सफर उत्तरबंगाची – भाग -२

भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये जलपाईगुडी जिल्ह्यातील पर्यटनाच्या पटलावर प्रसिद्धीस पावलेले एक छोटेसे गाव म्हणजे लतागुडी! पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला दुआर्स प्रदेश तिस्ता आणि संकोश ह्या नद्यांनी वेढलेला आहे. स्थानिक भाषेमध्ये अर्थाअर्थी ‘प्रवेशद्वार’ या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे दुआर्स ! हा प्रांत भूतान आणि ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानला जातो. कॅलिंगपोंग, जलपाईगुडी, अलीपुरद्वार, कूचबिहार या जिल्ह्यांमध्ये विस्तीर्ण पसरलेला दुआर्स प्रदेश विशेष करून वन्यजीव अभयारण्य आणि निसर्गरम्य प्रदेशसाठी प्रसिद्ध आहे. घनदाट जंगले, चहाच्या बागा, अभयारण्याचा फेरफटका आणि जैवविविधतेची विपुलता ही खरी दुआर्सची ओळख!

जंगल भटकंती, नदी किनारी व्यतीत केलेली शांत संध्याकाळ किंवा जंगल वाटांचा थरार यांचा एकत्रित अनुभव देणारी निवांत सहल म्हणजे  दुआर्स! ऐतिहासिकदृष्ट्या दुआर्स प्रांत कोच राजवंशाच्या कालखंडात ‘कामता’ राज्य म्हणून ओळखले जात असे. आसाम आणि भूतान दरम्यान व्यापारी मार्ग म्हणून ह्या प्रदेशाची ओळख होती. ह्याच दुआर्स प्रदेशातील गोरुमारा राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून लतागुडी प्रसिद्ध आहे. आम्ही आमच्या कूचबिहार सहलीचा शेवटचा टप्पा लतागुडी निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे न्यू जलपाईगुडी स्टेशन आणि बागडोगरा विमानतळापासून असलेले अंतर! काही तासातच परतीच्या प्रवासासाठी मुख्य जंक्शन असलेले न्यू जलपाईगुडी आणि बागडोगरा विमानतळ गाठता येते. लतागुडी पासून न्यू जलपाईगुडी स्टेशन अगदी ५५ किलोमीटर अंतरावर आहे तर बागडोगरा विमानतळ ७०  किलोमीटर! त्यामुळे परतीचा प्रवास अगदी सुलभ होऊ शकतो.

दुआर्स प्रांताला भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. कारण पावसाळ्यात अभयारण्य बंद असतात. आमचे लतागुडीमधील मुक्कामाचे ठिकाण ‘टस्कर डेन रिसॉर्ट’ अगदी रस्त्यालगत होते. खरं तर  लतागुडी राष्ट्रीय महामार्ग ७१७ च्या  दुतर्फा स्थित असलेले एक छोटे गाव आहे. गोरूमारा राष्ट्रीय उद्यानाला अगदी खेटून असल्याने तेथे पर्यटनाला वाव मिळालेला आहे. त्यामुळे येथील परिसर अनेक रिसॉर्ट, ईको लॉज आणि हॉटेलस् हयांनी  व्यापलेला आहे. आमच्या ‘टस्कर डेन’ रिसॉर्टचा परिसर अगदी छान होता. हिरव्यागार वनराजीने बागबगीच्याने वेढलेल्या जागेत स्वतंत्र कॉटेजेस् होत्या. मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे खोली समोर असणारा ऐसपैस व्हरांडा! तिथे निवांत बसण्याची व्यवस्था देखील होती. आम्ही लतागुडीला पोहोचेपर्यंत काळोख झालेला होता. त्यामुळे दुसर्‍या दिवशीच्या सकाळचे वेध लागले. दिवसाभराच्या प्रवासाने थकून भागून आम्ही पोटपूजा करून झोपेच्या अधीन झालो.

