित असल्याने डिजिटल डिटॉक्ससाठीही हे ठिकाण योग्य आहे.
किलबरी परिसरात निसर्गरम्य ट्रेकिंग मार्ग सुद्धा आहेत. पक्षीप्रेमींसाठी किलबरी-पंगोटचा ४ किलोमीटरचा जंगलट्रेल, तर किलबरी-नैना शिखर ट्रेक हिमालय आणि नैनिताल सरोवराची विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुबलक वेळ असल्यास ह्या प्रदेशातील जैवविविधता जवळून अनुभवण्यासाठी ओक, रोडोडेंड्रॉन आणि पाइनच्या जंगलांची भ्रमंती जरूर करावी! किलबरी गेस्ट हाऊस हे निसर्ग, शांतता आणि हिमालयीन जंगलाचा आनंददायी अनुभव आहे.
किलबरी फॉरेस्ट गेस्ट हाऊसकडून आम्ही आमचा मोर्चा थेट पंगोट गावाकडे वळविला. जेवणाची वेळ झाल्यामुळे पोटात भुकेने कावळे ओरडत होते. आम्हाला पंगोट गावाच्या वेशीवर आमच्या दुचाकी स्वारांनी आणून सोडले आणि पंगोट भटकंतीसाठी मोकळा वेळ आखून दिला. आम्ही पायी गावात फेरफटका मारत पुढे चालत आलो. तिथे आम्हाला एका नव्याने सुरू झालेल्या रेस्टोरंटचा फलक नजरेस पडला-“Authentic Kumaoni Food”! मग काय तोंडाला पाणी सुटले- आम्ही खास कुमाओनी पदार्थ जेवणासाठी ऑर्डर करून जंगल भटकंतीसाठी पुढे गेलो. जेवण बनण्यास थोडा कालावधी लागणार असल्याने आम्ही जंगलात पायी रपेट करून आलो.
पंगोट हे कुमाऊनी संस्कृती, शांत जीवन आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले छोटं हिमालयीन गाव आहे. इको-लॉजेस, होमस्टे आणि स्थानिक गाईड्समुळे येथे पर्यटन बहरू लागलेले आहे. शेती, मध उत्पादन, आणि बर्डवॉचिंग, पर्यटन हे येथील जनजीवनाचे आधार आहेत. डोंगराळ भूभागामुळे टेरेस फार्मिंग केलेले दिसते; मंडुवा, झांगोरा, सोयाबीन, राजमा आणि बटाटे ही स्थानिक मातीची ओळख सांगणारी मुख्य पिके इथे घेतली जातात. नैना देवी हिमालयन बर्ड कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा भाग असल्याने पंगोटची जैवविविधता समृद्ध आहे. ओक, पाइन, र्होडोडेंड्रॉन, देवदार, काफल, अल्डर, मेपल, हॉर्स चेस्टनट तसेच अप्रिकॉट, प्लम, पीच, बुरांश, जंगली पुदीना, लेमनग्रास आणि औषधी झुडपांनी हा परिसर समृद्ध आहे.
‘बर्डवॉचिंग कॅपिटल’ म्हणून ओळखले जाणारे पंगोट पक्षीवैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हिमालयीन मोनाल, रेड-बिल्ड ब्लू मॅगपाई, वूडपेकर्स आणि हिमालयीन ग्रिफन यांसारखे पक्षी येथे सहज दिसतात. जंगलभ्रमंतीत त्यांची झलक पंगोटच्या शांत, नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती देते. पंगोटचे हवामान थंड आणि आल्हाददायक आहे. हिवाळ्यात तापमान सुमारे ८°C पर्यंत खाली येते, तर उन्हाळ्यात ते २५°C पर्यंत राहते. संथ जीवनशैली, पक्ष्यांचे मंजुळ स्वर, पर्वतीय हवा आणि निसर्गाशी एकरूप झालेले जनजीवन यामुळे पंगोट दीर्घकाळ स्मरणात राहते.
