सफर उत्तरबंगाची – भाग – १

नेपाळ, बांगला देश, भूतान असे तीन देश आणि झारखंड ओरिसा, बिहार, सिक्किम आणि आसाम अश्या पाच भारतीय राज्यांच्या सीमेने वेढलेले भारताचे एक खास राज्य म्हणजे पश्चिम बंगाल!

उत्तरेस नेपाळ, भूतान आणि सिक्किमच्या सीमा, पश्चिमेला बिहार, ओरिसा तर पूर्वेस आसाम आणि बांगला देशाची सीमा अश्या अत्यंत गुंतागुंतीची सीमा असलेले गंगा – ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात वसलेले हे पश्चिम बंगाल राज्य! ढोबळ मानाने हिमालय आणि बंगाल उपसागराच्या दरम्यान असलेला हा प्रदेश. त्याच्या उत्तरेस दार्जिलिंग, जलपाईगुडी, कूचबिहार, मालदा, उत्तर आणि दक्षिण दीनाजपुर, अलिपुरद्वार आणि कॅलिंगपोंग ह्या जिल्ह्यानी मिळून तयार होतो, “नॉर्थ बंगाल” अर्थातच उत्तरबंगा!

नॉर्थ बंगाल त्याच्या विविधतेसाठी ओळखला जातो. हिमालयीन पायथ्याशी असलेला प्रदेश, तरई, दुअर्स असे काही प्रदेश पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतात. डिसेंबर २०२५ च्या नाताळ सुट्टीत उत्तरबंगाच्या भेटीचा योग आला खरा! अगदी मोजकी आणि निवडक ठिकाणे सहलीसाठी ठरवून मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा तीन दिशांनी तीन मैत्रिणी बागडोगरा विमानतळावर भेटलो आणि कूचबिहार च्या दिशेने कूच केले.

सकाळी साडेदहाच्या सुमारास बागडोगरा विमानतळ सोडून थोडे अंतर पुढे गेल्यावर आमची इनोव्हा गाडी चहासाठी थांबली. आम्ही अगदी भल्या पहाटे घर सोडले होते, त्यामुळे गरमागरम चहाचा घोट पोटात गेल्यावर डोळ्यावर येणारी झापडं उडाली!  आमच्या इनोवा गाडीच्या चालकासोबत परिचय करून घेऊन आमच्या सहलीच्या itinerary ची उजळणी केली. बागडोगरा विमानतळापासून कूचबिहारचे अंतर साधारण १४६ किलोमीटर होते.

आमच्या गाडी चालकाने आम्हाला कूचबिहार च्या मार्गावर थोडी वाट वाकडी करून “तीन बिघा कॉरिडार” पहाण्यासाठी नेले.

तीन बिघा कॉरिडार- सीमा सहकार्याचे प्रतीक

पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात, भारत–बांगलादेश सीमेजवळ असलेली अरुंद भू-पट्टी ‘दहाग्राम–अंगारपोटा’ या बांगलादेशी भूभागांना बांगलादेशच्या मुख्य भूमीशी जोडते. भारताने तेथील रहिवाशांच्या ये-जा करण्यासाठी हा मार्ग भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिला आहे. सुमारे १७८ मीटर लांब आणि ८५ मीटर रुंद असलेली ही चिंचोळी पट्टी स्थानिक भाषेत ‘तीन बिघा’ म्हणून ओळखली जाते.

१६ मे १९७४ रोजी इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान यांनी घडवून आणलेल्या करारातून ह्या कॉरिडॉरची औपचारिक संकल्पना आकाराला आली. त्यामुळे तीन बिघा कॉरिडॉर हा भारत–बांगलादेश मैत्रीपूर्ण संबंधांचा आणि सीमा सहकार्याचा महत्त्वपूर्ण प्रतीक मानला जातो.

भारताच्या भूभागाने वेढलेल्या दहाग्राम–अंगारपोटा येथील रहिवाशांना आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर आवश्यक कामांसाठी ह्या मार्गातून यातायात करण्याची परवानगी आहे. सशस्त्र सीमा दलाच्या कडक बंदोबस्तात हा कॉरिडॉर दिवसातील २३ तास खुला असतो. बांगलादेशी रहिवासी टुकटुकीतून दोन देशांच्या सीमेदरम्यान ये-जा करताना दिसत होते. व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतीय भूभागातून दिलेली ही वाहतुकीची सुविधा सीमा सहकार्याचे अनोखे उदाहरण आहे.