लतागुडीची सकाळ सूर्य देवांना भेटीस घेऊन आली! कूचबिहारमध्ये दोन दिवस ढगाळलेल्या  वातावरणामुळे सूर्य दर्शन झालेले नव्हते. पण लतागुडीची सकाळ पक्ष्यांची किलबिलाटाने आणि आमच्या खोलीच्या खिडकीच्या तावदानांमधून शिरकाव केलेल्या कोवळ्या सूर्य किरणांच्या तिरि‍पेने झाली! आज आम्ही प्रथम गोरूमारा राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारीची चौकशी केली. जंगल सफारीसाठी साधारण दुपारी अडीच पावणेतीन वाजताच्या सुमारास वन्यजीव विभागाच्या कार्यालयात हजर राहणे सक्तीचे असते. तिथे प्रवेश नोंदणी, गाईड, वाहन इत्यादि तपशील तिकिटासह आपल्या हाती दिला जातो. साधारण दुपारी ३ ते ५ वाजताच्या कालावधीमध्ये आपल्याला जंगल सफर घडवली जाते आणि परतीच्या प्रवासात आदिवासी लोकनृत्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे आमच्याकडे तुलनेने इतर स्थल दर्शनासाठी अगदी मर्यादित कालावधी होता.

लतागुडीच्या आसपास सॅमसिंग, सूंतलेखोला, झालॉंग, बिंदू, मूर्ती नदी अशी अनेक पर्यटकांना आकर्षित करणारी स्थळे आहेत. आम्ही आमच्या गाडी चालकाला सूचना दिली, दुपारी दोन वाजेपर्यंत माघारी परत येता येईल ह्या अंदाजाने आम्हाला स्थल दर्शन करायचे आहे. आम्ही ठराविकच ठिकाणांना भेट देऊन परत येण्याचे ठरविले आणि नाश्ता करून भटकंतीला निघालो. 

आमच्या लतागुडीच्या रिसॉर्टमधून निघाल्यावर दुतर्फा घनदाट वनराजी असलेल्या रस्त्यावरून आमची गाडी धाऊ लागली. अगदी गोरुमारा नॅशनल पार्कच्या टप्प्यामध्ये एका छोट्या पुलावर आमच्या चालकाने अचानक गाडी थांबवली. त्याच्या अनुभवानुसार ह्या ठिकाणी भारत-भूतान देशांच्या  सीमांची सरमिसळ होत असल्यामुळे आपले मोबाइलमधील घड्याळ भूतानची वेळ दाखवते तर आपल्या हातावरील घड्याळ भारताची वेळ दाखवते! आहे ना गंमत! पण त्यामागे शास्त्रीय कारण आहे.

भारत -भूतान दोन देशांच्या वेळेच्या संभ्रमात!

भौगोलिक दृष्ट्‍या दोन टेक्टॉनिक प्लेट आहेत, युरेशियन आणि भारतीय! गोरुमारा प्रदेशात सक्रिय चुंबकत्व आहे. भूतानचे काही भाग युरेशियन प्लेटवर आहे तर काही भारतीय प्लेटवर आहे. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मोबाइलमधे घड्याळ भूतान देशाची वेळ गृहीत धरते, आणि हातावरील घडयाळ भारत देशाची! दोन्ही देशांच्या वेळेमध्ये ३० मिनिटांचा फरक जाणवतो. आम्ही काही वेळ तिथे थांबलो, फोटोग्राफी केली आणि पुढे निघालो.

आमचा गाडी चालक आज आमचा गाईड सुद्धा होता. त्यानेच आमची दिवसभराची itinerary निश्चित केली आणि त्यानुसार आमचा पुढचा स्पॉट होता – Murti Riverside! मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहणार्‍या मूर्ती नदीच्या काठावर अगदी दगड गोट्यामधून नदी प्रवाहापाशी पोचता येईल अशी ठिकाणी पर्यटकांना उतरविले जाते आणि नेमून दिलेल्या वेळेत आपल्याला घ्यायचा असतो Murti Riversideचा आनंद! गोरुमारा वन विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मूर्ती नदीच्या काठाने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हे क्षेत्र विकसित करण्यात आलेले आहे.

Murti Riverside

दुआर्स प्रदेशातून वाहणारी मूर्ती नदी गोरूमारा राष्ट्रीय उद्यान आणि चापरामारी वन्यजीव अरण्यामधून तिच्या लगतच्या घनदाट जंगलासाठी, चहाच्या मळ्यांसाठी आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पूर्व हिमालयाची पार्श्वभूमी आणि नदी काठाने असलेली घनदाट जंगले फोटोग्राफी करणार्‍यांना आकर्षित करतील अशीच आहेत. नेओरा व्हॅली मधून उगम पावणाऱ्या मूर्ती नदीच्या काठाने पर्यटनाच्या माध्यमातून अनेक अपरिचित ठिकाणे प्रकाशझोतात आलेली आहेत. गोरूमारा नॅशनल पार्कच्या परीघातच असल्याने नदीकाठाने अनेक विश्रामगृहे, कॅम्पींगचा अनुभव देणारी अनेक रिसॉर्ट ह्या परिसरात बहरलेली आहेत. स्थानिकांसाठी “वीकएंड गेटवे” म्हणून हा भाग प्रसिद्ध असावा! नदीकाठच्या रिसॉर्ट मध्ये राहून गोरूमारा नॅशनल पार्क, बिंदु, झालोंग, जलढाका, सॅमसिंग, सुंतालेखोला ह्या निसर्ग सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा आनंद घेता येतो.