आम्ही पंगोटच्या पायवाटांवरून फिरून येईपर्यंत आमचे जेवण तयार झाले होते. प्रवासात जिथे जाल, तिथल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायलाच हवा नाही का! कुमाऊँमधील काळे सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असून त्यापासून बनणारी आमटीसारखी ‘भट्ट की चुडकानी’ खास लोकप्रिय आहे. रोजच्या जेवणात ‘कुमाऊनी रायता’ आवर्जून वाढला जातो; दही, काकडी आणि मोहरी यांपासून तयार होणाऱ्या या रायत्यात चवीनुसार हिरवी मिरची, मीठ आणि हिंग घातले जाते. स्थानिक लोक त्याला ‘पहाडी खीरे का रायता’ असेही म्हणतात. या पदार्थांसोबत ऊर्जा आणि पोषण देणारी ‘मंडूए की रोटी’ उत्तम लागते. आम्ही कुमाओनी रायता, भट्ट की चुडकानी आणि मंडूए की रोटीचा मनसोक्त स्वाद घेऊन पंगोटचा निरोप घेतला.
पंगोटहून परतताना नैना पीकवरुन नैनीताल शहराचे आणि नैनी लेकचे अगदी विहंगम दृश्य नजरेस पडते. परतीच्या वाटेवर आमच्या दुचाकीस्वारांनी शॉर्टकटच्या नावाखाली शहरातील एका उंचावर असलेल्या वसाहतीमधून जाणाऱ्या तीव्र उतार असणाऱ्या एका रस्त्यावरून आम्हाला नेताना आमचे धाबे दणाणले. आम्ही नैनीताल शहराचा सूर्यास्तापूर्वी लवकरच निरोप घेऊन परिवहन मंडळाची बस पकडून हनुमान गढी पर्यंत आलो.
नैनीताल शहरापासून साधारण तीन-साडेतीन किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर रामभक्त हनुमानाची उंच आणि भव्य मूर्ती स्थापित केलेली आहे. हनुमान मंदिरासोबतच येथे राम आणि शिव मंदिर सुद्धा आहे. हनुमान गढी खरं तर तेथून दिसणार्या सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. हनुमान गढीच्या मागील बाजूने जंगलातून एक पायवाट थेट मनोरा पीकवर असलेल्या गेस्ट हाऊस आणि ऑब्झर्व्हेटरीकडे जाते. ह्या पायवाटेने जाताना पायाखाली येणाऱ्या पालापाचोळयाचा आणि दुरवरून कानावर पडणाऱ्या एखाद्या अनोळखी पक्ष्याचा आवाज आपल्याला एका छोट्या जंगल ट्रेलचा अनुभव देऊन जातो. आम्ही मंदिराच्या मागून लगबगीने मनोरा पीक गाठला. तेथील observation deck वरुन दिसणारा सूर्यास्ताचा नजारा अगदी खासच होता. आमची नैनीताल सुट्टी संपली! दुसऱ्या दिवशी सकाळी रामनगरकडे प्रयाण नियोजित होते.

जीम कॉर्बेट जंगल सफारी
दुसऱ्या दिवशी आम्ही मनोरा पीकवरून शटल बसने नैनीताल बस स्टँडवर आलो आणि परिवहन मंडळाच्या बसने हलद्वानी गाठले आणि तिथून पुढे रामनगर! पब्लिक ट्रान्सपोर्टने केलेल्या किफायतशीर प्रवासाचा एक वेगळा अनुभव होता. रामनगरहून मी पाटकोट येथील क्लब महिन्द्राच्या रिसॉर्टवर रवाना झाले. पाटकोट क्लब महिंद्रा रामनगरपासून दूर आहे. त्यामुळे मला जंगल सफारीसाठी आणि परतीच्या प्रवासासाठी ये-जा करावी लागली.