तेथील बीएसएफ गस्त पथकातील एका अधिकार्‍याने आम्हाला कॉरिडॉरची माहिती दिली आणि या अरुंद पट्टीवरून काही पावले चालत बांगलादेशाच्या भूमीवर जाण्याची परवानगीही दिली. काही भागांत तारेचे कुंपण घालून सीमा सुस्पष्ट केलेली आहे. जीवनावश्यक गरजांसाठी दोन देशांच्या सीमा दरम्यान सुरू असलेली ही नियंत्रित ये-जा आमच्यासाठी अत्यंत कुतूहलजनक अनुभव ठरली.

तेथून पुढे जाताना आमचा रस्ता खेड्यापाड्यांतून गेला. या गावांमध्ये विड्याच्या पानांचे मुबलक उत्पादन होताना दिसले; कूचबिहार जिल्ह्यात गांजाचेही उत्पादन होते, असे समजले. तीन बिघा कॉरिडॉरच्या भेटीमुळे प्रवास लांबला आणि आम्ही संध्याकाळी उशिरा पूर्व नियोजित रॉयल गुलमोहर हॉटेलमध्ये पोहोचलो. नीटनेटका, सुंदर आणि प्रशस्त परिसर हे त्या हॉटेलचे वैशिष्ट्य होते. मात्र कूचबिहार शहरात प्रवेश करताच आमचा अपेक्षाभंग झाला. जागतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर प्रथमदर्शनी अनेक ठिकाणी बकाल आणि मागासलेले भासले.

तोरसा नदीच्या काठावर वसलेले आणि शाही वारसा लाभलेले पश्चिम बंगालमधील शहर म्हणजे कूचबिहार! ब्रिटिश काळात ते एक प्रसिद्ध संस्थान होते. ‘कोच’ जमातीची भूमी किंवा वस्तीचे ठिकाण—‘विहार’—यावरून कूचबिहार हे नाव पडल्याचे मानले जाते. आज हे शहर बंगालमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

चौथ्या ते बाराव्या शतकादरम्यान कूचबिहार हा आसामच्या कामरूप राज्याचा भाग होता. पुढील राजकीय आणि साम्राज्यवादी संघर्षांतून कोच राजवंश उदयास आला. उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार, बिसवा सिंह हा कोच साम्राज्याचा पहिला शासक होता. त्याचा मुलगा नरनारायण याने यशस्वी कारकीर्दीत साम्राज्याचा विस्तार केला; त्याच्या सेनापती असलेल्या भावानेही या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली.

औरंगजेबाच्या कारकि‍र्दीत मुघलांनी हा प्रदेश जिंकला; मात्र प्राण नारायण यांनी लवकरच आपले राज्य परत मिळवले. १७७२–१७७३ मध्ये भूतानी राज्यकर्त्यांनी येथे आक्रमण केले. ते परतवून लावण्यासाठी कूचबिहारने ईस्ट इंडिया कंपनीशी संरक्षण करार केला आणि ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली संस्थान म्हणून त्याची पुन्हा स्थापना  झाली. ब्रिटिश राजवटीच्या अखेरीस राजा जगद्दीपेंद्र नारायण यांनी भारत सरकारशी केलेल्या करारानुसार संस्थान भारतात विलीन केले. १ जानेवारी १९५० मध्ये अखेर कूचबिहार पश्चिम बंगालचा भाग तसेच जिल्ह्याचे मुख्यालय बनले. सीमावर्ती स्थानामुळे या शहराला वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहास लाभलेला आहे.

सहलीचा दुसरा दिवस कूचबिहारमधील स्थानिक स्थलदर्शनासाठी राखून ठेवलेला होता. सर्व पर्यटन स्थळे जवळपास असल्याने दिवसाचे नियोजन निवांत होते. मात्र लंडनहून सुट्टीसाठी आलेली आमची मैत्रिण तापाने आजारी पडली. जेटलॅग, प्रवासाची धावपळ आणि हवामानातील बदल यामुळे तिला त्रास झाला असावा! हॉटेलच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने आम्ही स्थानिक डॉक्टरांकडून औषधे मागवली आणि तिला हॉटेल मध्येच थांबून पूर्ण विश्रांती घेण्यास सांगीतले.