आम्ही मूर्ती नदीच्या किनारी काही वेळ थांबून फोटोग्राफी केली आणि पुढच्या टप्प्याच्या दिशेने निघालो. आम्ही दुतर्फा सुंदर चहाच्या मळयांमधून जाताना पाचूच्या हिरव्या रंगाच्या अनेक लहरी पसरल्यासारखे भासत होते. गैरीबांस जवळ येताच आजूबाजूला असणारे चहाचे मळे अचानक गायब झाले आणि रबर प्लांटेशन केलेले दिसू लागले. आम्ही साधारण १२ वाजताच्या सुमारास गैरीबांस येथे पोहोचलो.

गैरीबांस व्ह्यू पॉइंट हे पश्चिम बंगालच्या दुआर्स प्रदेशात वसलेले एक सुंदर, शांत, पण अपरिचित पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण सहसा झालोंग, बिंदू, जलढाका येथील प्रसिद्ध सात पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेले ठिकाण आहे. व्ह्यूपॉइंटला भेट देणे हे सहसा पूर्ण दिवसाच्या स्थानिक प्रेक्षणीय स्थळांच्या दौऱ्याचा एक भाग असते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हे ठिकाण निसर्गरम्य टेकड्या आणि जंगलामध्ये वसलेले असून गैरीबांस व्ह्यू पॉइंट आणि तिथून पुढे जाणाऱ्या रस्त्यावरून भूतानची सीमा आणि तिथले डोंगर स्पष्ट दिसतात. गैरीबांसपासून काही अंतरावरच ‘बिंदू‘ हे भारताचे शेवटचे गाव आहे. तिथला जलढाका नदीवरील पूल आणि धरण हीच भारत व भूतानची अधिकृत सीमा आहे. नदीचा एक भाग भारतात तर दुसरा भूतानमध्ये येतो. नैसर्गिकरित्या विभागलेल्या खोल दरीमध्ये जलढाका नदी वाहताना दिसते आणि खोऱ्याच्या पलीकडे चक्क आनंदी देश-भूतानच्या टेकड्या, त्यावरील घरे आणि वस्ती दिसते. नदीच्या खोऱ्यात भारताच्या हद्दीत झालोंग गावाची छोटी वस्ती दिसते.

गैरीबांस व्ह्यू पॉइंटला पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. व्ह्यू पॉइंटच्या अगदी बाजूला छोटी बाग केलेली आहे, इथे बसून भूतान देशाच्या टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून घेण्याची सर्वांची लगबग चालू होती. इथे पर्यटकांना बसण्यासाठी सोय केलेली आहे, लगतच रेस्टॉरंट आहे. नाश्ता, जेवण, चहा, शितपेये सगळ्याची सोय होती!

आमचे लक्ष घड्याळाकडे होते. आम्हाला दुपारी दोन वाजतापर्यंत लतागुडीला पोहोचून जंगल सफारीचे तिकिट काढायचे होते. त्यामुळे आम्ही लवकरच काढता पाय घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात आम्ही सॅमसिंगला धावती भेट दिली. समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर वसलेले सॅमसिंग नेओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. हे सिलिगुडीपासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. सॅमसिंग उत्तर बंगाल प्रदेशातील निसर्गरम्य, हिरव्यागार चहाच्या बागांनी नटलेले सुंदर ठिकाण आहे.

आम्ही पुन्हा लतागुडीला पोचलो. दुपारचे दोन वाजून गेले होते. आम्ही थेट आमच्या रिसॉर्ट लगतचा मुख्य रस्ता पार करून समोरच असलेल्या गोरूमारा नॅशनल पार्कच्या  प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. तिथे सफारीसाठी नोंदणी सुरू झालेली होती.  आम्ही जंगल प्रवेशासाठी आणि जीप सफारीसाठी  तिकीट काढले आणि पुन्हा आमच्या रिसॉर्टवर पोटपूजा करण्यासाठी गेलो.