पाटकोटच्या रिसॉर्टवर रहाण्याचा अनुभव वेगळाच होता. अगदी जंगलाच्या मध्यभागी एक सुरक्षित आणि आरामदायी वास्तव्य! येथील प्रत्येक यूनिटला बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये चहाचा कप हातात घेऊन सभोवतालच्या निसर्गाचा आणि रानगंधाचा आनंद घेण्याचा अनुभव काही औरच होता. पाटकोट मधील वास्तव्य म्हणजे जंगल परिसरातील निसर्गाच्या लयीत स्वतःला हरवून जाणं! संध्याकाळी रिसॉर्टचा परिसर आणखी सुंदर भासतो. गर्द झाडांच्या मागे दूर सूर्य मावळताना नभामध्ये मुक्त हस्ते लाल कुसुंबी, करड्या जांभळ्या रंगाची उधळण करीत अस्ताला जातो, तर दुसर्या बाजूला आकाशात चंद्रमा डोकावू लागतो. जंगलाची किर्र शांतता कानात गुंजते. मधूनच दुरूवरून जंगलातील अधिवासाचा पडसाद ऐकू येतो. सांजवेळ दाटून आल्यावर मात्र रिसॉर्ट परिसराबाहेर न जाण्याची रिसॉर्ट कर्मचार्यांची प्रेमळ सूचना आपण जंगलात आहोत ह्याची जाणीव करून देते.
जीम कॉर्बेटमधील जंगल सफारीचे बूकिंग अगदी महिनाभर अगोदर करून ठेवलेले होते. ह्यावेळी canter safari करण्याचे ठरविले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेचार वाजता टॅक्सीने मी रामनगरच्या canter safari बोर्डिंग ऑफिसजवळ पोहोचले. परंतु क्लब महिंद्रा पाटकोट ते रामनगर हा जंगलातील टप्पा पार करताना भय, उत्कंठा अश्या संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. झुंजुमुंजु होताना, काही हरणांचे कळप जंगल पार करताना तर काही रस्त्याच्या बाजूला झुडुपांच्या जाळीत विहरताना दिसत होते.
रामनगर येथून सहा वाजता सफारीसाठी canter निघाले. आमचे रिपोर्टिंग धांगरी येथे होते. धांगरी गेट हे धिकाला झोनसाठी मुख्य प्रवेशद्वार आहे. रामनगर पासून साधारण १८ किलोमीटर अंतरावर धांगरी गावाजवळ ‘धांगरी गेट’ आहे. ‘धिकाला’ झोन हा core tiger reserve आहे. धांगरी गेटवर आमच्या सर्वांचे मोबाइल एका लॉकरमध्ये जमा करण्यात आले. सफारी करताना मोबाइल नेण्यास प्रतिबंध केलेला आहे, परंतु कॅमेरा नेण्यास परवानगी आहे. प्रवेशाचे सोपस्कार पार पडून आम्ही जंगल सफारीसाठी तयार होतो. आमच्या सोबतच्या वनविभागाचे अधिकृत गाईड आणि चालक यांनी आम्हाला सफारी संबंधित महत्त्वाच्या सूचना दिल्या. आणि आमचा canter हळूहळू जंगलामध्ये पुढे जाऊ लागला. त्या जंगलवाटेच्या दुतर्फा साल, शिसम, आणि पहाट वाऱ्यावर डुलणारी झुडपे आणि गवताची पाती दिसत होती. हळूहळू त्या जंगलाचा मंद गंध आपल्या मनाचा ताबा घेतो, आपली नजर आणि कान आपसूक तीक्ष्ण होऊन आज आपल्या भेटीला कोण येणार असेल बरं ? ह्या विचारात गुंग होतो.
अधेमधे canter थांबतो, कधी चितळांचे थवे, तर कधी सांबर, तर एखादा हत्ती झाडी-झुडपातून डोकावतो. पण रामगंगा नदीच्या किनाऱ्याने अनेक हत्तींचे कळप नजरेस पडतात. जंगलामध्ये सकाळच्या वेळेस अनेक पक्षी दिसतात. धूसर पहाट हळूहळू उजाडत जाते आणि धिकाल्याच्या जंगलातील गवताळ मैदानावर सूर्यकिरणे पखरण घालताच जंगलातील भाबडी जनावरे भय मुक्त होऊन कळपा-कळपाने विहारास बाहेर पडतात. दूरवर रामगंगा नदीचा शांत प्रवाह दिसतो. जलाशयाजवळ गजराजाची कुटुंबे आलेली दिसतात. पण जंगलाचा राजा मात्र आपल्याला चकवा देतो!!