आम्ही दोघी मैत्रिणी स्थल दर्शनासाठी बाहेर पडलो. कूचबिहार मध्ये सूर्य देवाचे अजिबात दर्शन घडलेले नव्हते. हवेत प्रचंड गारठा होता. मा‍झ्या आजारी पडलेल्या मैत्रिणीला कुचबिहार पॅलेस पाहण्यात विशेष रस होता. त्यामुळे आम्ही दोघींनी पॅलेस व्यतिरिक्त इतर ठिकाणांना भेट देण्याचे ठरविले. आमच्या दीमतीला इनोवा सज्ज होतीच!

मदन मोहन मंदिर

आमच्या स्थळ दर्शनाची सुरुवात श्रीकृष्णाला समर्पित मदन मोहन बारी मंदिरापासून झाली. हे मंदिर भाविकांसाठी सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत खुले असते, म्हणून आम्ही प्रथम मंदिर परिसराला भेट दिली. शहराच्या मध्यवर्ती भागातील सफेद रंगाची वास्तु आणि संकुलासारखा प्रशस्त परिसर मनावर ठसा उमटवतो.

मुख्य रस्त्याच्या उजवीकडे मदन मोहन बारीचे संकुल, तर मंदिराच्या उत्तरेला डावीकडे ‘बैरागी दिघी’ हे तळे आहे. तिथे तीन घाट असून, दर्शनापूर्वी तळ्यात स्नान करण्याची स्थानिकांची प्रथा आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर संपूर्ण संकुल आणि समोरच मदन मोहन श्रीकृष्णाचे मुख्य मंदिर दिसते. गर्भगृहात अष्टधातूची केवळ श्रीकृष्णाची मूर्ती आहे—नेहमीप्रमाणे राधा-कृष्णाची संयुक्त मूर्ती नाही—हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कोच राजवंशातील महाराजा नृपेंद्र नारायण यांनी मदन मोहन मंदिराची स्थापना केल्याचे सांगीतले जाते. मदन मोहन हे कोच राजघराण्याचे कुलदैवत होते; पुढे ते कूचबिहारमधील अनेकांचे आराध्य दैवत बनले. मंदिरातील भाविकांची गर्दी पाहताना त्यांच्या श्रद्धेची प्रचिती येते.

मंदिरात काही कुटुंबे लहान मुलांच्या ‘अन्नप्राशन’ विधीसाठी आली होती, तर काही जण आपल्या बाळाला प्रथमच देवदर्शनासाठी घेऊन आले होते. नवविवाहित जोडपीही मदन मोहनाचा आशीर्वाद घेताना दिसत होती. भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेला होता.

बंगाली दालन शैलीतील मदन मोहन मंदिराचे स्थापत्य लक्ष वेधून घेते. शुभ्र रंगाचे हे मंदिर एखाद्या राजवाड्यासारखे भासते; त्याच्या काही भागांवर ब्रिटिश वास्तु कलेचा देखील प्रभाव जाणवतो. त्यामुळे ही मंदिर आणि त्याची वास्तु कला प्राचीन कूचबिहार रियासतीच्या कालखंडाची एक महत्त्वपूर्ण खूण म्हणून लक्षात राहते. परिसरातील विविध देवतांची मंदिरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेली सुंदर हिरवीगार बाग पर्यटकांना रेंगाळण्यास भाग पाडतात. कूचबिहार जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन परंपरांप्रमाणे केल्या जाणाऱ्या काली पूजांपैकी एक असलेली राजघराण्याची ‘बोरो तारा’ पूजा ह्या मंदिर संकुलात आजही केली जाते.

सागर दिघी तलाव

आमच्या वाहनचालकाने एकाच दिशेला असलेली पर्यटनस्थळे लक्षात घेऊन दिवसाभराचा छोटा पण सोयीचा एक सर्किट तयार केला होता. मदन मोहन मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही बाणेश्वरकडे निघालो, तेव्हा कूचबिहार शहराच्या अगदी मध्यभागी असलेला ऐतिहासिक सागर दिघी तलाव नजरेस पडला. सागर दिघी हे कोच राजांच्या कारकि‍र्दीत जलसाठ्यासाठी बांधलेले मानवनिर्मित गोड्या पाण्याचे सरोवर आहे. सुमारे दहा एकरांवर पसरलेला हा विस्तीर्ण जलाशय शहराच्या इतिहासाशी आणि नागरी जीवनाशी घट्ट जोडलेला वाटतो.