गोरूमारा नॅशनल पार्कची सफर 

दुआर्सच्या सहलीमध्ये अगदी “must do” ठिकाण म्हणजे “गोरूमारा नॅशनल पार्क. सन १९४९ मध्ये गोरूमाराला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आणि १९९२ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. गोरूमारा राष्ट्रीय उद्यान ग्रेट इंडियन एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय येथे हत्ती, गवा, बिबट्या, रानमांजर, हरणे आणि इतर वन्यजीव देखील आढळतात. इथे पर्यटकांसाठी पाच दिशांना पाच टेहळणी मनोरे आहेत. आम्ही ‘मेधला’ वॉच टॉवरची सफारी घेतली होती. मेधला वॉच टॉवर इतर वॉच टॉवरपेक्षा अधिक खास आहे. मुख्य रस्त्यावरून काही अंतर जीपमधून गेल्यानंतर आपल्या जीप एका ठिकाणी थांबवल्या जातात आणि तिथून पुढे वॉच टॉवर पर्यंत जाण्यासाठी म्हैस गाडीतून जंगलामध्ये नेले जाते! बैलगाडी सारखी गाडी फक्त बैलाऐवजी म्हशी आणि चाका ऐवजी टायर! ह्या म्हैस गाडीतून जाताना काही वेळ उजव्या हाताला चहाचे मळे दिसत राहतात आणि नंतर जंगल सुरू होते. तिथून पुढे जंगलात म्हैसगाडीतून रपेटीचा आनंद घेताना मजा आणि भय अश्या संमिश्र भावना असतात. आजच्या वेगवान जीवनात म्हैस गाडीचा प्रवास म्हणजे जणू जुन्या काळात परत गेल्याचा अनुभव. मुक्या जनावराच्या पावलांचा ठेका, गाडीची संथ हालचाल, आजूबाजूची हिरवाई आणि ग्रामीण वातावरण यामुळे जंगल फेरफटक्याची मजाच काही और होती.

मेधला टॉवरजवळ आल्यावर आमची म्हैसगाडी थांबली. आम्ही खाली उतरून एका पायवाटेने टॉवरच्या दिशेने चालू लागलो. आमच्या डाव्या हाताला मोठे हत्ती बांधून ठेवलेले होते. मेधला टेहळणी टॉवरवरून गोरुमारा राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या हालचालींचे निरीक्षण करणे हाही एक आनंददायी भाग आहे! वॉच टॉवरच्या सर्वात उंच भागातून दूरपर्यंत जंगल परिसर आणि गवताळ प्रदेश पसरलेला दिसत होता. ह्या जंगलामध्ये सागवान, सीमूल, सिरिस, खैर, आणि साल वृक्षांसारख्या असंख्य वनसंपदा आहेत.

जंगल सफर करताना नैसर्गिक अधिवासात वन्यजीवांचे दर्शन घडणे हा एक अगदी नशीबाचा भाग म्हटले तर वावगं ठरणार नाही! कधी एखादा प्राणी-पक्षी सहजच नजरेस पडतो, तर कधी एखाद्या प्राण्याची केवळ चाहूल लागते. त्यामुळे प्रत्येक क्षण उत्सुकतेचा असतो. संध्याकाळच्या वेळी पाणवठ्यावर प्राणी येण्याची शक्यता अधिक असते. आम्हाला एकशिंगी गेंडा, गवे, मोर, बायसन, हत्ती, असंख्य पक्षी दिसले. मात्र सूर्यास्त होताना आम्हाला वॉच टॉवरवरून पायउतार होऊन परतीचा रस्ता गाठावा लागला. पुन्हा म्हैस गाडीने आम्ही आमच्या जीपजवळ पोहोचलो.