खरे तर प्राणी ओळख होण्यासाठी अनेक अभयारण्य किंवा प्राणी संग्रहालये असतात. मुक्त विहार करणाऱ्या वन्यजीवांना पहाण्याचा आनंद वेगळा असला तरी सफारीमुळे वन्यजीवांचा जंगलामधील अधिवासात आपण जंगल सफारीच्या निमित्ताने विनाकारण कोलाहल निर्माण करतो. त्यामुळे बहुतांशीवेळा मानवी वावराला सरावलेल्या प्राण्यांव्यतिरिक्त इतर वन्य जीवांचे दर्शन दुर्लभच असते. सफारी करताना मिळालेल्या सुचनांचे काटेकोर पालन सुद्धा होत नाही. त्याचा गंभीर परिणाम सुद्धा भोगावा लागतो.

आमच्या canter मधील एका माणसाने हत्तींचा समूह दिसल्यावर इतक्या जोरात आरोळी ठोकली की, त्या समूहाचा प्रमुख हत्ती आमच्या canter च्या दिशेने धावून आला. आमच्या canter चालकाने मोठ्या जिकिरीने वेगाने canter पळविला. क्षणाक्षणाला वाटत होते की, आमच्या canterचा फुटबॉल तर होणार नाही ना? किंवा सोंडेत canter उचलून ओंडक्यासारखा फेकला तर नाही जाणार ना!! काही क्षण आमच्या canter चा पाठलाग करून हत्ती रस्त्याच्या मधोमध येऊन थांबला. नशीब बलवत्तर होते म्हणून वाचलो असे वाटले! त्यानंतर मात्र गाडीतील कोणत्याही प्रवाशाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता! त्या समूहात बरीच लहान हत्तीची पिल्ले होती. जंगलातील हत्तीच्या कुटुंबात पिल्लाची काळजी ज्येष्ठ वयस्कर आणि अनुभवी मादी हत्ती घेत असते. कदाचित मातृसत्ताक कुटुंबाची प्रमुख म्हणून पिल्लांच्या संरक्षणासाठी मादी हत्ती आमच्या canter मागे धावून आली होती!
साधारण तीन तासाच्या कालावधीची जंगल सफारी उरकून आम्ही रामनगर येथे परतलो. मी पुन्हा पाटकोट रिसॉर्टकडे निघाले. रस्त्यामध्ये सीताबनी बफर झोन असा फलक दिसला. माझ्या टॅक्सी चालकाने मला माहिती पुरवली. जंगलाच्या आत एक छोटं पण अत्यंत शांत मंदिर आहे. स्थानिकांच्या मान्यतेनुसार रामायणातील सितामाई वनवासात असताना इथे काही काळ राहिली होती. म्हणून याच परिसरात तिच्या नावाने सीताबनी मंदिर आहे. स्थानिकांच्या मान्यतेनुसार ह्या परिसरात महर्षि वाल्मीकी आश्रम होता. सीतेच्या लव-कुश ह्या दोन्ही पुत्रांचा जन्म, शिक्षा-दीक्षा ह्या भूमीत झालेली होती. पाटकोट रिसॉर्टवर जाऊन उर्वरित वेळ निव्वळ विश्रांती घेतली.
आदि कैलास यात्रेनंतरची ही निवांत सहल — नैनीतालच्या मॉल रोडवरील गजबजाटापलीकडील मनोरा पीकची शांतता, किलबरी-पंगोटच्या हिरव्यागार जंगलवाटा, पक्ष्यांची किलबिल आणि जीम कॉर्बेटच्या सफारीचे रोमांचक क्षण म्हणजे खऱ्या अर्थी – A Whisper of Nature! निसर्ग, विज्ञान, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि जंगल सफारी ह्यांच्या संमिश्र अनुभवाने उन्हाळी सुट्टी संस्मरणीय झाली.
खऱ्या अर्थाने सुट्टी संपलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पाटकोटहून रामनगर गाठले आणि तिथून पुढे काठगोदाम! रेल्वे स्टेशनवर पोहोचताच दिल्लीकडे जाणारी शताब्दी ट्रेन सज्जच होती. काठगोदाम-दिल्ली आणि पुढे दिल्लीहून थेट विमानाने नवी मुंबई गाठली!
Discover more from अनवट वाटा
Subscribe to get the latest posts sent to your email.










यावर आपले मत नोंदवा