बाजार परिसरात असलेल्या या तलावाभोवती प्रमुख सरकारी व प्रशासकीय कार्यालये, जिल्हा न्यायालय आणि काही ऐतिहासिक वास्तु उभ्या आहेत. त्यामुळे हा भाग दिवसभर गजबजलेला असतो. स्थानिक सामाजिक मेळावे, कार्यक्रम आणि निवांत फेरफटक्यांसाठीही सागर दिघी परिसर ओळखला जातो.

बाणेश्वर शिवमंदिर

मदन मोहन मंदिराला भेट देऊन आम्ही त्याच मार्गाने पुढे बाणेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो. कूचबिहार शहरापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर, बाणेश्वर रेल्वे स्टेशन परिसराजवळच महादेवाला समर्पित असलेले हे प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे कूचबिहार परिसरातील स्थानिक स्थल दर्शनात बाणेश्वर मंदिराला महत्त्वाचे स्थान लाभलेले दिसते.

बाणेश्वर मंदिराला पौराणिक पार्श्वभूमी असल्याचे सांगीतले जाते. परम शिवभक्त राजा बाणासुराने भगवान शिवाकडे त्यांनी पृथ्वीवर वास्तव्यास यावे असे वरदान मागितले. भगवान शिवांनी ते मान्यही केले; मात्र एक अट घातली—पृथ्वीवर येताना बाणासुर कोणत्याही कारणास्तव मध्येच थांबला, तर शिव तेथूनच अदृश्य होतील. महादेव बाणासुराच्या मागोमाग पृथ्वीवर येत असताना बाणासुर बाणेश्वर येथे, म्हणजे पूर्वीच्या गोरदासंदरा परिसरात थांबला. अट मोडल्यामुळे भगवान शिव तेथेच अदृश्य झाले. त्यानंतर बाणासुराने सांगती नदीकिनारी शिवलिंगाची स्थापना केली आणि हे स्थान त्याच्या नावावरून ‘बाणेश्वर’ म्हणून प्रसिद्ध झाले.

ह्या आख्यायिकेबरोबरच मंदिराच्या स्थापनेविषयी अनेक मतमतांतरे आहेत. काहींच्या मते दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात राजा जल्पेश्वराने हे मंदिर बांधले असावे. तर काही मान्यतांनुसार राजा नीलांबर किंवा कोच राजवंशातील महाराजा नर नारायण हयांनी मंदिराची स्थापना केल्याचे सांगीतले जाते. प्राण नारायण यांनी मंदिराचा जीर्णोद्वार केल्याचेही मानले जाते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने घोषित केलेल्या पश्चिम बंगालमधील राज्य संरक्षित स्मारकांपैकी ही एक महत्त्वाची वास्तु आहे.

मोठ्या चौथऱ्याच्या प्रांगणात चौरसाकृती रचनेचे हे शुभ्र सफेद रंगातील मंदिर उभे आहे. त्यावर घुमटासारखे छत असून किंचित वक्राकार कंगोरे लक्ष वेधून घेतात. मंदिराला पूर्व आणि पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. प्रांगणाच्या पातळीपासून सुमारे दहा फूट खाली गर्भगृह असून, योनीपीठामध्ये शिवलिंगाच्या रूपात बाणेश्वर मुख्य देवता विराजमान आहे. मंदिरालगत ‘शिव पुकूर’ नावाचे तळे आहे. या तळ्यात आढळणाऱ्या दुर्मिळ ब्लॅक सॉफ्टशेल कासवांना स्थानिक पातळीवर ‘मोहन’ म्हणतात आणि त्यांना पवित्र मानले जाते. येथे महाशिवरात्रीच्या काळात विशेष उत्सव साजरा केला जातो. आम्ही मंदिराच्या प्रांगणातून गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले. सोमवारी शिवशंभोचे दर्शन झाल्याचा आनंद वेगळाच होता.

सिद्धेश्वर मंदिर- काली बारी

बाणेश्वर मंदिरापासून आम्ही अगदी काही वेळातच शेतांनी वेढलेल्या एका गाव खेड्यामध्ये पोहोचलो. बरौनी गुवाहाटी मार्गावरील न्यू जलपाईगुडी – नवी बोंगाई गाव विभागातील बाणेश्वर रेल्वे स्टेशन पासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वरी- काली बारी मंदिर आहे. सांजवेळ झालेली होती. आजूबाजूला आखलेली शेते, शेताच्या लगत गावकऱ्यांची वस्ती दिसून येत होती. सिद्धेश्वरी मंदिराचा परिसर अगदी शांत होता. अजिबात वर्दळ नव्हती. मंदिरावर आजूबाजूच्या मोठ्या वृक्षांनी छाया धरलेली होती.