जंगल सफारीचा अनोखा अनुभव घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात जंगलामधील वाडी स्वरूप गावाच्या ठिकाणी खुल्या मंचावर आदिवासी लोकनृत्य आयोजित केलेले होते. संध्याकाळच्या शेवटच्या जंगल सफरीनंतर हा सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याची संधी मिळते. येथील स्थानिक संथाळ आदिवासी समुदायाची लोक हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. ह्या नृत्याचा मूळ गाभा प्रामुख्याने निसर्ग, शेती, कापणी, पाऊस, वारा, प्राण्याच्या हालचाली इत्यादिशी निगडीत असतो. आदिवासी महिला लाल काठ असलेली पांढरी किंवा पिवळी पारंपरिक साडी (स्थानिक भाषेत ह्या पारंपारिक पोषाखाला “पंछी परहाड” म्हणतात) आणि पुरुष पांढरे धोतर किंवा लुंगी नेसतात, डोक्याला फेटा/पगडी बांधून त्यांच्या पारंपरिक पोषाखात नृत्याचे सादरीकरण करतात. एक प्रकारच्या ढोलकसारखे वाद्य- ‘मादल’ आणि मोठ्या नगारा सदृश ‘धमसा’ अश्या वाद्यांच्या तालावर महिला एकमेकींच्या कमरेत किंवा हातात हात गुंफून एक साखळी किंवा वर्तुळ करून एकाच लयीत पाय मागे-पुढे करून डोलून नृत्य करतात. संथाळ नृत्यामध्ये कोणतीही एक व्यक्ती मुख्य कलाकार नसते. संपूर्ण समुदाय एकत्र येऊन नाचतो, जे त्यांच्यातील सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक आहे. नृत्यातील हालचाली आणि गाणी निसर्गाशी नाते अधोरेखित करून निसर्गप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी असतात. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध हालचाली, संगीताची लय आणि सामूहिक नृत्यातून व्यक्त होणारा उत्साह यामुळे वातावरण प्रसन्न झाले. कार्यक्रमाच्या शेवटी स्थानिक कलाकारांनी आम्हा पर्यटकांनाही आपल्यासोबत साखळीत सामील करून घेतले आणि नृत्य शिकवून आमचा आनंद द्विगुणित केला.

पर्यटनाच्या माध्यमातून अशा स्थानिक कलांना प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे आहे. आपापल्या इच्छेप्रमाणे आम्ही त्या स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणाला,  कलेचा सन्मान करावा ह्या हेतूने बक्षिसी देऊ केली. त्या कलाकारांना देखील खूप आनंद झाला. त्यांनी आवर्जून आमच्या सोबत फोटो काढण्याचा आग्रह केला. निसर्गभ्रमंतीसोबत स्थानिक लोकसंस्कृतीची ओळख होणे हा प्रवासाचा एक वेगळाच आनंद असतो. लोकनृत्यामुळे परिसरातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा आणि कलाविष्कार अनुभवता आले. आमच्या सहलीचा हा एक सुंदर आणि लक्षात राहणारा भाग होता.

म्हैसगाडीतून जंगलाच्या दिशेने केलेला प्रवास, मेधला टॉवरवरून घेतलेला निसर्गाचा वेध, सायंकाळच्या वेळी जंगलात व्यतीत केलेले क्षण, विविध प्राणी-पक्षी पाहण्याचा आनंद आणि परतीच्या वाटेवर अनुभवलेले आदिवासी लोकनृत्य—ह्या प्रत्येक गोष्टीने सहलीत वेगळी रंगत आणली.

आम्ही सायंकाळी अंधारून येताना पुन्हा आमच्या रिसॉर्टकडे परतलो. रिसॉर्ट लगत असलेल्या छोटेखानी बाजारपेठेमध्ये फेरफटका मारला. रोषणाईने उजळलेले café, handicrafts वस्तूंची दुकाने रस्त्याच्या दुतर्फा दिसत होते. जंगल परिसरात असल्याने रात्री लवकर सामसुम होते. त्यामुळे आम्ही पुन्हा रिसॉर्टच्या दिशेने माघारी फिरलो. लवकरच रात्रीचे जेवण उरकून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लतागुडीचा निरोप घेतला. आम्ही दोघी मैत्रिणी न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेलो आणि आमची तिसरी मैत्रीण सहल संपवून बागडोगऱ्याहून विमानाने कोलकात्याला तिच्या घरी परतली. आम्ही दोघींनी बोलपूरकडे जाणाऱ्या रेल्वेने गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांचे “शांतिनिकेतन” गाठले. शांतिनिकेतन भेटीनंतर परतीचा शेवटचा मुक्काम पुन्हा मैत्रिणीच्या घरी कोलकाता येथे होता! आता मनात उत्सुकता होती ज्ञान, कला आणि सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या विश्वभारती विद्यापीठाच्या भेटीची!


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