वीट बांधकाम असलेले हे प्राचीन मंदिर अष्टकोनी आहे. शुभ्र रंगातील मंदिरावर घुमट आहे. मंदिरासमोर अगदी व्यासपीठ होईल असा उंच चौथरा आहे. मंदिराच्या जवळच एक खूप जुने कामरंगाचे (स्टार फ्रूट) झाड आहे. गाभार्‍यामध्ये सिद्धेश्वरी देवीची अष्टधातूपासून बनविलेली मूर्ती आहे. चतुर्भुज काली मातेच्या शक्ति स्वरुपात देवीची पूजा केली जाते. ह्या मंदिराचा संबंध कुचबिहार राज्यकर्त्यांच्या राजघराण्याच्या इतिहासाशी जोडलेला आहे. एकूणच येथील बहुतेक बांधकाम अथवा स्थापत्य शैलीवर ब्रिटिश स्थापत्यशास्त्राचा प्रभाव जाणवतो.

सिद्धेश्वरी मंदिर परिसरातील संध्याकाळचे काही क्षण निवांत आनंद देऊन गेले. गावामध्ये खुशाल मनमौजी सायकलीवर बागडणारी लहान मुले, कापणी केलेल्या उघड्या बोडक्या शेतांमध्ये क्रिकेट खेळणारे आवाज आणि सांजवेळी आपल्या घरट्यामध्ये परतत असलेल्या पक्ष्यांची किलबिल मनात साचलेल्या सर्व चिंतांपासून दूर घेऊन गेला.

आम्ही पुन्हा शहराच्या दिशेने निघालो. एव्हाना काळोख पडू लागला होता. आम्ही कूचबिहार राजबाड़ी समोरच्या हमरस्त्यावर आलो. पायी चालत शहराच्या मध्यवर्ती भागाचा अनुभव घेणे हाही एक वेगळा अनुभव असतो. राजबाडी रंगीत रोषणाईने सजली होती. आम्ही तेथील ‘सेव्हेन हेवेन’ कॅफे मध्ये गरमागरम कॉफी आणि सॅँडवीचचा आस्वाद घेऊन आमच्या ‘गुलमोहर रॉयल्स’ मुक्कामी परतलो. आजारी मैत्रिणीची विचारपूस करून विश्रांती घेतली.

सहलीचा तिसरा दिवस थोड्या मंद गतीने सुरू झाला. आम्ही कूचबिहारचा राजवाडा एकत्र पाहण्यासाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे आज पुढे जाण्याआधी आम्हाला कूचबिहार पॅलेस पाहावयाचा होता आणि नंतर कूचबिहारला रामराम ठोकून दूअर्स प्रांतामधील काही स्थळ दर्शन करून लतागूडीकडे मुक्कामी जाण्याचा दिवस होता. आम्ही हॉटेलचा निरोप घेऊन राजवाड्याच्या दिशेने निघालो. मैत्रीण आजारी पडल्याने सहलीचे वेळापत्रक थोडेफार बिघडले होते, पण ‘सिर सलामत तर पगडी पचास’! हेल्थ इज वेल्थ! त्यामुळे आम्ही जरा दमानेच घेतले.

कूचबिहार  पॅलेस

सकाळी साधारण अकरा वाजता आम्ही कूचबिहार पॅलेसच्या परिसरात पोहोचलो. ऐतिहासिक पर्यटन स्थळांची प्रवेश तिकिटे ऑनलाइन किंवा मोबाइल ॲपद्वारे सहज मिळतील, असा आमचा समज होता. प्रवेशद्वाराजवळील मोठ्या फलकावर दिलेला बारकोड आणि संकेतस्थळ वापरून आम्ही तिकिटे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र वारंवार प्रयत्न करूनही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

दरम्यान, तिकीट खिडकीवर मोठी गर्दी झाली होती. रांग व्यवस्थित नसल्याने गोंधळ वाढत होता आणि प्रत्येक जण पुढे जाण्याची घाई करत होता. अखेरीस खिडकीपाशी पोहोचल्यावर आम्ही तीन भारतीय आणि एका परदेशी पर्यटकासाठी अशी चार तिकिटांची मागणी केली. कर्मचार्‍याने तीन तिकिटे दिली; मात्र मा‍झ्या परदेशस्थ मैत्रिणीचा पासपोर्ट आणि पैसे स्वत:कडे ठेवून घेतले, आणि पुढील प्रक्रिया काय आहे याबद्दल काहीच सांगीतले नाही.

परदेशी प्रवाशासाठी पासपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असल्याने मी अस्वस्थ झाले. मागून इतर पर्यटकांची घाई आणि गोंधळ सुरूच होता. मी प्रथम कर्मचार्‍याकडून पासपोर्ट परत घेतला आणि विलंबाचे कारण विचारले. तेव्हा संगणकात तांत्रिक बिघाड असल्याचे त्याने सांगीतले. त्यानंतर आम्हाला बाजूला थांबवून मागील एका मोठ्या गटाची तिकिटे देण्यात आली; शेवटी आमच्या परदेशस्थ मैत्रिणीचे स्वतंत्र तिकीट मिळाले. या विस्कळीत प्रक्रियेमुळे विनाकारण वीस ते पंचवीस मिनिटे वाया गेली.

आम्ही प्रवेशद्वाराजवळील तिकीट घरापासून पॅलेसच्या दिशेने जाणाऱ्या बागेतील रस्त्याने पुढे निघालो. विस्तीर्ण परिसर असलेला कूच बिहार राजवाडा ह्या शहराच्या प्राचीन इतिहासाची एक शानदार ओळख आहे. अगदी ह्या शहराचे मुख्य आकर्षण म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सुमारे १८८७ मध्ये कोच राजघराण्यातील महाराजा नृपेंद्र नारायण यांनी हा राजवाडा बांधला. ‘व्हिक्टर ज्युबिली पॅलेस’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूवर लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या रचनेचा प्रभाव दिसतो. युरोपीय आणि भारतीय वास्तुशैलींचा सुंदर संगम असलेली ही विटांची भव्य दुमजली इमारत कूचबिहारच्या शाही वारशाची साक्ष देते.

राजवाड्यात हवेशीर व्हरांडे, प्रशस्त दिवाणखाने, खासगी कक्ष, शयनगृहे, भोजनकक्ष, बिलियर्ड हॉल, ड्रेसिंग रूम्स, ग्रंथालय आणि तोशाखाना म्हणजेच खजिनाघर अशी अनेक दालने आहेत. पोर्चमधून मध्यभागी असलेल्या दरबार हॉलमध्ये प्रवेश करता येतो. दरबार हॉलच्या वरील सोनेरी घुमट हे राजवाड्याचे प्रमुख आकर्षण आहे.

सध्या राजवाड्याचा मर्यादित भाग संग्रहालयाच्या रूपात पर्यटकांसाठी खुला आहे; उर्वरित अंतर्गत भागात प्रवेश निषिद्ध आहे. संग्रहित वस्तूंचे प्रदर्शन पाहताना इतिहासातील शाही जीवनाचा मागोवा सहज घेता येतो आणि राजवाड्याची भव्यता अधिक ठळकपणे जाणवते.

कूचबिहारला पर्यटनाच्या नकाशावर विशेष ओळख मिळवून देण्यात व्हिक्टर ज्युबिली पॅलेसचा मोठा वाटा आहे. मात्र प्रत्यक्ष शहराचा चेहरामोहरा पाहताना ही शाही ओळख सर्वत्र जपलेली दिसत नाही, अशी संमिश्र भावना मनात राहिली.

आम्ही राजवाडा दर्शनानंतर थेट लतागुडीकडे निघालो. खरं तर लतागुडीला जाताना बक्सा फोर्ट, जयंती इत्यादी ठिकाणे पाहून पुढे मुक्कामी जायचे ठरले होते. परंतु दिवसाची सुरुवातच इतक्या विलंबाने झाल्यामुळे बक्सा फोर्ट येथे पोहोचेपर्यंत दिवस मावळला आणि प्रवेशद्वार बंद झाले. रिमझिम पाऊस देखील पडत होता, त्यामुळे फक्त चहासाठी क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही अलिपुरद्वार मार्गे थेट ‘टस्कर डेन रिसॉर्ट’ मुक्कामी प्रस्थान केले. कूचबिहारचा पॅलेस मात्र मनात रेंगाळत राहीला.


Discover more from अनवट वाटा

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Create a website or blog at WordPress.com

Up ↑